कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात श्री गणपतीची पूजा करूनच करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कुठलेही कार्य करताना हे शुभ लक्षण मानले जाते. त्यानंतर, या संपूर्ण विश्र्वामध्ये व्यापून राहिलेल्या ज्ञानाची देवी असलेल्या सरस्वती मातेची पूजा केली जाते आणि त्यानंतर तिसरे म्हणजे, आपल्याला हे ज्ञान शिकवणाऱ्या आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखविणाऱ्या आपल्या गुरूंची उपासना केली जाते.
गुरू कोण आहे? जीवांना अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात ते गुरू असतात. अंधार म्हणजे काय, तर अज्ञान. या अज्ञानरूपी अंधकाराने मनुष्य पूर्णपणे वेढून गेलेला असतो. गुरू त्याच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करतात आणि त्याला प्रकाशाच्या मार्गावर घेऊन जातात.
आपल्या कार्याच्या मार्गावरील सर्व विघ्ने दूर व्हावीत यासाठी सर्वप्रथम गणपतीची प्रार्थना केली जाते. त्यानंतर आपल्या मनातील दोष, वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी देवीमातेकडून आपण आशीर्वाद मागतो. त्यानंतर गुरूंना प्रार्थना केली जाते जे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात.
या जन्ममृत्यूच्या फेऱ्याने वेढलेल्या संसाररूपी भवसागरामध्ये आणि मोहमायेच्या बंधनांमध्ये आपण सगळे संपूर्णपणे बुडालो आहोत, अडकलो आहोत. हे एक प्रकारचे अज्ञान आहे, अंधकार आहे. हा अंधकार आपल्याला गोठवणारा आहे. कमालीचा भीतीदायक आहे. या भीतीदायक, भयानक असलेल्या अंधकारातून आपल्याला बाहेर फक्त गुरूच काढू शकतात.
गुरूंवर पूर्णपणे विश्वास असणे आवश्यक आहे. नुसते दर्शन घेणे पुरेसे नसते. गुरूंची उपासना केली पाहिजे. जितकी त्यांची उपासना जास्त करू तितकी चांगली. आपण आता अशा गुरूंचे ध्यान करत आहोत.
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् | तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः ||
अखंड प्रपंच आकाशासामान व्यापलेल्या गुरूंचे तत्वाने मला ‘तत्’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाचे दर्शन मनःचक्षूसमोर आणण्यास मला मदत होते , अशा या गुरूंना मी अत्यंत श्रद्धापूर्वक नमस्कार करतो.
असे म्हणतात की गुरूशिवाय कोणतेही ज्ञान मिळू शकत नाही. ज्ञान कोणत्याही प्रकारचे असले तरी मार्ग दाखविणारे, दिशा दाखविणारे शिक्षक (गुरू) आवश्यक आहेत. बरेच लोक आपण कोणत्याही गुरूंच्या मदतीशिवाय सर्व ज्ञान प्राप्त केले आहे, अशा बढाया मारतात. तथापि, एखाद्या दिवशी अचानक त्यांचे सर्व ज्ञान असेच नाहीसे होते.
एखाद्या ग्रंथास गुरू मानून त्यापासून आपण शिकू शकतो. पण तरीही, एकलव्याप्रमाणे प्रत्यक्ष गुरू, दृश्य स्वरूपात दिसणारा गुरू मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
एकलव्य स्वतंत्रपणे स्वत:च स्वत:चे शिक्षण घेत होता. तरीदेखील प्रत्यक्ष गुरू मिळावेत त्यांच्याकडून शिकता यावे यासाठी तो मनापासून गुरूंचा शोध घेत होता. परिस्थितीमुळे गुरू द्रोणांना एकलव्याला कोणतेही शिक्षण देण्यापासून स्वत:ला रोखावे लागले. एकलव्य घरी परतला आणि त्याने आपल्या गुरूंची, गुरू द्रोणांची मूर्ती बनविली. त्या मूर्तीला गुरुस्थानी ठेवून त्याने त्यांची अत्यंत मनोभावे पूजा केली. त्याचा असा दृढ विश्वास होता की त्याचे गुरू मूर्तिरूपाने तेथे खरोखर उपस्थित आहेत आणि ते थेट त्याच्याशी बोलत आहेत आणि त्याला उपदेश करीत आहेत.
पुस्तकातून थेट शिकत असतानादेखील हेच तत्त्व लागू पडते. पुस्तक वाचत असताना एखाद्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की हे पुस्तक म्हणजे शिक्षकच आहेत जे लेखनाच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. आपण जे वाचत आहोत ते ज्ञान कोणीतरी आपल्याला शिकवत आहे, ही भावना आणि विश्वास नसेल तर वाचनातून मिळविलेले ज्ञान कधीही फलदायी ठरणार नाही. पूर्ण ज्ञान कधीही प्राप्त होणार नाही.
भगवान सुब्रह्मण्य हे महाज्ञानी होते हे एक सर्वविदित सत्य आहे. भगवान दत्तात्रेयांनी सुब्रह्मण्य यांना ओंकाराचे तत्त्व शिकवले. फक्त एवढेच शिकवले. दत्तगुरूंनी त्यांना ‘ओम्’ या शब्दामागील अर्थ स्पष्ट केला, ह्याखेरीज दुसरा कोणताही उपदेश केला नाही. मात्र या छोट्या शिकवणीसाठीदेखील भगवान सुब्रह्मण्य यांनी दत्तांना आपले गुरू म्हणून संबोधित केले.
म्हणून गुरूंनी जरी फक्त एखादा शब्द किंवा अगदी अक्षरदेखील शिकविले किंवा त्या व्यक्तीला फक्त अक्षर अभ्यासाची दीक्षा दिली किंवा त्या व्यक्तीला अक्षराभ्यास करण्यास सांगितले तरी ते पुरेसे असते. तरीदेखील आपण त्यांना गुरू म्हणून स्वीकारले पाहिजे. ते त्या विषयात प्रवीण आहेत की नाही हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शक असल्यामुळे आपण त्याला नमन केले पाहिजे.
॥ ओम् सीता रामभ्याम् नम: ॥