SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25-12-2020
मृत व्यक्ती जर पुनर्जन्म घेत असेल तर आपण पितरांसाठी जे वर्षश्राद्ध विधी करतो, ते त्या मृतात्म्यापर्यंत पोचतात का?

पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य करून तुम्ही आपल्या धर्मग्रंथांवरील आपल्या विश्वासाची कबुली देत आहात. त्याच धर्मग्रंथांनी हे विधी करण्याची आज्ञा दिली आहे. मग तुमच्या मनात शंका का येत आहे?

आता प्रश्न हा आहे की आपले ‘धर्मग्रंथ आपल्याला हे विधी करण्याची आज्ञा का देतात?’ उदाहरणादाखल असे समजू की तुमच्या मित्राने तुमच्यासाठी चांगली नोकरी शोधली आहे. त्याप्रीत्यर्थ तुम्ही त्याला मिठाई वाटून आनंद व्यक्त करता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळाल्याबद्दल तुमच्या मनात त्या मित्राबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होईल.

जर या छोट्या उपकारासाठी तुम्ही तुमच्या मित्राप्रति इतके ऋणी असाल तर हे शरीर आपल्याला देणाऱ्या आपल्या पालकांप्रति, पूर्वजांप्रति आपण किती जास्त ऋणी असले पाहिजे? हे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आपण वार्षिक संस्कार केले पाहिजेत. या कृतीतून, विधींमधून त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असलेली कृतज्ञता तुम्ही व्यक्त करत असता.

‘मेलेले लोक खाऊ शकतात का?’ – हा प्रश्न गैरलागू आहे. ‘ते स्वर्गात आहेत की नरकात’- हे तुमच्यासाठी अनावश्यक आहे. ‘त्यांनी यापूर्वीच पुनर्जन्म घेतला आहे का?’ – ह्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. ते जिथे कोठे आणि जसे आहेत तिथे आपण त्यांच्याप्रीत्यर्थ आभारी असणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रेमळ आठवणी आपल्या हृदयामध्ये जतन करण्यासाठी आणि त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे विधी करायचे असतात.

(भक्तिमाला ऑक्टोबर १९९७)

Tags: