SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 23-12-2020
०२ अगस्त्य सैक्रीट

एखाद्याचा वियोग हा अतिशय क्लेशदायी असते, एखाद्या दुखण्यासारखे असते. स्वत:च स्वत:ला त्यातून बाहेर काढायचे असते. खरे दुखणे हे असते की ज्याने आपली निर्मिती केली त्या भगवंतापासून आपणच स्वत:ला वेगळे समजायला लागतो. आपला अंतरात्मा हा त्या दिव्यात्मा परमेश्र्वरापेक्षा वेगळा आहे असे समजतो. श्री स्वामीजींनी मला त्या दिव्यात्म्याशी जोडण्याचे वचन दिले होते आणि मी त्या वचनाशी पूर्णत: वचनबद्ध झालो होतो. मला वाटत होते की आता माझे सद्गुरू माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे आता माझे आयुष्य अगदी सुकर होईल. पण तसे नव्हते. माझ्या मार्गात अनेक अडथळे आले आणि बरेच मतभेददेखील झाले. परंतु श्री स्वामीजींबरोबर असलेल्या माझ्या नात्याची वीण इतकी घट्ट होती की मी त्या सर्व गोष्टींमधून सुखरूप बाहेर पडलो. श्री स्वामीजी संभ्रम आणि पेचप्रसंग, वैचारिक संघर्ष निर्माण करून आपल्यासमोर ठेवण्यात माहीर आहेत. आणि त्यातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्येच परमानंद व्यापून राहिलेला आहे. आपण आपल्या समस्यांना, अडचणींना बघून पळून जाऊ नये तर त्यांना सामोरे जावे, या साऱ्या भ्रम आणि माया उत्पन्न करण्याच्या खेळामध्ये आपण सहभागी होऊन जिंकावे. या मोहमायेच्या भिंती इतक्या जाड आहेत की त्या तोडण्यासाठी तितकाच मोठा हातोडा लागतो. अज्ञानाच्या सर्व भिंती तोडू शकणारे ते एकटेच आहेत. अशा प्रकारे भिंती तोडू शकणारे गुरू मिळणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. सर्वात मोठी देणगी आहे, आशीर्वाद आहे. मला असे वाटते की मी या जगातील सर्वात मोठी लॉटरी जिंकली आहे. कारण बाकी सर्व काही अपयशी ठरू शकते, परंतु सद्गुरूंचे प्रेम नेहमीच आपल्याबरोबर असते. हाच खरा आधारस्तंभ आहे; आपल्या जीवनाचा कणा आहे, आपला श्वास आहे. त्यांची स्तुती करण्यासाठी माझे सर्व शब्ददेखील अपुरे आहेत. मी दररोज त्यांचा विचार करतो आणि माझे त्यांच्यावरील प्रेम पुन:पुन्हा पल्लवित होते. श्री स्वामीजी माझ्या आयुष्यातील एकमेव अशी गोष्ट आहे जी माझ्या आयुष्यात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहावी अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्या कार्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी जे काही करू शकतो तोच माझ्यासाठी परमानंद आहे. मग ते स्वच्छतागृह साफ करणे असो वा रस्ता झाडण्याचे काम असो, कशानेही फरक पडत नाही. आपण करीत असलेल्या कामाच्या फायद्याचा , परिणामांचा विचार आपण करू नये. हे काम करणे हीच पूजा. त्यांची उपस्थिती आणि त्यांच्यासोबत असणे हाच खरा मोक्ष आहे. मोक्षाकडे जाण्याचा वेगळा मार्ग नाही; आनंद मिळविण्याचा वेगळा मार्ग नाही. आनंद हाच एक मार्ग आहे आणि श्री स्वामीजी आपल्याला दररोज आनंदी राहण्यास शिकवितात. खरे तर, श्री स्वामीजींच्या उपस्थितीत देखील आपण नाखूष असणे हे मी पापच मानतो. पाप म्हणजे काय? पाप हे काही वाईट नाही, पाप म्हणजे आपल्या मनाची अशी अवस्था, जिथे आपल्याला आपला अंतरात्मा त्या दिव्यात्म्यापासून वेगळा आहे असे वाटू लागते. माझ्या मते श्री स्वामीजींकडे पाहताना, त्यांच्या सहवासात असताना आपल्या मनाला त्याची जाणीव न होणे, तसेच अशा महान गुरूंकडे पाहताना त्यांच्या दिव्यत्वाची, त्यांच्या स्पंदनांची प्रचिती न येणे