जेव्हा एखाद्याचे पोट दुखत असते तेव्हा कोणते डॉक्टर, कोणते औषध, कोणता गुरू किंवा कोणता मंत्र याची त्यांना पर्वा नसते. लवकरात लवकर बरे व्हावे असेच फक्त त्याला वाटत असते. त्यात काहीही चूक नाही. स्वामीजी आपले हे आरामदायी संगीत त्या रुग्णाला दिलासा मिळावा यासाठी वापरतात. हे नियमित वैद्यकीय उपचारांना पूरक असे आहे. लोकांना मी नेहमी हेच सांगतो. या कल्याणी रागाने पोटदुखी बरी होईल, असे स्वामीजींनी कधीही म्हटले नाही. मीच नादाचा शोध लावला असे समजू नका. ही प्राचीन राग रागिणी विद्या आहे. हे एक स्वर्गीय असे संगीत विज्ञान आहे. मी तेच उपयोगात आणतो. त्यात गैर ते काय आहे? आपल्या ग्रंथ शास्त्रांमध्ये संगीताशी निगडित बऱ्याच कथा आहेत, तसेच अलीकडच्या काळातील अभ्यासकांनीदेखील हे मान्य केले आहे की चांगल्या संगीताचा खूप चांगला परिणाम होतो. संगीतामुळे गायींनी जास्त दूध दिले किंवा संगीताने फुलांना खूप चांगला बहर आला, तसेच दीपक राग गायल्यामुळे दिवे प्रज्वलित झाले. या काही सर्व दंतकथा नाहीत. या सत्य कथा आहेत. किंबहुना त्या कथा नाहीतच. त्यात तथ्य आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञ या परिणामांचा अनुभव घेत आहेत आणि याबाबतीत त्यांचे प्रयोगदेखील सुरू आहेत. स्वामीजी असेही सांगतात की नुसते कौतुक करणे किंवा दाद देणे इतकेच पुरेसे नाही. तर तुम्ही त्यात सहभागीदेखील झाले पाहिजे आणि त्याचा अनुभवदेखील घ्यायला पाहिजे. ‘नाद’ हा प्रत्येकासाठी आवश्यकच आहे. नादाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. नादामुळे एकाग्रतेचा चांगला विकास होऊन लवकर रोगमुक्त होण्यात मदत होते. प्रकृती लवकर सुधारावी यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील उपचारांच्या गुणधर्मांना नादामुळे बळ मिळते. हा दृष्टीकोन आपल्या मनात दृढ होणे आवश्यक आहे. (प्रश्नोत्तर - यूएसए, २९ जुलै २०११)