‘विनायकी चतुर्थी’हा शब्द आपल्याला आनंदाने भारून टाकतो आणि आपण आपले सारे दुःख विसरून जातो. हा उत्सव प्रत्येक भारतीय घरात साजरा केला जातो. फक्त भारतातच नाही तर इतरही अनेक देशांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच सर्व देशांतील लोक गणेशोत्सवाची उत्सुकतेने वाट बघत असतात. आपले शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून विद्यार्थी गणरायाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात. व्यापारी आणि राजकारणी कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. मनाची व्यापकता, विशाल अंतःकरण आणि उत्तम असा दृष्टीकोन ह्यांचा आशीर्वाद गणपती देतो. तो आपल्या निर्ढावलेल्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो आणि त्यातील आळशीपणा आणि सुस्ती दूर करतो. त्यानंतर तो आपल्याला नवीन ऊर्जा, उत्साह आणि क्षमता ह्यांचा आशीर्वाद देतो. आपला भक्त जे कार्य पार पाडण्यासाठी निघाला आहे, त्या कार्यात तो त्यास यश देतो. म्हणूनच, अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने दररोज न चुकता गणपतीची पूजा केली पाहिजे! कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी, त्याचे स्मरण करून त्याची पूजा केली पाहिजे! गणपती हा त्याच्या आई-वडिलांचा निस्सीम भक्त आहे. आपण आपल्या आई-वडिलांची प्रेमाने काळजी घ्यावी, त्यांच्या गरजा भागवाव्यात, त्यांचे पूजन करावे आणि त्यांना कोणतेही दु:ख देऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या कृतीतून आपल्याला शिकवितो. गणपतीनेच आई-वडिलांचे पूजन केले असल्याने, त्यास पहिल्या पूजेचा मान मिळाला आहे. (आदी पूज्य, प्रथमवंद्य). स्वामीजी भजनांमध्ये गणपतीस प्रथमवंद्य, वक्रतुंड या नावांनी संबोधतात. ‘ओंकारा'चा जप करणे आवश्यक आहे,’ असा उपदेश त्याची वक्र असलेली सोंड (वक्रतुंड) करते. त्याची वक्र सोंड ओंकार दर्शविते. त्याच्या मोठ्या उदरात असंख्य ब्रह्मांडे सामावली आहेत. केवळ त्यांची मूर्ती पाहूनच आपल्यास समजते की ते परब्रह्म आहेत. पाच मूलभूत तत्त्वांनी बनलेल्या पूर्ण सृष्टीचा तो स्वामी आहे. भक्तांना त्याच्यापर्यंत सहजपणे पोचता येते. कोणत्याही पूजाविधीच्या, कार्याच्या सुरुवातीला त्याची प्रथम पूजा केल्याने त्यास खूप आनंद होतो. दुर्वांनी पूजा करणाऱ्या मनुष्यास तो अष्टसिद्धी प्रदान करतो. पूर्ण विश्वासाने आणि भक्तीने आपण सदबुद्धीसाठी त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. चांगली बुद्धी का हवी? जेव्हा आपल्याजवळ चांगली बुद्धी असते तेव्हाच आपण यश संपादन करू शकतो. चांगल्या बुद्धीमुळे मुलांच्या मनावर चांगले संस्कार होतात तसेच उदात्त असे गुण त्यांच्यामध्ये ठसतात हे एक सर्वश्रुत असे सत्य आहे. यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. पालकही चांगली बुद्धी असलेल्या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. त्यामुळे ते भविष्यात चांगले नागरिक बनतात आणि वृद्धापकाळात सर्वजण त्यांची प्रेमाने काळजी घेतात. परिणामी, संपूर्ण कुटुंबच शांततापूर्ण आणि आनंदी होते. याद्वारे संपूर्ण समाज सुधारतो आणि समृद्ध होतो. हे सर्व मिळविण्याचे मूळ म्हणजे ‘चांगली बुद्धी.’ गणपती चांगली बुद्धी प्रदान करतो, त्यामुळे आपण त्याला कधीही विसरू नये. ‘सिद्धिदूत, बुद्धिनाथ, सिद्धिनायक’अशा विविध नावांनी आपण त्याची कायमच स्तुती केली पाहिजे. तो मूलाधाराचा, मूलचक्राचा स्वामी आहे. निमित्त आणि परिणाम ह्यांचा तो मूलाधार आहे. तो आपल्या भक्तांना यश प्राप्त करून देतो. म्हणूनच प्रत्येकाने आजच्या दिवशी या देवाची पूजा केली पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळवायला पाहिजेत. या दिवशी विविध प्रकारच्या पानांनी त्याची पूजा केली जाते. हे निसर्गाच्या संरक्षणासाठी आहे. जर निसर्ग शांत असेल तर मुसळधार पाऊस पडेल. अशा प्रकारे सर्व तत्त्व एकमेकांशी जोडलेली आहेत. गणपती हे निसर्गाचे मूलतत्त्व आहे. पुढील नावांच्या पठणाने त्याची उपासना केली पाहिजे- ॐ गणंजयाय नम:। ॐ गणपतये नम:। ॐ हेरंबाय नम:। ॐ धरणीधराय नम:। ॐ महागणपतये नम: । ॐ लक्षप्रदाय नम: । ॐ क्षिप्रप्रसादनाय नम:। ॐ अमोघसिद्धये नम:। ॐ अमिताय नम:। ॐ मंत्राय नम:। ॐ चिंतामणये नम:। ॐ निधये नम:। ॐ सुमंगलाय नम:। ॐ बीजाय नम:। ॐ आशापूरकाय नम:। ॐ वरदाय नम:। ॐ शिवाय नम:। ॐ काश्यपाय नम:। ॐ वंदनाय नंदनाय नम:। ॐ वाचासिद्धाय नम:। ॐ धुंडिविनायकाय नम:। जो २१ नावांसह त्यांचे स्मरण करतो त्याच्या प्रतिष्ठेस कधीही काळीमा लागत नाही. त्यांना चांगले ज्ञान, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळते. वरसिद्धी विनायकांच्या कृपेने सर्वांना सद्बुद्धीचा आशीर्वाद मिळो! प्रत्येक अंतःकरण सात्त्विकता आणि शांतीने भरू दे! सर्व गोंधळ, अशांती आणि प्रक्षुब्धता ह्या जगातून नाहीशी होऊ दे आणि जगात शांती नांदू दे !!
॥ ओम शांती शांती शांती ॥