SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 21 Dec 2020
शतश्लोकी 01: परिचय व ध्यान श्लोक

॥ ओम्‌ सीतारामाभ्याम् नम: ॥

श्रीमद्‌ रामायणातील बालकांडाच्या पहिल्या भागातच नारद महर्षींनी संपूर्ण रामायणाचे सार संक्षिप्त स्वरूपात, म्हणजे १०० श्लोकांमध्ये वाल्मिकी मुनींना सांगितले आहे. हे १०० श्लोक बाल रामायण, संक्षिप्त रामायण आणि शतश्लोकी रामायण अशा नावांनी प्रसिद्ध आहेत.

हे बाल रामायण ऐकल्यावर देखील संपूर्ण श्रीमद्‌ रामायण ऐकल्याचे फळ मिळते. चला गणपतीची प्रार्थना करून प्रारंभ करूया -

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् | प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये ||

माझ्या मार्गातील सर्व विघ्ने दूर व्हावीत याचा संकल्प करून मी महागणपतीचे ध्यान करतो ज्याने श्र्वेत वस्त्र परिधान केलेले, जे सर्वव्यापी आहेत, जे चंद्रवर्णी असून जे चतुर्भुज आहेत आणि त्यांचे शांत मुखकमल आहे.

शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे | सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् ||

देवी शारदा मातेचा चेहरा नुकत्याच उमललेल्या श्र्वेत कमलपुष्पाप्रमाणे तेजस्वी आहे, अशा सर्वजणांना प्रिय असलेलया दिव्य शारदा मातेचा निवास आपल्या मुखकमलावर सदैव राहू दे.

शरद ऋतूत प्रामुख्याने या देवी मातेची पूजा केली जात असल्याने, देवीमातेस शारदा हे नाव पडले. . या ऋतूमध्ये आकाश संपूर्णपणे निरभ्र असते, स्वच्छ असते.अशा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेल्या आकाशात पौर्णिमेच्या रात्री चंद्र अनन्यसाधारण तेजस्वी आणि चमकदार दिसतो. देवी शारदा या शरद पौर्णिमेच्या चंद्रासमान सदैव तेजस्वी दिसते. तिचा चेहरा शुभ्र कमळांप्रमाणे सदा तेजोमय असतो.

गेल्या अनेक जन्मांपासून जे मनापासून आणि आदरपूर्वक तिची पूजा करत आहेत, त्यांच्यामध्येच कविताशक्ती, पवित्र ग्रंथांचे संकलन / लेखन, तसेच या पवित्र ग्रंथांवर सविस्तर ज्ञानपूर्ण भाष्य, अशा प्रकारच्या इतर अनेक गोष्टी लिहिण्याची क्षमता असते. आयुष्यात बऱ्याच वेळा आपण अशा कलेत निपुण असलेल्या लोकांच्या संपर्कात येतो. अशा व्यक्तींशी आपली मैत्री होते. त्यांच्या काव्यकौशल्यामुळे आपण चकित होतो आणि त्यांचे काव्य ऐकताना आपल्याला खूप आनंद मिळतो.

योग्य असे शिक्षण मिळणे हे खूप मोलाचे असते. केवळ याच एका हेतूने आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी आपल्याला अभ्यास करण्यासाठी सतत सांगत असतात. जेव्हा देवी सरस्वतीची (विद्येची देवता) आपल्यावर कृपा असते, तेव्हा आपण आयुष्यभर खर्‍या ज्ञानाच्या मार्गावर जाऊ शकतो.

अशिक्षित, अज्ञानी व्यक्ती नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावून या भौतिक जीवनामध्ये विजयी होऊ शकेल. त्याच्या अंगी विजयी होण्यासाठी अनेक चांगले गुणही असू शकतात. पण तरीही त्या परमात्म्याप्रति पोहोचण्याच्या मार्गावर प्रगती करण्यासाठी ज्या संपूर्ण ज्ञानाची आवश्यकता असते, तेथे मात्र तो असहाय असतो. अज्ञानामुळे या मार्गावर तो अपयशी ठरतो.

समजा एक भव्य मेजवानी आयोजित केली गेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचे अतिशय रुचकर असे पदार्थ आहेत. खूप मिष्टान्न आहेत. यजमानदेखील एक शांत आणि शुद्ध मनाची व्यक्ती आहे आणि या अतिशय स्वादिष्ट असणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांना योग्य न्याय देण्यासाठी येणाऱ्या अतिथींना भूकसुद्धा लागली आहे. वातावरण अगदी आनंददायी आहे. परंतु पिण्यासाठी पाण्याचे आयोजन मात्र केले गेलेले नाही. आता अशा परिस्थितीत जेवणाचा आनंद घेता येईल का? पाण्याशिवाय, एक घाससुध्दा व्यवस्थित चावणे आणि गिळणे अतिथींना शक्य होणार नाही. या कारणास्तव, जेवणाच्या सुरुवातीसच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते.

त्याचप्रमाणे, एखादी व्यक्ती या भौतिक जगात मोठे नाव, कीर्ती मिळवू शकते, अब्जाधीश होऊ शकते. तसेच सामर्थ्य, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवू शकते. भरपूर प्रमाणात स्थावर मालमत्ता कमावू शकते. परंतु ज्ञानाचा एक छोटा अंकुरदेखील त्या व्यक्तीमध्ये नसेल, तर शेवटी या नाव, पैसा, प्रसिद्धी, संपत्ती या सर्वांचा उपयोग तो काय?

याचसाठी शारदेची, सरस्वतीची (विद्येची, बुद्धीची देवता) पूजा केली जाते. ती (देवी शारदा) आपल्या सर्वांसाठी खजिन्याचे भांडार आहे. अशा दिव्य मातेचा आशीर्वाद आपल्या चेहऱ्यावर सदासर्वकाळ विलसत राहो आणि आपल्या जिव्हेवर सदैव तिचा वास राहो अशी प्रार्थना आपण ह्या श्लोकातून करतो.

॥ ओम् सीतारामाभ्याम् नम: ॥

Tags: