जर भगवान रामाने स्वत: हनुमानाची स्तुती केली असेल तर हनुमान खरोखर किती महान असेल इतरांनी आपले गुणगान करावे असे माहात्म्यांना कधीच वाटत नाही. तेही कधीही इतरांची अनावश्यक स्तुती करत नाहीत. इतरांनी आपल्यावर कौतुकाचा वर्षाव केला पाहिजे ही अपेक्षा करणे देखील चुकीचे आहे. महात्मा अशा प्रकारच्या इच्छेपलीकडचे असतात. माझी स्तुती गायली गेली पाहिजे आणि भक्तांनी माझे स्तोत्र म्हटल्यावरच त्यांना संकटातून वाचविन अशी अपेक्षा हनुमानसुद्धा करत नाही. सत्य हे आहे की ज्याप्रमाणे पापणी डोळ्याचे रक्षण करते त्याचप्रमाणे तो रामभक्तांचे अहर्निश रक्षण करतो.
सर्व देवतांनी भगवान हनुमानाची भरपूर स्तुती केली कारण त्यांना त्याच्याबद्दल आदर होता. परंतु त्यांना प्रतिफळाची अपेक्षा नव्हती. अगस्त्य महर्षींनी इंद्रदेवास भगवान हनुमान महिमा स्तुती आणि रचनांचा उपदेश केला. भगवान इंद्रांना महर्षि अगस्त्य यांनी दिलेली हा उपदेश पराशर संहिता या पवित्र ग्रंथात पाहावयास मिळतो.
महर्षि पराशर मैत्रेय महर्षींना म्हणाले, “ओ मैत्रेया ! महान वानरांनी विविध प्रकारे भगवान हनुमानाची स्तुती केली. ती सर्व स्तोत्र एकत्रितपणे संकलित केली आहेत आणि त्यांना वानर गीता म्हणून ओळखले जाते.
स्तोत्रं सर्वोत्तमम् चैव हनुमतत्त्व दर्शनम् सर्व माया हरम् चैव आधी व्याधी विनाशानम् अर्थ- हे स्तोत्र सर्व स्तोत्रांमधील श्रेष्ठ आहे. यात हनुमानाचे तत्व दर्शविले गेले आहे. ह्याच्या पठणाने माया पूर्णपणे दूर होते. सर्व शारीरिक आणि मानसिक रोग नष्ट होतात.
सर्व संतांच्या व देवांच्या सभेत भगवान इंद्रांनी अगस्त्य महर्षींना प्रार्थना केली, “हे दयाळू महर्षि! हा संसार (जन्म मरणाचे चक्र ) एक महासागर आहे ज्याला ओलांडणे अशक्य आहे. आपल्या इंद्रियांमुळे या संसारास सीमित असलेले अपवित्र जीव हा महासागर पार कसा करतील हे कृपया तुम्ही मला सांगाल का?”
त्यास महर्षि अगस्त्यने उत्तर दिले, “हे इंद्रदेवा, ऐका ! सगळ्या बाबतीत शुद्ध असलेल्या वानरांनी भगवान हनुमंतावर स्तोत्र रचली. ही स्तोत्रे वानर गीता म्हणून ओळखली जातात. जो भगवान हनुमंतावर आपले मन पूर्णपणे स्थिर करून या स्तोत्रांचे जो पठण करेल, तो संसार सागर सहजपणे पार करू शकेल . याव्यतिरिक्त, तो हनुमानाच्या सन्निधींत पोचेल. आयु: कीर्ती यशस् चैव लभन्ते नात्र संशय: - जे लोक या वानर गीता ऐकतात, वाचतात किंवा पठण करतात त्यांना दीर्घायुष्य लाभेल. कीर्ति संपादन करतील. त्यांना यश प्राप्त होईल. हि फलप्राप्ती होईल यात शंका नाही.
अशाप्रकारे महर्षि अगस्त्यांनी इंद्र देवास उपदेश करण्यास सुरुवात केली, ज्याची सुरुवात फल श्रुतीपासून झाली. सामान्यपणे फलश्रुती स्तोत्राच्या शेवटी सांगितली जाते परंतु येथे स्तोत्रांच्या आरंभी फलश्रुती महिमा सांगितला आहे.
ॐ नमो हनुमते नम:।