‘‘आत्मज्ञानाच्या माध्यमातून माझ्या भूतकाळातील तसेच भविष्यातील कर्मांच्या राशींची राख करणाऱ्या गुरुदेवांना मी नमन करतो. गुरूपेक्षा दुसरे श्रेष्ठ तत्त्व नाही! त्यांच्यापेक्षा कोणतीही मोठी तपश्र्चर्या नाही! गुरू तत्त्वापेक्षा दुसरे कोणतेही तत्त्व महान नाही! अशा गुरूंना मी नमस्कार करतो.’’ गुरूपौर्णिमेला सद्गुरूंना केलेली प्रार्थना अशी असावी.
महर्षी व्यास, श्री शंकर-भगवदपाद, श्री दत्तात्रेय, दक्षिणमूर्ती आणि श्रीकृष्ण या सर्वांनी गुरू परंपरेचा प्रसार केला. गुरू पौर्णिमेला आपण त्यांची उपासना करायला हवी.
अनेक पूर्वजन्मांमध्ये केलेल्या अगणित पुण्यकर्मांच्या आधारे आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला आहे. हा दुर्मीळ मानव जन्म मिळाल्यानंतर आपण खाणे, झोपणे आणि उपभोगणे इत्यादी कामात सावधगिरी बाळगत गुरूंनी सांगितलेल्या धार्मिक मार्गावर चालले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे.
आत्माभिमान आणि श्रेष्ठत्व - हीनतेच्या या जटील अशा बाबींकडे दुर्लक्ष केल्यानंतर, आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते. त्यायोगे आपल्याला दिव्यत्वापर्यंत पोचण्यास मदत होते. आध्यात्मिक गुरूंचा सहवास लाभलेल्या व्यक्तीच्या अनेक चिंता कमी होतात तसेच आयुष्यामध्ये सतत होणारे उलथापालथदेखील लक्षणीयरीत्या कमी होते. मानसिक दुर्बलतेवर मात करण्याची त्याची क्षमता वाढते. प्रबुद्ध आध्यात्मिक गुरू, शिष्याच्या मनामध्ये ज्ञानाचा दिवा प्रकाशित करतात. त्यामुळे शिष्य या चराचर सृष्टीमधील स्थायी आणि अस्थायी वस्तूंमधील फरक जाणण्यास सक्षम होतो. अशा गुरूंमुळे शिष्यामधील चांगुलपणा, शुद्धता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थीपणा यांसारख्या गुणांना चालना मिळते. समर्पण, परिपूर्ण एकाग्रता, इच्छांपासून मुक्ती आणि अहंकाराचा नाश असे गुण गुरूंमुळे वाढीस लागतात. त्यामुळे शिष्य सांसारिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उन्नती करतो. अशा ज्ञानी गुरूंच्या सहवासामुळे – ‘आनंद माझ्या अंतरंगातच वसलेला आहे.’ - ही भावना शिष्याच्या मनात निर्माण होते. यामुळे तो दुःख आणि इतर गोंधळांपासून दूर राहू शकतो.
या अथांग, व्यापक अशा सृष्टीतील आपले खरे स्थान गुरू आपल्या शिष्याला ज्ञान, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दाखवतात. यातून ते शिष्यामधील उद्धटपणाची, अहंकाराची भावना नष्ट करून त्याच्यात नम्रतेची भावना उत्पन्न करतात. आपली प्रवचने, कृती, जीवनशैली आणि शब्दांच्या माध्यमातून ते शिष्यातील राक्षसी प्रवृत्ती दूर करतात आणि मग त्याची जागा उदात्त असे गुण घेतात.
अशा ज्ञानी गुरूंचे प्रेम आणि कृपा प्राप्त करण्यासाठी आपण काय करायला हवे? १) इतरांच्या भावना कधीही दुखवू नका किंवा त्यांचे काही नुकसान व्हावे यासाठी प्रयत्न करू नका. राजकीय फायद्यासाठी कधीही षडयंत्र रचू नका, कटकारस्थाने करू नका. इतर लोक जेव्हा प्रगती करतात तेव्हा त्यांचे मनापासून कौतुक करा. २) वडीलधाऱ्यांचा आदर करा. लोकांच्या पात्रतेनुसार त्यांचे मोल ठरवा. ३) सदगुरूंच्या सहवासामध्ये सदैव राहण्याचा प्रयत्न करा. त्यांची प्रवचने नीट लक्षपूर्वक ऐका. ४) इतर भक्तांचे अनुभव वाचा. भक्तिमाला वाचन नियमितपणे करत राहा. यामुळे तुमची भक्ती स्थिर राहील. ५) सदगुरूंच्या नजरेत कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते हे समजून घ्या. ६) मत्सर आणि द्वेषाच्या भावना काढून टाका. फक्त चांगले आणि सकारात्मक विचार मनात बाळगा. नेहमी सत्कर्मात गुंतून राहा. ७) सदगुरूंच्या आवडीचे उपक्रम शोधा आणि गुरुसेवेत मग्न व्हा. सेवा देण्याकडे तुमचा कल वाढवा. गुरूचरित्र वाचा. जर या संकतांचे योग्य पालन केले तर तुमचे सद्गुरू तुमच्या हृदयामध्ये वास करतील. ते तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचे रक्षण करतील. त्यामुळे वेळ वाया न घालवता पूजा, पवित्र धार्मिक ग्रंथांचे वाचन, क्रिया-योगाचा सराव आणि इतर कार्ये पूर्णपणे समर्पण भावाने करायला शिका. गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करा. तुमच्या जवळच्या आश्रमाच्या शाखांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हा. आपल्या मुलांच्या वर्तणुकीबद्दल जागरुक राहा. त्यांच्यावर इतर सामाजिक माध्यमांचा प्रभाव पडण्यापूर्वी त्यांना चांगली शिस्त लावा आणि मूल्ये शिकवा. तुमच्या मुलांचे मित्र, मैत्रिणी कोण आहेत ह्याबद्दल जागरूक राहा. त्यांच्यासोबत असताना आपल्या मुलाची, मुलीची वर्तणूक कशी असते ह्यावर लक्ष ठेवा.
तुमच्या घरात सकारात्मक स्पंदने असू द्या. महान संतांच्या कथा मुलांना वाचून दाखवा. त्यांना दानाचे आणि धर्म पालन करण्याचे महत्त्व शिकवा. त्यांना योग्य ती शिस्त आणि नीतिमत्ता शिकवा.
महर्षी व्यास आणि आदीगुरू दत्तात्रेय यांच्या कृपेने चांगले, सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये दृढ होऊन तुमच्या भक्तीमध्ये लक्षणीयरीत्या वाढ होऊ द्या!
- ई टीव्ही जुलै २०१७ गुरू पौर्णिमा