तहान, भूक, झोप, क्रोध या आणि इतर भावनांचा अनुभव सर्व माणसांनी वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवला आहे. जेव्हा ही लक्षणे अधिक बळावत जातात तेव्हा मन चिडचिडे होते आणि मग मनाचा समतोल ढासळतो. त्याचे परिणामस्वरूप त्या व्यक्तीला सारे जग फसवे वाटू लागते. तो भ्रमित होतो आणि मग हळूहळू निष्क्रिय बनत जातो.
म्हणूनच अज्ञानरूपी निद्रेतून जागृत होण्यातच त्याचे हित असते. या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी त्याने परमेश्र्वरावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे जसजसे वाढत जाते, तसतशी त्याला दैवी ज्ञानाची अनुभूती येऊ लागते, ज्यायोगे त्याची मानसिक शांतता वाढते आणि जीवनात समाधानदेखील वाढते.
या ईश्वरीय ज्ञानामध्ये परिपूर्ण होण्यासाठी आपण ज्ञानी गुरूंकडे जाणे अत्यावश्यक आहे, कारण गुरूंच्या कृपेशिवाय कोणीही परिपूर्ण होऊ शकत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या गुरूंनी दिलेल्या सूचना अतिशय काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत आणि त्या आत्मसात केल्या पाहिजेत.
आध्यात्मिक मार्गातील उन्नतीसाठी सत्संग आणि दिव्य नाम संकीर्तन (नामस्मरण) हे दोन विश्वासार्ह असे साहाय्यक आहेत. ते जेव्हा योग्य पद्धतीने वापरले जातात तेव्हा ते त्या व्यक्तीला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकतात! शंकर भगवद्पादाचार्यांनी असे सांगितले आहे ना -
सत्संगत्वे निस्संगत्वं निसंगत्वे निर्मोहत्वम् ।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवनमुक्तिः ॥
(भक्तीमाला मे १९८०)