आजचा दिवस शुभ दिवस आहे. या दिवशी हजारो वर्षांपूर्वी गुरुदत्त प्रकट झाले. आपण या शुभ दिवशी माझा वाढदिवस साजरा करत आहात हा एक योगायोग आहे.
जरी आपण वर्षातून एकदा वाढदिवस साजरा करत असलो, तरी प्रत्यक्षात, जेव्हा आपण गाढ निद्रेतून जागृत अवस्थेत येतो तेव्हा आपण दरोरोज जन्म घेत असतो .जर या दृष्टीकोनातून पाहिले तर प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा वाढदिवस असतो.
आपण जो वाढदिवस साजरा करत आहात तो शरीराचा आहे आणि म्हणून तो महत्वाचा नाही. ज्या दिवशी तो / ती अध्यात्माच्या क्षेत्रात प्रवेश करतो त्या दिवशी त्याचा खरा जन्मदिन असतो. पाच तत्वांपासून बनविलेले भौतिक शरीर केवळ क्रिया, कृती करण्यासाठी असते. ज्या दिवशी व्यक्तीमध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित होतो तोच त्याचा खरा वाढदिवस असतो.
आपल्या गुरुंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुम्ही हजारो लोक मोठ्या भक्तीभावाने येथे आला आहात. तुमच्यात सर्व प्रकारचे लोक आहेत- सुशिक्षित, अशिक्षित, निस्वार्थी, स्वार्थी, भक्त, शिष्य, सेवावृत्तीचे, चोर, खुशमती आणि समालोचक. तरीही, जो देव माझ्यामध्ये निवास करतो त्याच देवास मी तुमच्या सर्वांमध्ये पाहतो.
तुमचे स्वामीजी मोठ्या जहाजासारखे आहेत. तुम्ही सर्व जण जहाजात बसलेले आहात. संसाररुपी सागर पार करण्यासाठी तुमचे स्वामीजी जहाजाचे कॅप्टन आणि संचालक आहेत. तुमच्या भक्तीच्या पातळीनुसार स्वामीजी तुम्हाला संबंधित स्टेशनवर घेऊन जातील.
स्वामीजींच्या भक्तांमध्ये, प्रत्येकजण मोक्षासाठी प्रयत्न करीत नाही. स्वामीजींना ते चांगले माहित आहे. काहींना आजारापासून मुक्ती हवी असते, काहींना शांती हवी असते, काहींना ऐहिक आनंद हवा असतो तर काहींना मुक्तीची तीव्र इच्छा असते. प्रत्येकाला पाहिजे ते द्यावे असे तुमच्या स्वामीजींना वाटते. जेव्हा तुम्ही स्वत: संपूर्णपणे आपल्या गुरु स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली राहाल आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण कराल तेव्हाच हे शक्य होईल. मग तुमच्या सर्व शंका नाहीशा होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
तुम्ही सर्वजण स्वामीजींची सेवा करायला इथे आला आहात, पण तुमच्या स्वामीजींना आता तुमची सेवा करायची आहे. जेव्हा अज्ञानी खरे ज्ञान प्राप्त करतात, तेव्हा ते स्वतःच परिपूर्ण ज्ञानी होतात. साधक आणि साध्य ह्यातील फरक नाहीसा होतो. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठाल तेव्हा तुम्ही सर्वजण तुमच्या स्वामीजीसारखे व्हाल.
बहुतेक करून ज्ञानी लोक नारळाची उपमा देतात. जरी नारळ ताजे आणि आकर्षक दिसले तरी ते तसेच खाऊ शकत नाही. पहिल्यांदा सगळ्यात वरचे कठीण आवरण आणि त्यानंतर तंतुमय काथ्या काढून टाकावा लागेल. शेवटी गाभ्यावर असलेले कठोर कवच तोडावयास लागते. तशाच प्रकारे आनंदपूर्ण आत्मतत्व आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या केंद्रस्थानी लपलेले आहे. शरीर, मन, बुद्धी आणि शेवटी अहंकार यांचे थर काढून टाकणे आवश्यक असते. जेव्हा अहंकाराचा नाश करून व्यक्ती आतील गाभ्याऱ्यात पोचते आणि तेव्हा आनंदाची जाणीव होते. तुमच्या आणि आनंदाच्या मध्ये अहंकार उभा असतो. ज्या दिवशी आपण अहंकार नष्ट करतो तो आपला खरा वाढदिवस असतो.
(वाढदिवसाचा संदेश मे १९८२, भक्तीमाला जून १९८२)