SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25-12-2020
देव खरोखरच अस्तित्वात आहे का? इतरांनी माझी चेष्टा केली तरी मी उपासना चालू ठेवावी का?

हे पूर्णपणे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमच्या मनाची क्षमता अमर्याद असते. परमेश्र्वर खरोखरच अस्तित्वात आहे की नाही हा गौण मुद्दा आहे. जर तुमच्या मनातून तुमचा त्याच्या अस्तित्वावर विश्वास असेल तर तुम्ही सहजपणे त्याची उपासना करू शकता. एखाद्या व्यक्तीचा परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नसल्यास तो तितक्या मनापासून उपासना करू शकत नाही. जरी इतर लोकांनी त्याला असंख्य मार्गांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी अशा व्यक्तींच्या मनामध्ये देव अस्तित्वातच नाही हे अगदी ठाम बसलेले असते. त्यांचे नशीबच असे बनवले गेले असते. त्याच्या सर्व कृतीदेखील त्याच अनुषंगाने असतात. दुसरीकडे, तुमचे मन तुम्हाला म्हणत असते की देव अस्तित्वात आहे, आणि म्हणून तुम्ही सहजपणे आणि मनापासून त्याची उपासना करू शकता.

म्हणूनच, केवळ इतर काही लोक भगवंताची उपासना करत नाहीत म्हणून तुम्ही परमेश्वराची उपासना करणे सोडू नका. किंबहुना या विषयावर चर्चा किंवा वादविवाददेखील घालण्यास आपण जाऊ नका. तुमची मानसिकता दोलायमान होऊ देऊ नका. तुमच्या मनाला पटते आहे ना, मग तुम्ही उपासना चालूच ठेवा.

प्रत्येकजण त्याच्या स्वत:च्या मार्गानुसार प्रवास करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा. नवरा बायको यांचादेखील जीवनाचा प्रवास हा स्वतंत्रच असतो. आपल्या कुटुंबीयांपैकी कोणीही आपल्याबरोबर मृत्यूनंतरच्या प्रवासाला येत नाही. आपण पृथ्वीवर आहोत म्हणून परस्परांशी सौहार्दपूर्ण संबंध जोपासून एकाच कुटुंबातील सदस्य या नात्याने एकाच छताखाली राहत आहोत. देवाने आपल्याला काही ठरावीक उद्देशाने एका छताखाली आणले आहे हे लक्षात घेऊन आपण कुटुंबात एकत्र राहतो. अन्यथा, प्रत्यक्षात विचार करायचा झाल्यास आपण सगळे स्वतंत्रपणे प्रवास करत आहोत.

दररोज सकाळी उठल्यावर परमेश्वराची उपासना करावी असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तसे अवश्य करा. त्याची उपासना करा. इतर लोक काहीही म्हणत असले तरी तुम्ही तुमची उपासना पूर्ण करा. कोणाच्याही बोलण्याने किंवा चेष्टेने डगमगून न जाता तुम्ही पूजा करा. तुम्ही आपल्या मतावर ठाम राहा.

(प्रश्नोत्तर सत्र १३ डिसेंबर २०१५)

Tags: