भगवान दत्तात्रेय योगी आणि अवधूत दोन्हीही आहेत. ते आपल्या शिष्याचे मार्गदर्शन आणि संरक्षण विविध प्रकटीकरणाद्वारे करत असतात. या कलियुगामध्ये ते क्षिप्र-प्रसादी म्हणजे त्वरेने इच्छापूर्ती करणारे असे आहेत.
माणूस सत्यप्रिय असो किंवा खोटारडा; साक्षर असो वा निरक्षर; गरीब असो किंवा श्रीमंत; आस्तिक असो वा नास्तिक, गृहस्थ जीवन जगणारा असो वा संन्यासी; भगवान दत्तात्रेयांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी ती व्यक्ती कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या भावनेने त्यांच्याकडे जाते हे महत्त्वाचे असते. जर ती व्यक्ती योग्य दृष्टीकोन ठेवून आणि योग्य रीतीने भगवंताला शरण गेली तर भक्ताला त्यांची कृपा प्राप्त करण्यास वेळ लागत नाही.
भक्ताने अहिंसेचे पालन केले पाहिजे. (अहिंसा म्हणजे विचार, शब्द किंवा कृती यांपैकी कोणत्याही माध्यमातून इतरांना इजा न पोहोचवणे.) तसेच कायमच सत्य आणि न्याय्य वृत्तीचे पालन केले पाहिजे. भक्ताचा भगवंताला जाणून घेण्याचा आणि त्याची अनुभूती घेण्याचा मार्ग जर प्रामाणिक आणि खरा असेल तर त्यास लवकरच दत्तकृपा प्राप्त होते. अशा प्रकारे, भक्तांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच प्रकारच्या इच्छा एकाच वेळी पूर्ण होऊ शकतात. राजा कार्तवीर्यार्जुनाची कथा या गोष्टीची साक्ष देते.
भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास त्या व्यक्तीच्या ठायी शाश्र्वत सत्य असलेल्या ज्ञानाचा उदय होतो. त्यामुळे तो सर्व प्रकारे भयमुक्त होतो. त्याच्या गतजन्मातील तसेच भूतकाळातील सर्व कर्मांच्या परिणामांच्या बंधनातून तो मुक्त होतो, त्याला परमानंदावस्था प्राप्त होते. अंधकाराच्या, अज्ञानाच्या खोल गर्तेत घसरण्याची भीती दूर होते. भगवान दत्तात्रेय अत्यंत कृपाळू आहेत. ते सदैव कृपा करत असतात. ही कृपादृष्टी ओळखून तुम्हाला ती प्राप्त व्हावी याकरिता स्वत:ला तयार करा.
(भक्तिमाला जून 1980 ह्या अंकातून - 11-05-1980 रोजी दिलेले प्रवचन.)