SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 20 Dec 2020
समता आणि परस्परांमधील सुसंवाद, सामंजस्य हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे

दत्तजयंती सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी स्वामीजींनी विष्णू-दीप प्रज्वलित केले. दत्त हा एक परिपूर्ण अवतार आहे. ते आपल्याला सर्वोच्च असे ज्ञान प्राप्त करण्याचा आशीर्वाद देतात. दत्ताचे महत्त्व समजून घेण्यासाठी भगवान दत्तात्रेयांच्या आयोजित होणाऱ्या उत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिक आमंत्रणाची वाट न पाहता प्रत्येकाने स्वत:हून सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मानवी शरीर तीन प्रकारची असतात - स्थूल, सूक्ष्म आणि कारण. ह्या सर्व शरीरांच्या दु:खातून दत्तात्रेय आपल्या भक्तांना मुक्त करतात. त्यांच्या आशीर्वादाने तीन गुणांमुळे (त्रिगुण) उद्भवलेल्या बंधनांपलीकडे असलेली अवस्था प्राप्त होते. (त्रिगुण म्हणजे चांगुलपणा, वासना आणि जडत्व यांचे गुणधर्म.)
आपल्यापैकी प्रत्येकच व्यक्ती आपल्या गतकाळातील कर्मांचे फळ भोगत असतो. हे भोग तीन स्वरूपांमध्ये उत्पन्न होतात - इच्छा, परेच्छा आणि प्रारब्ध. म्हणजे एखाद्याने स्वत:च्या इच्छेने केलेल्या कर्मांचे फळ भोगणे; इतरांच्या प्रभावामुळे केलेल्या कर्मांचा परिणाम भोगणे आणि पूर्वजन्मीच्या कर्मांचे परिणाम जे आता भोगायचे आहेत. या तीन प्रकारच्या भोगांपासून उत्पन्न होणाऱ्या त्रासांतून आणि पीडादायक अनुभवांतून दत्त महाराज आपल्या भक्तांना मुक्त करतात.

भगवान दत्तात्रेयांनी केवळ मानवांनाच नव्हे, तर गंधर्व, किन्नर आणि असुरांनाही मुक्ती दिली आहे. ते सर्व गुरूंचे गुरू आहेत.

पूर्वी, ते औदुंबर वृक्षाखाली प्रकट होऊन योग्यता असलेल्या शिष्यांना आध्यात्मिक ज्ञान देत असत. तथापि, कलियुगामध्ये, लोकांमध्ये इतकी एकाग्रता आणि भक्ती राहिलेली नाही. ते काय बोलतात आणि काय करतात हे मोठ्या प्रमाणात लोकांना माहीतच नसते. योग्य प्रकारे लक्ष केंद्रित न केल्यामुळे त्यांना सदगुरूंच्या शिकवणीचे आकलन नीटपणाने होत नाही . जगात सामंजस्य, सुसंवाद कमी होत चालला आहे आणि लढाया, भांडणे मात्र जास्त होत आहेत. तथापि दत्तगुरू मात्र समतेची भावना किंवा समत्व भाव ह्यांना महत्त्व देतात. सर्व जीव हे देवाचीच मुले आहेत - हा मानवजातीसाठी दत्त महाराजांचा संदेश आहे. सर्व लोकांच्या मनामध्ये ही कल्पना बिंबवणे आणि विकसित करणे हाच त्यांच्या अवताराचा मूळ उद्देश आहे.

परस्परांना समजून घेणे हेच आनंदी जीवनाचे खरे रहस्य आहे. घरामध्ये, व्यापारामध्ये किंवा अगदी कोणत्याही प्रकारचे काम करण्यामध्ये व्यवहार करण्यासाठी हे सामंजस्याचे तत्त्व अंगीकारणे महत्वाचे आहे. ज्यांना हे उमगत नाही, जे अजूनही अज्ञानी आहेत आणि अविश्र्वासाने त्यांचे मन भरून गेले आहे, अशा बहुतांश लोकांचा मौल्यवान असा मानवी जन्म व्यर्थ ठरला आहे.

लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की स्वामीजी त्यांच्या फायद्यासाठीच उपक्रम घेत असतात. अनुयायांनी स्वामीजींच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. स्वतःच्या दृष्टीकोनातून गुरूंकडे पाहणे ही सर्वसामान्य प्रवृत्ती असते. परंतु हे योग्य नाही. आध्यात्मिक गुरूंना सर्वसामान्य माणूस मानू नये. आध्यात्मिक गुरू दिव्य असतात. दत्तात्रेयांच्या जीवनावरून आपण असे पाहिले आहे की ते विविध प्रकारच्या लोकांना आपले शिष्य म्हणून स्वीकारतात. असाच ‘विष्णू दत्त’ नावाचा एक निस्वार्थी भक्त होता; कार्तवीर्य नावाचा एक वीर राजा होता, ज्ञानाचा प्रामाणिक साधक पिंगलानाग आणि एक धार्मिकवृत्तीचा दैत्यराज प्रल्हाद. हे सर्व दत्ताचे भक्त होते. एक सम्राट, एक सामान्य माणूस, एक विद्वान, एक निरक्षर व्यक्ती, एक श्रीमंत मनुष्य, एक गरीब मनुष्य या सर्वांना दत्त महाराज आश्रय देतात. त्यांच्या त्यांच्या आकलनशक्तीनुसार, ते त्यांना उपदेश करतात.

थेट सद्गुरूंकडून तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आध्यात्मिक अनुभवाशिवाय केवळ पुस्तकी ज्ञान घेणे हे धोकादायक असते. चार अंध व्यक्ती हत्तीजवळ जातात आणि हत्तीला हात लावतात. एक माणूस त्या हत्तीच्या पायाला स्पर्श करतो आणि म्हणतो की हा हत्ती म्हणजे एक खांब आहे. दुसरा त्याच्या पोटाला स्पर्श करतो आणि म्हणतो की हा म्हणजे एक प्रचंड आकाराचा पिंप आहे. तिसरा शेपटीला स्पर्श करतो आणि त्याला तो हत्ती झाडूप्रमाणे वाटतो आणि शेवटचा त्या हत्तीच्या मोठाल्या कानांना स्पर्श करतो आणि म्हणतो हा धान्य पाखडण्याचे सूप आहे. आणि मग त्यांच्यामध्ये भांडण लागते. शेवटी त्यांचे भांडण एक सुज्ञ माणूस सोडवतो आणि त्यांना समजावतो की त्यांनी स्पर्श केलेले भाग हे त्या हत्तीचेच विविध अवयव आहेत. आणि ते सर्व एकाच हत्तीच्या शरीराचा भाग आहेत.

म्हणूनच त्याचे पूर्ण स्वरूप समजून घेणे आवश्यक ठरते. दत्तगुरूंनी दिलेले हे ज्ञान म्हणजे एक परिपूर्ण असे तत्त्वज्ञान आहे. विविधतेमध्ये एकता पाहायला हवी. अशा प्रकारे भगवान दत्तात्रेय आपल्या अंतरंगात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करोत. दत्त आपल्याला प्रापंचिक कल्याण, संपूर्ण ज्ञान आणि मोक्षाचा आशीर्वाद देओत. ते एकाच ठायी त्रिमूर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे आहेत.

‘नीतिमाला’ या आश्रमाच्या प्रकाशनामध्ये दत्तगुरूंच्या शिकवणींचा समावेश आहे. याचा चांगल्या रीतीने अभ्यास करा. संपूर्ण ज्ञानप्राप्ती करण्याचा हा सोपा मार्ग आहे. त्यातील उपदेशांचे अनुसरण केल्याने तुमच्या शारीरिक समस्या तसेच मानसिक पीडादेखील दूर होतील. दत्तात्रेयांच्या उपदेशांचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ह्यातील मुख्य शिकवण म्हणजे दृष्टीकोनातील समानता, ज्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. तुम्ही भगवद्‌-गीता, विष्णू सहस्रनाम किंवा इतर कोणत्याही पवित्र पुस्तकाचे पठण करताना, कोणतेही धार्मिक विधी करताना किंवा कुठल्याही मंदिराला भेट देत असताना नेहमी दत्तात्रेयांचे स्मरण करा. विविध देवतांच्या स्वरूपात तुम्ही दत्तगुरूंचे स्मरण करा. दत्तगुरू आपल्या सर्वांना आशीर्वाद देओ!

दत्तजयंती १९९८

Tags: