आत्मबोध प्राप्त करण्यासाठी, चित् शक्ती (चैतन्य शक्ती) वर नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. ही सूक्ष्मातील सूक्ष्म अशी चेतना आहे. त्यासमान किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतीही शक्ती नाही. ही ऊर्जा कोठे असते? यावर कोण प्रभुत्व मिळवू शकेल आणि कशा प्रकारे? आध्यात्मिक साधकांच्या मनात हे असे प्रश्न उभे राहतात. परंतु ह्या प्रश्नांना तयार असा उत्तरांचा संच नाही.
या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी मांडूक्य उपनिषदाचे अनुसरण करायला लागेल. त्यानुसार ज्याने धर्मग्रंथांचे ज्ञान आत्मसात केले आहे, तसेच जो पूर्णपणे त्या जाणिवेत स्थिर असतो अशा आत्म साक्षात्कार झालेल्या गुरूचे अनुसरण करावे. मानवामध्ये चित् शक्ती प्रकट होण्याचे असंख्य मार्ग आहेत. अतिशय सू्क्ष्म आणि गतिमान अशा विद्युत प्रवाहाला आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. शरीर त्याच्या पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय तसेच मन आणि बुद्धीसह गतिशील असल्याचे दिसून येते कारण ते सर्व त्या चित् शक्तीच्या सानिध्यात कार्यरत असतात. केवळ एक प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध मन त्याच्या मूळ स्रोताकडे वळून त्याच्याबरोबर एकरूप होते.
या सुप्तावस्थेतील चित् शक्तीला जागृत करण्यासाठी दिव्य नाम संकीर्तन किंवा नाम जप, मंत्रपठण करणे ह्या सिद्ध आणि यशस्वी अशा पद्धती आहेत. पूर्णपणे भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने जर भजन गायले तर संपूर्ण सृष्टीमध्ये एक प्रकारचे चैतन्य पसरते. त्यावेळी आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात. प्रत्यक्षात हेच मानवी अस्तित्वाचे एकमात्र लक्ष्य असते.
(भक्तिमाला फेब्रुवारी १९८२)