हे एक मोठेच दु:ख आहे. श्री स्वामीजी म्हणजे प्रचंड कंपनशक्ती असलेले मोठे आकाशवाणी केंद्र आहे आणि त्यामुळे त्यांच्यातील ऊर्जेशी आपण स्वत:ला जोडणे हेच आपले कर्तव्य आहे असे मला वाटते. आपण आपली छोटी छोटी केंद्रे, आपल्या कंपनलहरी त्यांच्या कंपनशक्तीशी जोडायला हव्यात जेणे करून योग्य ते कार्यक्रमच आपल्या आयुष्यात आपल्याला ऐकायला मिळतील. आपण आपल्या जीवनात अनेक निरुपयोगी, अनावश्यक कार्यक्रम ऐकत असतो. या सर्वांपेक्षा श्री स्वामीजींचा कार्यक्रम सर्वोत्कृष्ट असतो. आपण फक्त या दिव्य आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमाकडेच लक्ष दिले पाहिजे आणि जेव्हा आपण तसे करतो तेव्हा आपले जीवन खूपच सुरळीत होते आणि मोठे चमत्कार घडतात. मी बायबलचा अभ्यास केला आहे आणि बायबलमध्ये मी जे वाचले आहे ते माझ्या बाबतीत प्रत्यक्षात घडले आहे, ते केवळ माझ्या त्यांच्याबरोबरच्या सहवासामुळेच. याचा अर्थ असा आहे की संत, सद्गुरू, अवधूत असे कोणतेही नाव आपण त्यांना देऊ शकतो. प्रथमत: ते हिंदू दिसतात, परंतु प्रत्यक्षात तसे नसते. तुम्ही अनुसरणाऱ्या धर्माच्या सत्याचे ते प्रकटीकरण असतात. माझ्यासाठी धर्म ही माझी मुळे जतन करणारी, मला मुक्ततेचा अनुभव देणारी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीस मर्यादेत ठेवणे किंवा व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे काय करावे आणि काय करू नये ह्याचे परिपत्रक नाही. माझ्या मते या सर्व गोष्टींची कोणालाही गरज नाही कारण आपण स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहिले तर योग्य काय किंवा अयोग्य काय हे आपल्याला सहज सापडू शकते. श्री स्वामीजींच्या सहवासामुळे माझ्या मनात दृढ झालेला हा माझा वैयक्तिक विश्वास आहे. माझ्या मते आपण फक्त त्यांच्या सहवासात असावे, त्यांच्याकडे पाहावे. स्वामीजी मूळ सत्याच्या स्वरूपाचे एक मूर्तिमंत स्रोत आहेत. ते जास्त काही बोलत नाही परंतु त्यांचा सहवास, त्यांचे आपल्याबरोबर असणे हाच आपल्यासाठी मोठा धडा असतो. भगवद्गीता, बायबल, कुराण हे सर्व पवित्र धर्मग्रंथ त्यांच्यामध्ये आहेत; सर्व ग्रह आणि तारे त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत. मी त्यांना स्वप्नामध्ये गणपतीच्या, दत्तात्रेयांच्या रूपामध्ये पाहतो. ते प्रत्यक्ष आहेत. ते जिवंत आहेत, भ्रम नाहीत. परमात्मा भगवंत आपल्यासमोरच असतो मात्र त्याला बघण्यासाठी आपली दृष्टीसमोरची मोहमायेची झापडे आपल्याला काढता आली पाहिजेत. आपल्या आत्म्याला अंतिमत: त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचविण्यासाठी आपण त्या दैवी शक्तीबरोबर तादात्म्य पावायला हवे. श्री स्वामीजी दिशाही आहेत, मार्गही आहेत , अंतिम ध्येयही आहेत .दिव्य प्रेम म्हणजेच भक्ती आपल्याकडे असावी असे त्यांना वाटते. आपण भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून हे दैवी प्रेम विकसित करू शकलो तरच आपल्याला ‘ज्ञान’ प्राप्त होईल. हे विश्व म्हणजे ज्ञानाचा प्रचंड महासागर आहे. आपल्याला आत्म्याचे ‘ज्ञान’ प्राप्त व्हावे , ‘स्व’ची जाणीव व्हावी अशी त्यांची इच्छा असते आणि जेव्हा हे प्राप्त होते तेव्हा सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. या आत्मज्ञानानंतर कदाचित आपण एका सुंदर अशा विश्वात प्रवेश करतो आणि हळूहळू ते जेथून आले आहेत आपण त्या ग्रहाकडे जाऊ लागतो.

॥ जय गुरु दत्ता ॥

Tags: