SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
दत्त स्तवम्‌ – श्लोक 2

ह्या श्लोकात दत्त भगवानांची अनंत करुणा आणि त्यांचे खरे तत्त्व ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला आहे.

दीनबंधुम्‌ कृपासिंधुम्‌ सर्व कारण कारणम्‌।
सर्व रक्षा करम्‌ वंदे स्मर्तृगामी सनोवतु।।

कृपा सिंधुम्‌ – तो कृपेचा सागर आहे.
अशा प्रकारे संबोधित करण्यास कोण पात्र आहे?
कृपा म्हणजे पूर्ण करुणा किंवा दया. ह्याचा अर्थ दुसऱ्याचे दु:ख पाहून ज्याचे हृदय पाझरते.
हे स्वभाववैशिष्ट्य चांगले का वाईट? तुम्हीच विचार करा.

सर्वसाधारणपणे माणसाला स्वत:च्या अडचणींबाबत स्वत:ची दया वाटते. परंतु जेव्हा इतरजण अडचणीत असतात तेव्हा त्यांना त्यांची दया येतेच असे नाही. ह्या नियमावर जग चालले आहे. आपल्याबाबत दया येणे, वाटणे हे चांगले लक्षण मानले जाते. परंतु इतरांबाबत दया येणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. आपल्या डोक्यावर अडचणी आल्या की खिन्न होणे आणि जे सफल झाले आहेत त्यांचा हेवा वाटणे, त्यांच्यावर टीका करणे हा जगाचा नियम आहे.’’ ह्या अडचणी, दु:ख मलाच का येतात? मी दु:खी असतानाच दुसऱ्यांच्या घरास आनंद भेट का देतो ? माझ्या घरात आनंद, खुशी प्रवेश का करत नाहीत?’’ स्वत:वरील करुणेने भरून लोक अशाप्रकारे विलाप करतात.

जेव्हा लोक पीडा सहन करत असतात तेव्हा तुमच्यात असा विचार का उत्पन्न होत नाही की, “अरेरे! किती वाईट! त्याच्यावर अशी आपत्ती यायला नको होती. बरेच लोक सह अनुभूती घेऊ शकत नाहीत हे दुर्दैव आहे. ओह ! माझे किती चांगले भाग्य आहे. मला जे पाहिजे ते मिळाले आहे, मग दुसऱ्याचे भाग्य खुलते की नाही त्याची मला पर्वा नाही,’’ असा विचार करणे चुकीचे आहे. अशा सवयीस प्रोत्साहन देऊ नका.

स्वअनुकंपा ही करुणेची योग्य व्याख्या नाही. फक्त आपल्या जवळच्या आणि प्रिय लोकांबाबत करुणाही योग्य नाही. जो मित्र आणि शत्रूत भिन्नता दर्शवितो. (अ हा माझा मित्र आहे आणि ब हा माझा शत्रू आहे) त्याचा ही करुणाप्रती योग्य दृष्टिकोन असू शकत नाही.

ह्या जगात ज्या माणसास शत्रू किंवा मित्र नसतात, त्याचीच फक्त योग्य करूणा प्रवृत्ती असू शकते. त्याच्या दृष्टीने सर्वजण समान असतात. असा माणूस इतर लोकांकडे दुर्लक्ष करून काही मोजक्या माणसांवर करुणावर्षाव करू शकत नाही. समुद्राप्रमाणे सर्व दिशांना त्याची अनंत करूणा वाहत असते. अशा महात्म्यास `कृपा सिंधु’ (करुणेचा सागर) असे संबोधित केले जाते.

दीनबंधू – जे अडचणीत, संकटात आहेत त्या सगळ्यांचा तो नातेवाईक आहे.

जो व्यक्ती दु:खी आहे. अडचणीत बुडला आहे, त्याच्याकडे करूणासागर महात्म्याच्या अनंत करूणेचा प्रवाह वाहातो, म्हणूनच त्यास दीनबंधू असे म्हटले आहे.

ह्या अगोदरच्या श्लोकात आपण चर्चा केली होती की जे परमेश्वरास पूर्ण समर्पण करतात. (प्रपन्नार्ति हरम्‌) फक्त त्यांच्याच मदतीला परमेश्वर येतो. परंतु अडचणीत असलेल्या प्रत्येक जणाने परमेश्वरास शरणागत जाणे आवश्यक नसते. मग समर्पण न केलेल्यांना तो कसा मदत करू शकतो? मग त्यास दीनबंधू कसे म्हणता येईल? त्याचे विश्लेषण करूया.

जर माणूस भक्तिपरायण, सात्त्विक, धार्मिक असेल आणि जर इतरांना सुखसुविधा मिळत नसल्या तर त्याला मिळत असलेल्या सुखसुविधा उपभोगण्याची त्याची इच्छा नसते, असा माणूस आपण अन्न प्राशन करण्यापूर्वी ज्यांना खाण्यास अन्न मिळत नाही अशा दुर्दैवी जीवींना अन्न देऊन मग स्वत: खातो.

“परमेश्वर कृपेने माझ्या घरात मुबलक अन्न-धान्य आहे. इतरजण भुकेले राहिले तर त्याची चिंता मी का करू? शेवटी त्याला त्याच्या वाईट कर्मांना तोंड द्यायचे आहे. त्याबाबत मी काय करू शकतो? असे तो म्हणत नाही. जरी त्या लोकांनी मदत मागितली नाही तरी तो कमीत कमी आपल्या समोर दिसणाऱ्या गरजू लोकांना मदत करतो. त्यांनी खाण्यास दिल्याशिवाय तो खाऊ शकत नाही. जर अशा संतांसारख्या माणसाच्या भावना अशा असू शकतात तर दत्तात्रेय भगवान अशा पीडित लोकांच्या मदतीस धावणे स्वाभाविक आहे. खरं सांगायचे तर अगदी स्वार्थी कठीण हृदयाच्या सर्वसाधारण माणसालासुद्धा जर असे दिसले की आपल्या खाण्याकडे भिकारी अधाशीपणे पाहात आहे तर तो ते लपवून खाण्याचा प्रयत्न करेल किंवा संपविण्यापूर्वी त्यातील काही तुकडे तो त्याला देईल. जर सर्वसाधारण माणसाची वर्तणूक अशी असेल तर संत लोक अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीस धावणे स्वाभाविक आहे ना?

आता माणसांना दु:ख का भोगावे लागते? दु:ख, पीडा भोगाव्या लागण्याची दोन कारणे आहेत, ती व्यक्ती गतजन्मातील किंवा वर्तमान जन्मातील पापी कृत्यांची फळं भोगत आहे असे म्हणता येईल. आपण असे गृहीत धरूया की संतास किंवा महात्म्यास त्याच्या दु:खाचे कारण समजले आहे. त्याच्या वर्तमान जन्मातील चुकीच्या कृत्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. त्या माणसाप्रती तो दया दाखवून त्यास मदत करण्याचा प्रयत्न करेल. जर त्या माणसाच्या गतजन्मातील कर्मामुळे तो अडचणीत सापडला असेल तर तो त्यास मदत करू शकणार नाही, मग आपण त्यास महात्मा म्हणू शकतो का? नाही. महात्मा अशी व्यक्ती असते की कोठलेही कारण असले तरी तो त्यावर दया दाखवितो ही त्याची विशेषता आहे.

मुलगा आगीत हात घालतो. आई असे म्हणेल का? तू जाणूनबुजून आगीत हात घातलास, आता त्याचे परिणाम भोग. त्या मुलाने जाणतेपणी, अजाणतेपणी जरी हात घातला असेल तरी ती त्यास आवश्यक ते औषध त्याला लावते. अशाच प्रकारे कारण काहीही असले तरी महात्मा दु:खी माणसांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. ते असं म्हणणार नाहीत की तू ह्या अडचणी स्वत:वर ओढवून घेतल्या आहेस, मी तुला मदत करू शकत नाही.’’ मदत करण्यासाठी, दया दाखविण्यासाठी ते माणसांची निवड करत नाहीत. ते जर निवडक माणसांवर दया दाखवत असते तर लोक त्यांच्याकडे कशाला गेली असती? लोक त्यांच्याकडे जातात कारण ते समस्यांचे निराकरण करतात किंवा ज्या मार्गाने समस्येचे निराकरण होऊ शकते तो मार्ग दर्शवितात.

इथे आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्या माणसाची लायकी असली किंवा नसली तरी महात्मा त्यास मदत करतात. महात्मांचा हा गुण खूप महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे मुलाने आगीत हात जाणतेपणी घातला की अजाणतेपणे हे जसे आई पाहात नाही त्याचप्रमाणे महात्मा फक्त त्या माणसाचे दु:ख पाहातो. त्या दु:खामागचे कारण पाहात नाही. अशी त्याची असीम करूणा असते. जर त्याने तसे दर्शविले तर ते एका गोष्टीसाठी असते की ज्या माणसाने जाणीवपूर्वक समस्या ओढवून घेतली आहे. त्यास आपली चूक कळावी ह्या हेतूने त्यास थोडेसे भोगायला लावतात . परंतु जर त्या माणसाच्या हातून अजाणतेपणी चूक झाली असेल तर ते त्याच्या मदतीला धावून जातात. ते दोन्ही प्रकारच्या माणसांना मदत करतात हे लक्षात घ्या. एका बाजूला ते मदतीला धावून जातात तर दुसऱ्या बाजूला त्या माणसाने ती चूक पुन्हा करू नये म्हणून त्यास थोडे भोगावयास लावतात.

लायकी नसणाऱ्या माणसांना परमेश्वर का मदत करतो? त्यांना सामान्य व्यवहारज्ञान नाही का? नाही, त्यास त्या तत्वाची जाणीव आहे.. म्हणूनच तो सगळ्यांनाच मदत करतो परंतु मदत करण्याची पद्धत वेगळी असते.

जर इतर माणसांमुळे साधु पुरुषास त्रास झाला तर तो लगेचच परमेश्वरास शरण जातो कारण त्याला शरणागतीचे महत्त्व समजलेले असते. त्यास माहीत असते की त्याच्यातील अहंकार घमेंड त्यास शरण जाण्यास प्रतिबंधित करत असते. ह्या कारणासाठीच परमेश्वर लगेचच त्याच्या मदतीला धावतो. द्रौपदी आणि प्रल्हादाच्या मदतीला परमेश्वर कसा धावून गेला ते आठवा, अशी मदत परमेश्वर करतो म्हणूनच त्यास `प्रपन्नार्ति हरा’ असे संबोधिले आहे.

जी माणसे कबूल करतात की ह्या जन्मातील किंवा गतजन्मातील त्यांच्या कर्मामुळेच त्यांना हे भोग भोगावे लागत आहेत, ते त्याचे उत्तरदायित्व स्वीकारतात आणि त्यांनी केलेल्या पापांचा त्यांना खरंच पश्चात्ताप होतो, ती लोकं निसर्गत: शरणागतीकडे झुकलेली असतात. ते आपोआपच परमेश्वरास शरण जातात. ज्या क्षणी माणसाच्या लक्षात येते की ह्या दुर्दैवास तोच जबाबदार आहे, भूतकाळातील माझ्या कर्मामुळे मला हे भोगावे लागत आहे.’’ त्याला त्याचा आपोआप पश्चात्ताप होतो आणि तो परमेश्वरास शरण जातो.

परंतु ज्याला ह्याची जाणीव होत नाही त्याच्याबाबतीत असे घडत नाही. आपल्या कर्मामुळेच दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. असा माणूस शरण जाऊ शकत नाही. तो मदत मागेल परंतु त्याचवेळी आपल्या मुद्द्यांवर वादविवाद घालेल ही विचित्र परिस्थिती असते. ते म्हणजे डॉक्टरकडे जाऊन असे म्हटल्याप्रमाणे आहे की, “डॉक्टर माझा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही जो काही उपचार करणार आहात, जे औषध देणार आहात त्यावरपण माझा विश्वास नाही. परंतु मला लवकर बरे व्हायचे आहे, कृपया मदत करा.’’ अशा आजारी माणसास डॉक्टर कशी मदत करणार? अशा माणसाला डॉक्टरांनी मदत का करावी? तर डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला तर आजारी माणूस वाद घालण्यास सुरुवात करतो की, “तुम्ही डॉक्टर आहात. आजारी माणसावर उपचार करणे तुमचे कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही मला मदत करा.’’

“ओ सद्‌गुरू, मी तुम्हाला शरण जाणार नाही. मी तुमच्यापुढे वाकणार नाही किंवा तुमचा आदर पण करणार नाही. परंतु तुम्ही मला मोक्ष द्या. हा काय मूर्खपणा आहे. अशा लोकांना, मानसिक रुग्णालयात पाठवून करूणा दर्शविता येईल. ह्या व्यतिरिक्त अशा माणसांना परमेश्वरसुद्धा मदत करू शकत नाही. ह्या उलट आपल्या वर्तमान स्थितीसाठी त्यांची कर्मच कारणीभूत आहेत हे जी लोकं कबूल करतात त्यांना मदत पटकन मिळू शकते. त्यांची सहनशक्ति, एकाग्रता शक्ती, विश्वास आणि धैर्य वाढवून त्यांच्या अडचणी नाहिशा होऊ शकतात. अशा लोकांना मदत करून त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न परमेश्वरसुद्धा करतो.

आपण चर्चा केली की परमेश्वर सर्व प्रकारच्या लोकांना मदत करतो. परंतु मदतीचा प्रकार वेगळा असतो. भीष्म पितामह आणि भीम हे ह्यांचे उदाहरण आहे. आपली शक्ती सिद्ध करून दाखविण्यासाठी एकदा भीमाने मूर्खपणाने आपली गदा हवेत फेकली आणि ती गदा छातीवर पडण्याची वाट पाहू लागला. गदेच्या वजनाखाली तो चिरडला गेला असता. म्हणून परमेश्वर तत्काळ त्याच्या मदतीस आला आणि त्याचे रक्षण केले.

जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर निजले होते. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास आले. भीष्म पितामह संपूर्णपणे श्रीकृष्णास शरण गेले होते. अर्जुनाच्या बाणांच्या माध्यमातून गंगा नदीचे पाणी भीष्मांच्या तोंडापर्यंत पोहोचेल ह्याची व्यवस्था श्रीकृष्णांनी केली होती. त्याने नंतर त्यांना ज्ञान दीक्षा दिली.

भीष्म पितामह आणि भीम ह्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. भीष्म पितामहांना आपली चूक समजली होती आणि पूर्ण पश्चात्तापाच्या भावनेने ते श्रीकृष्णास शरण गेले होते. परमेश्वराने त्यांचे रक्षण केले. दुसऱ्या बाजूस भीमाने अजाणतेपणी चूक केली. त्याला त्याच्या भक्तीवर पूर्ण विश्वास होता. जर परमेश्वर मध्ये आला नसता तर त्याचे तुकडे झाले असते. भीमाला त्याने सल्ला दिला आणि भीष्मास ज्ञान दिले. अशा प्रकारे त्यांनी दोघांचे रक्षण केले. परंतु वेगळ्या पद्धतीने केले.

जे दीन आहेत, परंतु त्यांना ह्या सगळ्याची जाणीव नाही त्यांना पण ते आपला नातेवाईक मानतात . ते त्यांना मदत करतात . म्हणूनच त्यास दीनबंधु असे म्हटले आहे. हे परमेश्वराचे स्वभाववैशिष्ट्य आहे.

जो रुग्ण उघडपणे डॉक्टरांना सांगतो की त्याचा त्यांच्यावर विश्वास नाही. परंतु त्यास औषध पाहिजे आहे. अशा माणसाला सर्वसाधारण डॉक्टरसुद्धा औषध देतो. जर अशा सर्वसाधारण डॉक्टरच्या अशा उदात्त भावना असतील तर मग परम ईश्वराबाबत आणखी काय सांगता येईल? म्हणूनच तो दीनबंधु आहे.

इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, अशा लोकांची शिक्षा तो कमी करत नाही. तो हळूहळू त्यांची ओळख सत्‌संगत्यशी करून देतो आणि त्याचबरोबर कमी प्रमाणात त्यांना शिक्षा देतो. त्याच्या खऱ्या सत्‌संगत्यामुळे त्याचा कल हळूहळू धर्माकडे झुकू लागेल ह्याची खात्री तो करून घेतो. त्याचसोबत त्याला थोड्या प्रमाणात ज्ञान प्रदान करतो. ह्या सगळ्यातून त्याची पापं हळूहळू कमी होतील ह्याची तो खात्री करून घेतो आणि शेवटी त्यास कायमस्वरूपी संरक्षण देतो.

रावण आणि हिरण्यक्ष ह्या दानवांच्या बाबतीत परमेश्वराने ह्या तत्त्वाचे अनुकरण केले. जरी रावणाने गुन्हा केला होता तरी त्यास रक्षण दिले. त्याने त्यापासून धडा घेतला की नाही ह्याची खात्री केली आणि शेवटी त्यास शिक्षा दिली. असेच त्याने हिरण्यक्ष आणि इतर दानवांबरोबर केले. त्याने त्यांचा नाश केला नाही. त्याने शिक्षा केली आणि मग रक्षण केले.

ह्या सगळ्यातून असे स्पष्ट झाले की तो सगळ्यांनाच मदत करतो, ती व्यक्ती शरण गेली आहे की नाही ह्याची पर्वा तो करत नाही. फक्त मदत करण्याची पद्धत वेगळी असते इतकेच.

सर्व रक्षाकरम्‌ – तो सगळ्यांना मदत करतो. ह्या सगळ्यातून आपल्याला समजते की माणूस शरण गेला किंवा नाही, काहीही असले तरी परमेश्वर मदत करतो. “प्रपन्नार्ति हरम्‌’’ (जे शरण गेले आहेत त्यांचे दु:ख दूर करतो.) आणि “दिनबंधू’ हे विरेाधी शब्द नाहीत. दोन्हीही सत्य आहे. त्यातील फरक असा आहे की जो माणूस शरण जातो त्यास तो लगेचच ज्ञान प्रदान करतो. इतरांच्या बाबतीत तो मदत करतो आणि विविध पद्धतींचा वापर करून तो आपला भक्त बनेल त्याची खात्री करून घेतो. तो असे परिवर्तन घडवितो की भक्त पूर्णपणे समर्पित होतो.

धृवाकडे कोणते ज्ञान होते? त्या लहान बालकास काहीच माहीत नव्हते. त्याच्यासमोर प्रकट झाल्यानंतर परमेश्वराने त्याच्या जीभेवर बीजाक्षरे लिहिली आणि त्या बालकाकडून स्तुती करवून घेतली आणि त्यास ज्ञान प्रदान केले. कृपा सिंधुम्‌’ आणि `सर्व रक्षकरम्‌’ ह्या दोन वाक्यांशामध्ये एक खूप महत्त्वाचा वाक्यांश येतो.

सर्व कारण कारणम्‌ –

ह्यात परमेश्वराचे तत्त्वसार किंवा त्याचे खरे स्वरूप स्पष्ट होते.

ह्या जगात प्रत्येक कृतीमागे एक कारण असते. सर्व ऐहिक गोष्टी पंचभूतांपासून उदयास येतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पंचमहाभूतं त्यांच्या अस्तित्वाचे कारण आहे. आता पंचमहाभूतांच्या अस्तित्वाचे कारण काय आहे? त्याच्या अस्तित्वाचे कारण परमेश्वर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आपले दत्तात्रेय भगवान ह्या निर्मितीतील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीचे कारण आहेत. ते सर्व कारण कारणम्‌ आहेत.

वंदे - अशा परमेश्वरास माझा नमस्कार.

स्मर्तृगामी सनोवतु: - स्मरण करताच तत्क्षणी येणारा परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो. !

स्मर्तृगामी सनोवतु: हा वाक्यांश म्हणजे मुकूट आहे आणि त्याचे वारंवार स्मरण करणे गरजेचे आहे.

दुसऱ्या श्लोकात असलेले तत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला कार्तवीर्याजून आणि परशुराम ह्यांच्या गोष्टीचा सखोल अभ्यास करावा लागेल. शरण जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर काय होते? परमेश्वर मदत कशी करतो? हे सर्व त्यांच्या गोष्टीतून खूप स्पष्टपणे समजेल.

कार्तवीर्य आणि परशुराम हे एकमेकांचे शत्रू होते. परंतु दोघांचेही गुरू दत्तात्रेय भगवान होते. एक भक्त होता, दुसरा नव्हता. असं नव्हतं की दुसऱ्याकडे भक्ती नव्हती. त्याची भक्ती वेगळ्या प्रकारची होती. दुसऱ्यास कळून न देता दोघांनीही दत्तात्रेय भगवांनाचा आश्रय घेतला होता आणि ते दत्तगुरूस शरण गेले होते. सर्वज्ञानी परमेश्वराने दोघांना मदत केली. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने. आपण परमेश्वरास शरण गेलो आहोत ह्याची जाणीव दोघांनाही नव्हती. ते कडवटपणे लढले. त्यांनी दोघांचे रक्षण केले. एकास जीवनमुक्ती प्रदान केली. एकाने शरीर त्याग करून परमअवस्था प्राप्त केली. कार्तवीर्य शापातून मुक्त झाला आणि स्वर्गात परतला. परशुराम त्याच्या क्रोधातून मुक्त झाला आणि त्यांचे रूपांतर ब्रह्मर्षीत झाले. परमेश्वराने दोघांना वरदानं दिली. दोघांना योगाचा आशीर्वाद दिला.

परमेश्वरास शत्रू नसतो. म्हणूनच त्यांनी दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणले.

अशाच प्रकारे कोणी त्याला शरण गेले असले किंवा नसले तो प्रत्येक जीवीत प्रवृत्ती परिवर्तन घडवून आणतो.

ह्या श्लोकाच्या प्रत्येक टप्प्यात `स्मर्तृगामी सनोवतु’ ह्या शब्दांचे स्मरण हे केलेच पाहिजे. पूर्ण श्लोकातील हे खूप मौलिक तत्व आहे.

Tags: