अध्यात्मिक गुरु योग्य वेळी व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करतात. हे पूर्व निर्धारित असते. एखाद्या व्यक्तीने खूप पुण्य कर्म केली असतील आणि त्याचा खूप पुण्यसंचय झाला असेल अशा व्यक्तीच्या बाबतीत हे घडते. ज्याने अनेक पापं केली आहेत आणि ज्यास सुधारण्याची आवश्यकता आहे, अशा व्यक्तीच्या बाबतीतही हे घडू शकते.
पहिल्या प्रकारात सद्गुरू त्या व्यक्तीला सांसारिक बंधनांच्या बेड्यातून मुक्त करतात आणि त्याला आपल्या उच्च आत्मतत्वाची जाणीव करून देतात. नंतरच्या प्रकारात गुरू प्रथम त्याला सामान्य स्थितीत आणतात. त्यानंतर, त्यापुढे नैतिक ऱ्हास होणार नाही याची ते काळजी घेतात. मग तो संबंधित व्यक्तीमध्ये एक सूक्ष्म पण निश्चित बदल घडवून आणतात. ही प्रक्रिया संथ असू शकते आणि सुरुवातीला स्पष्टपणे दिसत नाही.
गुरू शारीरिक रूप धारण करतातच असे नाही. शक्ती किंवा भावना अंतकरणात प्रकट होऊन किंवा गौतम बुद्धांच्या बाबतीत घडल्याप्रमाणे साक्षात्कार किंवा अनुभवाच्या स्वरूपात ती प्रकट होऊ शकते
या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा निर्माता परमेश्वर आहे, त्यात गुरूंचाही समावेश होतो. परमेश्वराची करूणा असीम असते. तथापि हाच परमेश्वर आपल्याला आपल्या इच्छेनुसार वागायला सोडून देतो आणि आपण आपल्या कृतींची, कर्मांची चांगली किंवा वाईट फळे प्राप्त करतो.
दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक गुरू हे आपले मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक असतात. ते आपल्याला परमेश्वराकडे जाणारा मार्ग दाखवतात आणि त्या मार्गावर टप्प्याटप्प्याने आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणूनच ते स्वतः महान देव आहेत. गुरू स्वत: ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहेत!
(भक्तिमाला जानेवारी १९७७)