आपल्या भक्तांच्या अडचणी परमेश्वर कोणत्या पद्धतीने दूर करतो ते विस्तृतपणे ह्या श्लोकात सांगितले आहे.
शोषणम् पाप पंकस्य दीपनम् ज्ञान तेजस: । ताप प्रशमनम् वंदे स्मर्तृगामी सनोवतु ।।
पृथ्वीवरील प्रत्येक जीवीस अडचणी/दु:ख ह्यांचा सामना करावा लागतो. श्रीमंत माणूस, सुज्ञ माणूस, डॉक्टर, वकील प्रत्येकालाच जीवनात अडचणी येतात. डॉक्टरलासुद्धा आरोग्याच्या समस्या असतात. श्रीमंत माणसालाही पैशाच्या अडचणी येतात. अशा समस्या उद्भवतातच का? आपल्या गतकर्मांचा तो परिणाम असतो. गतकर्म म्हणजे काय? आदल्या दिवशी केलेल्या कृतींना गतकर्म म्हणू शकतो. जर माणसाने आदल्या दिवशी खराब अन्न खाल्ले तर त्याला दुसऱ्या दिवशी त्रास होतो. गेलेला दिवस म्हणजेच गतजन्म.
पापं ही खोलवर असलेल्या दलदलीप्रमाणे आहेत. जी माणसास वेढतात आणि तो त्यात रुतत जातो. परिस्थितीनुसार तो वेगवेगळ्या अडचणींतून जातो. म्हणूनच आपले वडिलधारे सांगतात. दारिद्य्र दोषे न करोति पापम्, पापात् दरिद्र: पुनरेव पापम्. ह्याचा अर्थ असा आहे की गतजन्मातील पापी कर्मामुळे तो माणूस पूर्ण दारिद्र्य़ात जन्मला. ह्या जन्मात दारिद्र्य़ामुळे तो आणखी पाप करतो. ह्या अधिक पापांमुळे तो परत पूर्ण दारिद्र्य़ात जन्म घेतो.
असे चक्र सारखे चालू राहते. अशा प्रकारे ही दलदल माणसाला खाली ओढत राहते व त्यातून सुटका करून घेणे अशक्य होते. ह्या दलदलीच्या खोलीचा अंदाज लावता येत नाही. माणूस पहिल्यांदा एक खोटे बोलतो, ते लपविण्यासाठी त्यास आणखी एक खोटे बोलावे लागते. हे दुसरे खोटे लपविण्यासाठी आणखी एकदा तो खोटे बोलतो आणि हे असे अंतहीन चक्र चालूच राहते. त्यांच्यापासून आपले रक्षण व्हावे ह्यासाठी आपली वडीलधारी आपल्याला ताकीद करतात. `पापभीति:’ (पापाची भीती) ह्याची शिफारस करतात.
ह्या पापांच्या दलदलीतून फक्त सद्गुरूच त्या व्यक्तीस बाहेर काढू शकतात.
शोषणम् पाप पंकस्य: ते पापांची दलदल पूर्णपणे सुकवितात.
आपल्या भक्तांना ह्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी दत्तात्रेय भगवान प्रथम त्यांच्या पापांची पूर्ण दलदल शोषून घेतात. पूर्णपणे ती सुकवितात. तथापि भक्तांची शिक्षेतून सुटका नसते. परमेश्वर त्यास आणखी बुडून देत नाही. इथपर्यंत तो मदत करतो. ह्यासाठी पूर्ण आत्मार्पण जरूरी असते.
दीपम् ज्ञान तेजस: - ते त्यांच्यात ज्ञानरूपी दीप प्रकाशमय करतात.
