शरणागत दीनार्त परित्राण परायणम्।
नारायणम् विभूम् वंदे स्मर्तृगामी सनोवतु।।
वरील दोन श्लोकांत आपण हे समजून घेतले की दीनबंधुम्’ आणि
प्रपन्नार्ति हरम्’ हे शब्द विरोधाभासी नाहीत आणि ह्या श्लोकातील `शरणागत दीनार्ता’ ह्याबाबतीत जर काही तर्क विचार येत असतील तर तो त्याचा शेवट करतो.
`शरणागत दीनार्ता परित्राण परायणम्’: जी माणसे त्यास पूर्णपणे शरण गेली आहेत (शरणागत) आणि जर ती दु:खी (दीन) असतील तर त्यांचे दु:ख (आर्ति) दूर करण्यासाठी (परित्राण) तो विशेष प्रवास (परायण) हाती घेतो.
जे लोक गरीब आहेत, गंभीर संकटात आहेत त्यांच्यासाठी दीन’ ह्या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यापैकी काहीजणच परमेश्वरास शरण गेलेले असतात. जे लोक खरोखरीच त्याला शरण गेली आहेत त्यांच्यासाठी हा परमेश्वर विशेष परम (पर) प्रवास (अयन) करतो. तो त्यांच्या मदतीला धावून येतो. वैकुंठातून तो धावत येतो. बऱ्याच पौराणिक गोष्टीत आपण असे वाचतो की आपल्या भक्तांच्या सुटकेसाठी धावून येताना श्रीविष्णू बऱ्याचदा आपले चक्र घरी विसरून आले होते. जरी अशा कथा चित्तवेधक असल्या तरी त्यात त्यास आपल्या भक्तांबद्दल वाटणारी
अपार करुणा’ आणि खऱ्या उत्कट भक्ताच्या सुटकेसाठी त्याने त्वरित केलेली कृती’ ह्याची कल्पना द्यायची असते. त्यास शरण जाणे आणि त्याचा धावा करणे हे पूर्णपणे आपल्या हातात असते. त्याच्याबाजूने विलंब कधीही होत नाही.
परंतु आपल्या अस्थिर मनामुळे, योग्य विश्वासाच्या अभावामुळे, आपल्या अहंकारामुळे आपण त्याचा धावा करण्यात असफल होतो. मग तो कसा प्रकट होईल?
आपल्या आत खोलवर अजूनही आपण त्याच्या क्षमतेबाबत वादविवाद करत असतो आणि स्वत:चा अभिमान बाळगत असतो आणि तोपर्यंत आपण शरण जात नाही आणि स्वत: काहीही नसून शून्य आहोत हे मानत नाही, तोपर्यंत तो आपल्या मदतीला धावून येत नाही. हे आपण भागवतम् मधील गजेंद्र मोक्ष ह्या गोष्टीत पाहिले आहे ना? जोपर्यंत गजेंद्र हत्ती लढत होता तोपर्यंत परमेश्वर त्यास पाहात होता. जेव्हा शेवटी तो पूर्णपणे शरण जाऊन त्याने विलाप केला तेव्हा श्रीविष्णू तत्काळ त्याच्या सुटकेसाठी धावले.
दत्तचरित्रामध्येसुद्धा अशासारख्या गोष्टी पाहावयास मिळतात.
परमेश्वर बोलाविल्याक्षणी प्रकट होतो हे कसे शक्य आहे? त्यास येण्यासाठी वेळ लागत नाही का? ह्याचे उत्तर `नारायणम् विभूम्’ ह्या वाक्यांशात सामावले आहे.
नारायण – जो प्रत्येक माणसात (नर) निवास करतो, जो सागरात निवास करतो, ज्याच्यातून २५ तत्त्व उगम पावतात तो नारायण. ज्याच्यात सर्व सजीव प्राणिमात्र विलीन होतात तो नारायण’ ह्या सर्व अर्थातून आपल्याला असा उलगडा होतो की,
जो सर्व अवस्थेत सर्वकाल उपस्थित असतो. उदा. जो सर्वव्याप्त असतो तो नारायण. ज्यांच्या ह्या तत्त्वाच्या माहात्म्यावर `विभूम्’ ह्या शब्दाने आणखी जोर दिला गेला आहे.
विभूम् - म्हणजे जो सर्वव्याप्त आहे.
तो सर्वव्याप्त आहे, त्यामुळे तो तत्क्षणी प्रकट होऊ शकतो. त्याला येण्यास वेळ लागत नाही.
वंदे - अशा परमेश्वरास आमचा नमस्कार
स्मर्तृगामी सनोवतु - स्मरण करताच तत्क्षणी जो प्रतिसाद देतो तो परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो.