ज्या क्षणी आपल्या मनात आध्यात्मिक उन्नतीची आस लागते, त्या क्षणी अध्यात्मिक गुरूचा शोध आपोआपच सुरू होतो. यासाठी कुठल्याही बाह्य प्रभावाची आवश्यकता नसते. जेव्हा अशा भावना व्यक्तीमध्ये उत्पन्न होतात, तेव्हा तो गुरूंना केवळ स्वत:पुरतेच मर्यादित ठेवत नाही. आपोआपच तो आपल्या मुलांनादेखील दीक्षा देतो. एखाद्या मजुराचे उदाहरण घेतल्यास, आपला मुलगा उच्च शिक्षित असावा अशी कुठल्याच मजुराची इच्छा नसते. कारण मुळात शिक्षणाचे महत्त्व त्यालाच समजत नसते. याउलट सुशिक्षित पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये पाठवतात आणि अभ्यास चांगला करण्यासाठी प्रोत्साहित करतात. पालकांवरील प्रेमामुळे मुले लहान वयापासूनच शाळेत जाऊ लागतात. आणि जोपर्यंत शिक्षणात ते एखादी विशिष्ट उंची गाठत नाहीत, तोपर्यंत ते अभ्यास सुरूच ठेवतात. आध्यात्मिक शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा हेच तत्त्व लागू होते.
(आंध्र प्रभा मासिक नोव्हेंबर१९९२)