SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 16-11-2014
हिरा दुवुरी, बॅटन रुज यू एस ए

“वाईट किंवा चांगलं काहीही नसते, यातील काहीही अस्तित्वात नसते, ही संपूर्ण रचना तुमच्या मनाची निर्मिती आहे, ती खरी नाही.”

मी श्री स्वामीजींना पहिल्यांदा १९९८मध्ये बॅटन रूजच्या मंदिरात भेटले. मला लहान मुले खूप आवडतात आणि मी तरुण मुलगी म्हणून मोठी होताना मला वाटत होते कि मला खूप मुले असावीत. माझे लग्न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मला मुले हवी होती. नऊ वर्ष होऊन गेली परंतु आम्हाला मुल झाले नाही. डॉक्टरांनी आम्हाला मूल दत्तक घेण्यास सांगितले. आम्ही एक लहान मुलगी दत्तक घेतली आणि मला खूप आनंद झाला. जेव्हा ती तीन वर्षाची झाली तेव्हा आम्ही एक मुलगा दत्तक घ्यायचे ठरविले, त्याचवेळी आम्हाला चकित करणारी गोष्ट घडली - मी गरोदर होते. मला मुलगा झाला. मी मुलांसाठी खूप वाट बघितली असल्याने मी त्यांच्यात खूपच गुंतून गेले. मी त्यांच्याद्वारे माझी स्वप्न पूर्ण करू लागले, संगीत, नृत्य आणि मुलासाठी वेदपठण. त्यांना जे जे काही शिकवत गेले त्या सगळ्यात ते उत्कृष्ठ कामगिरी करत होते. त्यांनी ह्यूस्टनमध्ये नृत्याचा कार्यक्रम केला होता अजूनही लोक त्याबद्दल बोलतात. जेव्हा मी त्यांचा अभिनय बघायची तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. जागृत असलेल्या प्रत्येक क्षणी मी त्यांच्याबद्दल विचार करायची आणि सगळे काही त्यांच्यासाठी करायची. कॉलेजमध्ये असताना माझ्या मुलीला तिचा जोडीदार मिळाला तिचे लग्न झाले ती कॅलिफोर्नियाला गेली. मला तिची खूप आठवण यायची. आमचा मुलगाही कॉलेजला जाण्यासाठी निघून गेला. मला त्याची खूप आठवण यायची आणि मला माझ्या आयुष्यात एक पोकळी जाणवू लागली. मी माझी सगळी ऊर्जा मुलांवर केंद्रित केली होती आणि या प्रक्रियेत मी स्वतः:ला विसरले होते. आता मी माझ्याबरोबर उरले होते, जी माझ्यासाठी अनोळखी व्यक्ती होती. मला तणाव आणि नैराश्याने असुरक्षित वाटू लागले.

माझ्या आयुष्यात सर्व भौतिक सुखसोयी होत्या, पण मला खूप एकटं वाटत होतं . माझ्या जवळच्या लोकांबरोबर अप्रिय घटना घडल्या आणि त्यामुळे मला खूप त्रास झाला. मी वेदनेचा सामना करू शकले नाही आणि माझं नैराश्य वाढलं. माझी अवस्था दिवसेंदिवस बिघडत गेली आणि मी अशा अवस्थेत पोहोचलो कि मी कोणाशीही बोलत नव्हते अगदी फोनवर सुद्धा बोलत नसे. मला जगायचं नव्हतं. माझ्यावर किती अन्याय झाला होता याचा विचार करून मी रागाने पेटून निघायची, क्रोधात जळून जायची आणि कोणालाही क्षमा करणं मला खूप कठीण जात असे. त्यांचे चेहरे मी कधीच पाहू नये याची मी स्वत:ला खात्री पटवून द्यायची.

एके दिवशी श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींच्या एका भक्ताने माझ्या पतींना फोन केला, सविस्तर बोलल्यानंतर मला त्यांच्या घरी घेऊन येण्यास सांगितलं. माझ्या पतीने मला समजावून सांगितले आणि मी तिथे गेले. हा माणूस मानसोपचारतज्ज्ञ होता आणि त्यांना माझ्या प्रकृतीबद्दल माझ्याशी बोलायचं होतं. ते म्हणाले की, मला उपचारांची गरज आहे, नाहीतर मी स्वतः:ला काहीतरी इजा/ हानी करू शकते कदाचित आत्महत्याही करेन. त्यांनी मला दुस-या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. मी तिथे गेले आणि तपासणीनंतर त्यांनी मला नैराश्य कमी होण्यासाठी औषध दिली.

कालांतराने तो डोस वाढत गेला त्यांनी मला सांगितले की, एक दिवसही गोळ्या घेण्यास चुकू नका , कारण ते माझ्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. ते म्हणाले कि की, मला आयुष्यभर औषध घ्यावं लागेल. गोळ्यांच्या गंभीर दुष्परिणामांमुळे मी गाडी चालवू शकत नव्हते. मला एका संस्थेत ठेवण्याची विनंती मी डॉक्टरांना अनेकदा केली, पण एकदा आत गेल्यावर मी कधीही बाहेर पडू शकणार नाही, असं म्हणून त्यांनी नकार दिला. माझं स्वत:पासून संरक्षण करण्यासाठी गोळ्यांवर अवलंबून मला माझं आयुष्य जगावं लागत होतं. माझ्या आयुष्यात काहीतरी हरवल्यासारखंवाटत होतं , माझ्यातली ही पोकळी मला जाणवत होती परंतु ते काय होतं ते मला समजत नव्हतं.

मग तो शुभ दिवस आला. श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजीं गुरू पौर्णिमेच्या उत्सवासाठी बॅटन रूजला भेट देणार आहेत अशी जाहिरात करणारे पत्र मला मिळाले मी कार्यक्रमाला गेले आणि त्यांच्या डोळ्यांत पाहिल्यावर अंत:प्रेरणेने मला जाणवले की ते माझे गुरू आहेत. मला असं वाटलं की, आमचं भूतकाळातील काहीतरी नातं आहे आणि त्यांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत होतं. त्यांना काहीही सांगण्याची गरज मला वाटली नाही. शब्दाची गरज नव्हती. मग माझ्या मनाने उसळी मारली आणि माझे आयुष्य विश्वासाने त्यांच्या हातात सोपविण्याची काही तर्कशुद्ध कारणं माझ्या मनाने मागितली. त्यानंतरच्या काही महिन्यांत त्यांनी मला ते कोण आहेत याचा पुरावा देऊन त्यांना माझे गुरू म्हणून स्वीकारणं सोपं केलं.

त्यांच्याशी असलेला मला जाणवलेल्या संबंधामुळे काही महिन्यातच मी म्हैसूरमधल्या त्यांच्या आश्रमात आले. तिथे ते माझ्याशी बोलले नाहीत , पण त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हळुवारपणे माझ्या नैराश्याचे काळे ढग बाजूला केले आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. माझ्यातील जडत्व निघून गेले होते. मी पुन्हा हसू लागले होते, जे मी गेल्या काही वर्षांत केलं नव्हतं. मौनपणे त्यांनी माझ्या मनाच्या आणि हृदयाच्या वेदना दूर केल्या. या मूक शक्तीने मी मंत्रमुग्ध झाले. मी माझी सर्व औषधं कचऱ्यात फेकली. मला पुन्हा त्यांची गरज नव्हती. श्री स्वामीजींची मी ऋणी आहे. त्यांनी माझा जीव वाचवला.

दोन महिन्यांनंतर मी भारतात परतले. मी त्यांची पाद्यपूजा केली आणि ते म्हणाले , “मला तुझ्याबद्दल सांग.” मी त्यांना सांगितलं, “मी खूप आनंदी आहे , मला एक मुलगी आहे, माझा नवरा खूप चांगला आहे आणि माझा मुलगा कॉलेजमध्ये आहे.” मी एवढंच बोलले. या वेळी मी मेकेदाटूतील क्रिया योगाच्या कोर्सला उपस्थित राहिले. अध्यात्मिकतेत त्याचा मला खूप फायदा झाला. माझे पतीही श्री स्वामीजींना भेटले आणि तेही त्यांच्यावर प्रेम करू लागले. श्री स्वामीजींच्या संगतीत असणे हा खरोखरच एक मोठा आशीर्वाद आहे.

मी आणि माझे पती अनेक वर्षांपूर्वी प्रत्येकी दोन सुटकेस घेऊन अमेरिकेला आलो होतो. तेव्हापासून आम्ही घरं, गाड्या, पैसा आणि इतर ऐहिक गोष्टींसह आमची मालमत्ता वाढवली होती. आता श्री स्वामीजींना भेटल्यानंतर आम्ही या सर्व गोष्टींचे ओझे हलके केले आहे आणि आमच्याकडे आमच्याबरोबर फक्त श्री स्वामीजी आहेत. आमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना वाटते की, हे असे करणे मूर्खपणाचे आहे , पण आम्ही त्यांना सांगतो की जेव्हा आपल्याकडे श्री स्वामीजी असतात तेव्हा आपल्याकडे सर्व काही असते.

श्री स्वामीजींनी मला सांगितले आहे की हे जग केवळ माया आहे. माझ्या भूतकाळातील चुकांमुळे माझ्यात अपराधीपणाचा अवशेष उरला होता. एके दिवशी माझ्या एका ध्यानात ते मला म्हणाले , ““वाईट किंवा चांगलं काहीही नसते, यातील काहीही अस्तित्वात नसते, ही संपूर्ण रचना तुमच्या मनाची निर्मिती आहे, ती खरी नाही.” मी म्हणाले, “हे खरं नाही हे मी मान्य करते , पण आत्ता तुमच्याशी बोलणाऱ्या या ‘मी'चं काय?” ते म्हणाले, “हासुद्धा भ्रम आहे, ते तिथे नाही.” त्या क्षणी मी अनुभव घेतला कि ‘मी’ विरघळून गेले आणि उरला तो फक्त परम आनंद. काहीही अस्तिस्त्वात नाही. या त्यांनी दिलेल्या अनुभवानंतर, मी आणखी काही कसे काय मागू शकेन ?

माझ्या अनुभवामुळे मी श्री स्वामीजींच्या प्रवचनाचे इंग्रजीत भाषांतर करू लागले. एके दिवशी मी श्री स्वामीजींचा थेट प्रक्षेपित कार्यक्रम ऐकण्यासाठी बसले. त्यांची अमृत वाणी ऐकण्याच्या प्रत्येक संधीचा मी लाभ घेत असे. मी बसून ऐकलं, पण श्री स्वामीजी काय सांगत होते त्यातील एकही शब्द मला समजू शकला नाही. त्या दिवशी वेबकास्टची ध्वनीची(audio) गुणवत्ता खूपच वाईट होती. मी निराश झाले आणि अचानक माझ्या लक्षात आलं की, श्री स्वामीजी बोलत असलेली भाषा समजत नसली कि भक्तांनासुद्धा असंच वाटत असेल. त्या दिवसापासून मी ही सेवा करण्याचा मनापासून प्रयत्न करते. खरं तर मी फक्त पोकळ बासरी आहे आणि सूर ते आहेत.

श्री स्वामीजींनी मला शोधून काढले आणि माझा उद्धार केला. त्यांनी मला एक नवं आयुष्य दिलं, ज्यात अर्थ आणि उद्दिष्ट भरलेली होती. ज्यांनी मला वेदना दिल्या त्या सर्व लोकांचे मी आभार मानते , कारण त्या वेदनेमुळेच मला त्यांच्या चरण कमलांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळाली. मी त्यांच्या निर्देशानुसार दररोज जगते आणि सर्व काही त्यांच्या दैवी योजनेनुसार घडत राहते.

जय गुरू दत्ता

Tags: