गुरू किंवा देवाला कोणतेही समर्पण केल्यानंतरच्या क्षणापासून त्याचा विचार करणे ताबडतोब थांबवावे. असे विचार करणे पाप आहे. तसेच, आपल्या देणग्या किंवा सेवांचा प्रचार करू नये.
एकदा दान किंवा देणगी देऊन (किंवा सत्कर्म) झाले की भक्ताने पुढे काय सेवा देता येईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा एखादी व्यक्ती देणगी देण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असेल, तेव्हा त्या व्यक्तीने या गोष्टीसाठी देवाला दोष देऊ नये. त्याऐवजी – ‘देणगी देण्याची पात्रता त्यास लाभू दे.’ - अशी त्याने देवाला प्रार्थना करायला हवी.
जेव्हा तुम्ही गुरू किंवा देवाला अर्पण करत असता तेव्हा तुम्ही तुमची पापे, गोंधळ आणि समस्या अर्पण करत असता. हे कायम स्मरणात ठेवा! बाहेर फेकलेली घाण परत घेणे शहाणपणाचे आहे का? त्याच प्रकारे, दिलेल्या देणग्यांचे श्रेय स्वत:कडे घेऊ नये.
जर एखाद्या व्यक्तीकडे उदात्त कार्यासाठी दान करण्याची क्षमता नसली तर निराश होऊ नये. कोणी भक्तिभावाने नमस्कार जरी केला तरी अशा परिस्थितीमध्ये तो पुरेसा असतो.
एक काटा दुसऱ्या काट्यानेच फक्त काढता येतो. एक हिराच फक्त दुसऱ्या हिऱ्याला कापू शकतो. अशाच प्रकारे माणूस आपल्या जीवनात वेगवेगळी पापे जमा करत असतो. पाप दूर करण्यासाठी पूजा, होम, अभिषेक, मंत्रपठण, पवित्र ग्रंथांचा अभ्यास, भजन अशा विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. या धार्मिक कृतींमुळेच आपल्या दुष्कृत्यांचा प्रभाव दूर होऊ शकतो. दुस-या शब्दांत सांगायचे तर धार्मिक कृती ही केवळ केलेल्या वाईट कृत्यांची पापे पुसून टाकू शकते, म्हणजेच फक्त कर्मच कर्माचा नाश करू शकते. त्यामुळे आपल्या गतकाळातील कर्मापासून मुक्त होण्यासाठी भक्तांनी विविध विधी केले पाहिजेत.
दत्त जयंती १९९८