पापांमुळे लोकांना वर्णन करता येणार नाही अशा त्रासातून जावे लागते. अशा त्रासदायक कालावधीत ते दान, तप, व्रत आणि पूजेत सगळ्यात कमी कल दर्शवितात. ह्या पूजेमुळे आम्हाला कोणता फायदा होणार आहे? इतके दिवस आम्ही खूप पूजा केल्या परंतु तरीसुद्धा आम्हाला या अडचणी आल्या. ते मतभेद व्यक्त करतात. ह्यामुळे सत्कर्म न केल्याने ते दलदलीत आणखीनच खाली जातात. त्यांच्या दारिद्र्य़ात ते भर घालतात. ते पूजा आणि इतर सत्कर्माकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहातात.‘’ इतके दिवस आम्ही सर्व काही केले, त्याचे आम्हाला काय मिळाले? आम्हाला काहीही मिळाले नाही म्हणून भविष्यात आम्ही ह्यांच्यापासून काय अपेक्षा करायची? आम्हाला कोणीच मदत करू शकत नाही. पूजा करूनही आमची समस्या सुटणार नाही’’ असा विचार ते करतात. अशा प्रकारे त्यांच्यात असलेला दरिद्र शनी, राहू, केतू त्याना धर्माच्या मार्गावर जाऊन देत नाही. ते दलदलीत रुतत जातात. ह्यात भर म्हणून ती लोकं देवाचा, गुरूचा तसेच जन्मदात्या आई वडिलांचासुद्धा अपमान करतात. `माझ्या आईने मला जन्मच का दिला?’ ह्या दुर्दैवी वंशात जन्माला आलो हेच माझे दुर्दैव आहे. ते धिक्कार करतात. ते स्वत:लासुद्धा त्यातून सोडत नाहीत. ``हा जन्म किती वाया गेलेला आहे. असे जगण्यापेक्षा मेलेले बरे. ह्या जगाने मला काय दिले? काहीच नाही. म्हणून आजपासून मी कुंकू लावणार नाही. देवासमोर वाकणार नाही. अशा प्रकारे लोक आक्रोश करतात आणि नैराश्यात जणू काही त्यांना वैराग्य आले आहे असे वागतात. त्यांचे दुर्दैवच त्यांना खाली ओढत असते. त्यांचे बोलणे असभ्य असते. त्यांना जे मिळाले नाही ते इतर लोक उपभोगत असलेली पाहून मत्सर आणि तिरस्काराने त्याचे पोट भरलेले असते. आजारी माणसास निषिद्ध असलेले गोड पदार्थ इतरजण खाताना पाहून त्यास मत्सर वाटेल. वृद्ध माणूस तरुण मुलगा जीवन उपभोगताना पाहून मत्सर वाटेल. ह्यालाच दारिद्रय म्हणतात. दारिद्रय म्हणजे पैशाची कमतरता नाही. सद्विवेक बुद्धीचा अभाव म्हणजेच खरे दारिद्रय . अशा अडचणीच्या काळात माणसाने देवासोबत जास्त काळ घालवावा. त्याने त्याच्या पूजा वाढवाव्यात. जास्त वेळा मंदिरात जावे. कोणाचाही मृत्यू झाला तर गरुड पुराण का वाचतात? ज्या जागी मृतदेह ठेवलेला असतो ते मंदिर असते. परमात्म्याने नुकतेच शरीर सोडलेले असते. तिथे दिव्य वातावरण निर्मिती होते. जवळच्या आणि प्रिय लोकांमध्ये निरामय वृत्ती निर्माण करण्यासाठी, त्यांना रडण्यापासून आणि देवास अपशब्द वापरण्यापासून दूर रहाण्यासाठी आणि मृत व्यक्तीबाबत त्यांचा चांगला दृष्टिकोन असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी गरूड पुराण वाचले जाते. दु:खात असताना आपण जर आपला वेळ परमेश्वरासोबत घालवला तर आपण आपले दु:ख विसरतो. ह्या ऐवजी परमेश्वरास दोष देणे चुकीचे आहे. हे प्रभू! किमान ह्यामुळे तरी मी तुझ्याजवळ आहे. अशा पद्धतीने विचार करणे चांगले असते.
जे उदास आहे, खिन्न आहेत आणि निराश आहेत आणि ते अडचणींच्या ओझ्यामुळे खाली ओढले जात आहेत त्यांच्यात दिव्य ज्ञान (देवाबद्दलचे ज्ञान) निर्माण केले पाहिजे. त्यांना व्रत पूजा करण्यास सांगणे निरुपयोगी आहे. त्यांना परमात्मा तत्त्व शिकवायला लागेल आणि पापाचे भय त्यांच्यात निर्माण व्हायला हवे. परमेश्वराबद्दलचे ज्ञान महातेजस्वी आहे. ती एक प्रचंड उष्णता आहे. जेव्हा हे महातेजस्वी, उष्णतारूपी कारुण्य त्या व्यक्तीवर पसरते तेव्हा त्याच्या पापाची दलदल सुकून जाते. दत्तात्रेय भगवान ह्या पद्धतीचा अवलंब करतात. म्हणूनच असे म्हटले आहे. दीपनम् ज्ञान तेजस:
ज्याप्रमाणे हल्ली लेसर शस्त्रक्रियेने बाहेरून छेद न करता शरीरातील खडे काढले जातात त्याचप्रमाणे दत्तात्रेय भगवान पापात बुडालेल्या माणसाच्या हृदयात दिव्य ज्ञानाची ज्योत प्रज्ज्वलित करतो आणि ह्यातून तो दलदल सुकवितो. ह्याबरोबर त्याच्या अडचणी संपतात. म्हणूनच अशा वेळी गुरूंचा आश्रय घ्यायचा असतो. जेव्हा ज्ञानाचा दिवा प्रज्ज्वलित होतो. सर्व पापं धुऊन जातात. तेव्हा त्या माणसाचे तापत्रय आपोआप नाहिसे होतात.
ताप प्रशमनम्: जे त्यांचा आश्रय घेतात त्यांचे तीन प्रकारचे ताप ते दूर करतात. हे तापत्रय कोणते आहेत? तीन प्रकारचे ताप असतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप. आध्यात्मिक ताप - इथे वापरलेल्या आध्यात्मिक ह्या शब्दाचा संबंध अध्यात्माशी (वेदांत) नाही. आत्म ह्या शब्दाचा संबंध स्थूल शरीराशी आहे. आजाराने त्रस्त झालेल्या शरीरास होणारी पीडा वगैरेचे वर्गीकरण आध्यात्मिक तापात केले जाते.
आधिभौतिक ताप – नैसर्गिक आपत्ती किंवा इतर जीवींपासून होणारा त्रास, अतिवृष्टी, प्रचंड चक्रीवादळ, भूकंप आणि इतर नैसर्गिक विपत्ती तसेच विंचू, साप, किडे, जंतू, सूक्ष्म जीवजंतू . विषबाधा वगैरेचे वर्गीकरण आधिभौतिक तापात केले जाते.
आधिदैविक ताप – जे आईवडील, देव, गुरू ह्यांच्या शापामुळे त्रस्त असतात. उदा – मानवी नियंत्रणापलीकडची अलौकिक शक्तीचे शाप हे आधिदैविक ताप आहेत.
फसवणूक करणारे व्यावसायिक भागीदार, मित्र आणि त्यांच्या शापामुळे पीडित असलेल्यांचे वर्गीकरण सुद्धा ह्यातच होते.
व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत फसवणूक सगळीकडे पाहावयास मिळते. व्यापार कधीही कोणावर सोपवू नका. मालकाने व्यवहारांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे धन आणि मालमत्तेच्या बाबतीत बढाई मारू नये. अशा बाबतीत गुप्तता राखली पाहिजे. दुसऱ्या माणसाने तुमच्या बॅंकेतील शिल्लकीबद्दल ऐकले की आपला त्यावर अधिकार आहे असे त्याला वाटू लागते आणि इथूनच फसवणूक चालू होते.
जे त्यांचा आश्रय घेतात, ते दत्त भगवान वर नमूद केलेल्या दोन्ही पद्धतींचा वापर करून तिन्ही ताप दूर करतात. म्हणूनच ते ताप प्रशमनम् आहेत.
वंदे - अशा परमेश्वरास आमचा नमस्कार स्मर्तृगामी सनोवतु - स्मरण करताच तत्क्षणी येणारा परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो!