SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25/12/2020
रुग्णांना बरे करण्यासाठी स्वामीजी संगीताचा उपयोग कसा करतात?

तुम्ही सर्वजण आता माझ्यासमोर बसला आहात, पण एकाच वेळी तुमच्या सर्वांच्या मनात असंख्य वेगवेगळे विचार येत आहेत. माणसाच्या मनांत प्रत्येक वेळी चालू असणाऱ्या विचारांची प्रक्रिया समजणे अगदी अशक्य आहे. हे देवालासुद्धा शक्य नाही. तुमच्या मनातील भावभावनांचे हवेवर तरंगणारे तरंग मी अनुभवू शकतो, पाहू शकतो. या अतिशय सरमिसळ अशा विविध भावनांच्या कंपनांचा प्रवाह मी सहन करू शकत नाही. एक माणूस घरी जाण्याचा विचार करीत आहे, दुसऱ्याला भूक लागली आहे, तिसरा कोणी हा कार्यक्रम कधी संपेल ह्याचा विचार करत आहे, तर कोणाच्या मनात अतिशय निरुपयोगी असे विचार येताहेत तर कोणाच्या मनात पापी विचार आहेत.

जेव्हा तुम्ही उपचारासाठी संगीत ऐकता तेव्हा तुमचे मन त्या संगीतातून प्रसारित होणाऱ्या तरंगांकडे जाते. हळूहळू ही मने एकाच दिशेने जाऊ लागतात. ह्यामुळे तुमच्या मनातील अनावश्यक आणि मनाला भरकटवणारे विचार आपसुकच पुसले जातात. या आरोग्यदायी संगीतातून प्रसारित होणारी शक्तिशाली कंपने अशा सर्व अनावश्यक विचारांवर मात करतात आणि त्यांना शमवतात. असे हे संगीत आपल्यामध्ये केवळ चांगली स्पंदने उद्दिपित करते. आपण संपूर्ण शांततेची अनुभूती घेऊ शकतो.

संगीताच्या प्रभावामुळे श्रोतृवर्गातील सर्वांची मने एकाच दिशेने विचार करू लागतात आणि सर्व मने एकरूप होऊन त्या एकाच मनाशी तादात्म्य पावतात. या योग्य वेळी स्वामीजी तुमच्या अंतरंगात प्रवास करतात. उपचार सत्रामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक सजीव घटकात स्वामीजी प्रवेश करतात. अगदी डास, मांजर किंवा कुत्रा ह्यांच्यातही. एकाच वेळी बराच मोठा श्रोतृसमूह स्वामीजी हाताळू शकतात.

त्यांच्यामध्ये प्रवेश करून ते विश्लेषण करतात - कोणत्या कारणांमुळे हा आजार झाला? या आजारासाठी तुमच्या खाण्याच्या सवयी कारणीभूत झाल्यात का? तुमचे नशीब काय सांगते? हा रोग कोणी निर्माण केला? की तो स्वतःच उद्भवला का? अशा सर्व प्रश्र्नांचे विश्र्लेषण केल्यानंतर स्वामीजी त्यावर उपचार करतात.

हा माझा यज्ञ आहे. आपणा सर्वांना बरे करण्यासाठी मी हा दृष्टीकोन निश्चित केला आहे. संगीताच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांची मने सुमारे दहा मिनिटांपर्यंत एकाच दिशेने खेचतो, आपल्या मनांमधील नकारात्मक स्पंदने काढून टाकतो आणि त्याची जागा सकारात्मक स्पंदने घेतात. खरे सांगायचे तर त्या क्षणी प्रत्यक्ष स्वामीजीसुद्धा अस्तित्वात नसतात. काहीही आणि कोणीही अस्तित्वात नसते. केवळ कंपने आणि स्पंदने अस्तित्वात असतात. सर्व काही त्या स्पंदनांनी व्यापून जाते. या मन शांत करणाऱ्या कंपांमुळे, तुम्ही सर्व काही विसरता - आपले मन, आपली बुद्धी आणि अगदी आपले अस्तित्वसुद्धा. एका शांत आणि खोल अशा निद्रेमध्ये तुम्ही स्थिर असता आणि तुम्ही बरे होत असता.

ज्या लोकांनी या उपचार प्रक्रियेचा अनुभव घेतला आहे, त्यांना या मैफिलींचे मोल माहीत असल्याने ते या मैफिलींसाठी आवर्जून येतातच. ज्याप्रमाणे विष्णूने पायसामध्ये (दुधाच्या विशिष्ट खिरीमध्ये) अमृत मिसळून ते देवतांना वाटले, त्याचप्रमाणे स्वामीजी त्यांची ऊर्जा संगीतामध्ये मिसळून तुमच्याकडे पाठवित असतात. स्वामीजी संगीतात अमृत मिसळून तुमच्यावर त्याचा वर्षाव करतात.

आत्ता तुमचे मन असंख्य, अगणित विचारांनी भरून गेले आहे. ते अशुद्ध आहे, तसेच पापी, तापी आहे. ते अग्नीप्रमाणे दग्ध आहे. अशा परिस्थितीत माझी इच्छा झाली तरीही मी तुमच्या हृदयात प्रवेश करू शकत नाही. म्हणूनच मी संगीताच्या माध्यमातून तुमच्या हृदयात प्रवेश करून तुम्हाला बरे करतो.

(बेंगलोर - नोव्हेंबर २०१६)

Tags: