SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25/12/2020
नाम संकीर्तनाचे महत्त्व

आपली ज्ञानेंद्रिये या भौतिक जगाच्या बाह्यानुभवांकडे नेहमीच आकर्षित होत असतात. ही भौतिक सुखे आपल्या मनाला उद्‌ध्वस्त करण्यास सदैव तत्पर असतात. म्हणूनच आपल्या मनाला संरक्षणाची गरज असते. असे संरक्षण केवळ सद्गुरूंच्या सततच्या साहचर्याद्वारे आणि नामस्मरणाद्वारेच साध्य करता येते.

आयुष्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी टिकणारी आणि अविनाशी संपत्ती मिळवणे आवश्यक असते. भौतिक सुखांसाठी केलेली कमाई ही कायमस्वरूपी नसते, ती कालांतराने संपुष्टात येते. जर एखाद्या व्यक्तीने लॉटरीमध्ये एक कोटी रुपये कमावले तरीदेखील शेवटी ते त्याला दु:खाकडेच घेऊन जाते. त्याला त्यातून आत्मानंद प्राप्त होणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, अशा क्षणिक सुखाचा, संपत्तीचा प्रभाव हा दुःखाला आकर्षित करतो. ही संपत्ती वगैरे सर्व मायावी आहे, भ्रमित करणारे आहे. जे चिरकाल टिकणारे आहे, ते शोधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. मानवी शरीराबरोबर येणारी ही ज्ञानेंद्रियेदेखील क्षणिक आणि चंचल असतात. त्यामुळे ती कायमच अशा क्षणिक, भौतिक सुखांकडेच आकर्षित होतात.

प्रापंचिक आसक्तीच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला सर्वसामान्य माणूस नामस्मरण आणि सत्संग (साधुसंग) या दोन पंखांच्या साहाय्याने उंच भरारी घेऊ शकतो. तो स्वतःला परमहंस (संतशिरोमणी) बनवू शकतो. या दोहोंच्या साहाय्याने तो अशा एका टप्प्यावर पोहोचू शकतो जेथे गतकाळातील कोणत्याही वाईट प्रवृत्ती त्याला स्पर्श करणार नाहीत. परंतु यासाठी मनाची शुद्धता ही मूलभूत आवश्यकता आहे. आणि मन शुद्ध करण्यासाठी गुरूंची सेवा आवश्यक आहे.

गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही विशिष्ट सेवा करण्याची आवश्यकता नसते. सूर्याकडे प्रकाश मागण्यासाठी कोणाला वेगळी काही प्रार्थना करावी लागते का? किंवा सूर्य कुठल्या विशिष्ट जागेलाच प्राधान्य देतो का? नाही. सूर्यासाठी, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक ठिकाण हे सारखेच असते. त्याचप्रमाणे गुरूंच्या दृष्टीनेही सर्वजण समानच असतात. केवळ भक्तांच्या किंवा शिष्यांच्या मनाच्या शुद्धतेनुसार आणि गुरूंची सेवा करताना त्याच्या मनात प्रतिबिंबित होणाऱ्या वृत्तीनुसार, दृष्टीकोनानुसार त्यास गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होत असतात.

शिष्याची मनोवृत्ती अशी असावी की त्याचे बोलणे किंवा वाद करणे, चर्चा करणे, ते फक्त गुरूंबरोबर असावे.’ तुम्हाला चंदनाचा लेप आवडो अथवा नावडो, तो आपला सुगंध तुमच्याभोवती पसरवतोच, नाही का? प्रापंचिक व्यवहारांवरून लोकांशी वाद घालणे चांगले लक्षण नाही. सामान्य लोकांशी व्यवहार किंवा देणीघेणी करत राहिल्याने आपल्याला काही फायदा होत नाही. सद्‌गुरूंसमवेत आपला सहवास वाढवण्यास शिका.

भक्तिमाला डिसें ९९

अत्यंत क्रूर अशा लोकांमध्येही बदल घडवून आणण्याची क्षमता सत्संग किंवा महान लोकांच्या सहवासामध्ये असते. नामस्मरण किंवा दिव्य नाम संकीर्तन (भजन) हे यासाठी एक खूप उपयुक्त साधन आहे. सद्गुरू ही अशी व्यक्ती असते जी आपल्यामध्ये हे व्यापक असे परिवर्तन घडवून आणू शकते. एक पिता केवळ आपल्याला जन्म देऊ शकतो, परंतु याच जन्मातच आपल्या आशीर्वादाने सद्गुरू आपल्याला पुनर्जन्म प्राप्त करून देऊ शकतात.

भक्तिमाला डिसें १९९६

Tags: