दत्तात्रेयम् महात्मानम् वरदम् भक्तवत्सलम्।
प्रपन्नार्ति हरम् वंदे स्मर्तुगामी सनोवतु।।
दत्तात्रेय ह्या शब्दाच्या अर्थाची चर्चा आपण आधीच केली आहे. आपल्याला हे पण समजले आहे की ते त्याचे नाव नसून ती त्याची उपाधी आहे. दत्तात्रेयाचा अर्थ अत्रींची भेट.
ह्या सृष्टीतील कोणत्याही जीवीबाबत किंवा वस्तूबाबत जाणून घेण्याच्या दोन पद्धती आहेत – नाव आणि स्वरूप. ह्या दोन्हीच्या अनुपस्थितीत त्यांच्याबद्दल जाणून घेणे अशक्य असते. त्यासाठी तिसरी पद्धत नाही. आतापर्यंत आपल्याला असे समजले की ह्या देवास नाव नाही. त्यामुळे आता आपल्याला असे लक्षात येईल त्यास जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करावे लागेल. म्हणूनच त्याचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांची तीन मस्तकं आहेत. ह्यातून आपण निर्णायकपणे असे अनुमान काढू शकतो का कि हे स्वरूप फक्त तीन मस्तकांचे आहे? नाही. ह्याचे कारण असे आहे की आपण अगोदरच चर्चा केल्यानुसार 33 करोड देवतांनी तीन प्रमुख देवतांच्या माध्यमातून स्वत:ला तीन मस्तकं असलेल्या स्वरूपात महर्षि अत्रींना भेट दिली. परमेश्वराने हे स्वरूप धारण केले, परंतु ते त्याचे मूळ स्वरूप नाही. म्हणून ह्या परमेश्वराबद्दल जाणून घेण्यासाठी त्याच्या मूळ स्वरूपाबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. तरच आपण त्यांच्याबाबत जाणून घेऊ शकतो. ह्या श्लोकात त्या स्वरूपाचे वर्णन ` महात्मानम्’ ह्या शब्दातून केले आहे.
अलीकडे महात्मा ह्या शब्दाला महत्व राहिले नाही. एक तर ज्यांना महात्मा म्हणून संबोधिले जाते त्यांच्याकडे कमीपणाच्या नजरेने पहिले जाते. नाही तर असे पाहिले आहे की उत्तर भारतात भगवे वस्त्र धारण केलेल्या प्रत्येकास ते महात्मा म्हणून संबोधतात. ज्या माणसाने भगवे वस्त्र परिधान केले आहे, हातात लांब रुद्राक्षाची माला आहे, ज्यांची लांब दाढी आणि जटा आहेत त्यास महात्मा किंवा साधू म्हणून संबोधतात. मग त्या पदासाठी त्याची लायकी आहे की नाही ते पाहत नाहीत. दक्षिण भारतात विचित्र प्रघात आहे. जे चमत्कार करतात. उदा. नाणी निर्माण करतात किंवा कॉफी पावडर निर्माण करतात त्यांना महात्मा असे सांबोधतात. आताची अशी मजेशीर परिस्थिती आहे. ह्यापैकी `महात्मा’ ह्या शब्दाची योग्य व्याख्या नाही. मग महात्मा कोण?
महात्मानम् तो, ज्याचा आत्मा विभाजित नाही, जो स्वत:स पूर्ण सृष्टी मानतो आणि जो स्वत:ला ह्या सृष्टीत सगळीकडे पाहातो, तो खरा महात्मा. त्यास अंतर्यामि किंवा साक्षी असेही म्हणतात. हे दत्तात्रेय भगवानांचे मूळ सत्य स्वरूप आहे.
म्हणूनच दत्त हा सर्वसाधारण जीव आहे असे गृहित धरू नका. ते भगवे कपडे घालून चमत्कार करत फिरत नाही. त्यांच्या आश्रयास जाणे हाच मोठा चमत्कार आहे! ह्या सृष्टीत ते स्वत:ला सगळीकडे पाहतात. ते सगळीकडे अस्तित्वात आहेत. असे स्वरूप आपण चर्चा केलेल्या परमेश्वराचे आहे, त्या परमेश्वरास नाव नाही.
अशा प्रकारे श्लोकाची सुरुवात `दत्तात्रेयम् महात्मानम्’ अशा शब्दांनी होते. ह्यातूनच स्वामी वासुदेवानंद सरस्वती परमेश्वरास नाव आणि रूप नाही ह्यावर भर देतात.
अशा परमेश्वराकडून आपल्याला काय फायदा मिळणार आहे? ह्याचे आता स्पष्टीकरण दिले आहे.
वरदम् – ते इच्छा पूर्ण करतात.
भक्तवत्सलम् – ज्याचे आपल्या भक्तांवर कोमल प्रेम आणि ममत्व असते आणि त्यांना जो आपल्या मुलांसमान समजतो. इथे तो भक्तांवर पितृप्रेमाचा वर्षाव करतो असे समजून घ्यावे. फक्त प्रेम आणि ममत्वापेक्षा ते खूप श्रेष्ठ दर्जाचे असते.
सर्वसाधारणपणे वरदम् ह्या शब्दाचा अर्थ - आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर, असा समजला जातो.
ह्या वाक्यांशाचा खरा आंतरिक अर्थ असा आहे. `भक्तांसाठी उज्ज्वल भविष्यसूचकाचे वरदान तो देतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भक्तांनी मागितलेल्या वरांपैकी जे त्याच्यासाठी योग्य आहे त्याचेच तो वरदान देतो. भक्तांच्या सर्व मागण्या तो पूर्ण करत नाही. हे इथे समजून घ्यावयास हवे. जी मागणी सगळ्यात योग्य आहे त्याचे तो वरदान देतो. अशी त्याची करुणा असते. अविचारपूर्वक जर त्याने आपली प्रत्येक मागणी पूर्ण केली तर आपली तुलना माकडाशी करावी लागेल. आपल्याला कशाची गरज आहे आणि कशाची नाही हे आपल्याला समजत नाही.
म्हणूनच परमेश्वराजवळ जाताना सगळ्यात चांगला दृष्टिकोन असा ठेवावा. “हे परमेश्वरा! तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य, उचित वाटते ते मला द्या. परमेश्वरा! मी हेसुद्धा मागत नाही. तुम्हाला मला द्यावेसे वाटले तर द्या. नाहीतर माझ्याकडे जे आहे त्यात मी आनंदी आहे. मी आपल्यापुढे उभा आहे. जो मार्ग माझ्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. त्या मार्गावर मला न्या. तुम्हाला जर मला रडवायचे असेल तर ते त्याचापण मी स्वीकार करीन. हाच मार्ग तुम्ही माझ्यासाठी निवडला असे मी समजेन. तुम्ही जर मला हसवलेत तर मी असे समजेन की, हा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे आणि त्या मार्गाने मी पुढे जाईन. जर तुम्हाला असे वाटत असेल की मी रडण्याच्या मार्गाने पुढे जावे तर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. त्या वेदना दु:ख सहन करण्याची ताकद तुम्ही मला द्या. हे सहन करण्याची शक्ती जर तुम्ही मला दिलीत तर मी सर्व यातना, दु:ख सहन करण्यास तयार आहे. परंतु हे परमेश्वरा! त्या यातनेत सुद्धा रडतानासुद्धा मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही मला ज्ञान द्या.
प्रत्येक भक्ताने अशा पद्धतीने प्रार्थना करण्यास शिकावे.. आपल्याला आपले कर्म संपवायचे आहे. त्यातून सुटका नाही. म्हणूनच दु:ख नाहीशी कर किंवा आयुष्यभर सुखी राहू दे अशी प्रार्थना कधीही करू नका. मग तुमची कर्म कोण संपवणार?
दुसरे म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा तुमच्यासाठी योग्य नसतात. समजा एक लहान मूल ब्लेडबरोबर खेळत आहे. आई येऊन मुलाकडून ते ब्लेड हिसकावून घेते. तुमच्या इच्छासुद्धा ब्लेडसमान असतात. ते ब्लेड आहे ह्याची तुम्हाला जाणीव नसते. ती इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला कापते, इजा होते आणि नुकसान होते. म्हणूनच अशा इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छेने तुम्हाला काहीच फायदा होणार नसतो किंवा पूर्ण झाली तर त्याने तुमचे पूर्ण नुकसान झाले असते. म्हणूनच भक्तासाठी कोणती इच्छा योग्य आहे ह्याची जबाबदारी परमेश्वर स्वत: वर घेतो आणि त्यानुसार वरदान देतो.
प्रपन्नार्ति हरम् – जो त्यास पूर्णपणे शरण (प्रपन्न) गेला आहे त्याची पीडा (अर्ति) तो दूर करतो.
तुम्ही असे विचाराल – आमच्या इच्छापूर्तीबरोबर परमेश्वर आमच्या अडचणीसुद्धा दूर करतो का? तो नक्कीच दूर करतो. परंतु ह्या बाबतीत काही विशिष्ट अटी असतात. तुम्ही जेव्हा पूर्णपणे समर्पित (प्रपन्न) होता तेव्हा परमेश्वर प्रसन्न होतो. समर्पण मनापासून, पूर्णपणे व्हायला हवे. ह्याचा अर्थ तुम्ही तुमची जबाबदारी मनापासून बिनशर्त त्याच्यावर सोडायला हवी.
आपल्याला माहीत आहे की, दरबारात श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला आला. पण केव्हा? जेव्हा तिने पूर्ण शरणागतीच्या भावनेने दोन्ही हात वर करून कृष्णा-कृष्णा अशी हाक मारली…..’’ जोपर्यंत ती तिची लढाई लढत होती, कृष्ण शांतपणे तिच्याकडे पाहात होता. जेव्हा ती पूर्णपणे असफल झाली तेव्हा तिने संघर्ष थांबविला आणि परमेश्वरास शरण गेली. मग तो तात्काळ तिच्या सुटकेसाठी धावला.
ह्यातून आपण असे शिकतो की आपण आपल्या क्षमतेनुसार अडचणींचा सामना करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. ते आपले कर्तव्य आहे. तुमच्यातील शक्ती पण परमेश्वराने दिलेली आहे. अडचणींचा सामना करण्यासाठी तिचा वापर करा. नाहीतर ते पाप मानले जाईल. तुम्हाला त्यानंतरही अडचणींचा सामना करण्यासाठी आपोआप शक्ती मिळत राहिल. जीवनातील प्रत्येक छोटी अडचण सोडविण्यासाठी किंवा क्षुल्लक काम पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडे जाणे चुकीचे आहे. समजा एका व्यक्तीने खूप काम करून पैसे कमाविले आणि धान्य आणले. आता तो असे म्हणू शकतो का? हे परमेश्वरा! तू माझी जबाबदारी घेतली आहेस म्हणून येऊन स्वयंपाक कर किंवा तो घास तोंडात ठेवून असे म्हणू शकेल का की, परमेश्वरा! आता माझ्या तोंडातील अन्न पोटात ढकल. मी गिळणार नाही. मी फक्त बसून राहीन. हे व्यवहार्य होईल का? मग तुम्ही प्रथम काम का केलेत? तुम्ही अर्धवट जबाबदारी घेऊ शकत नाही. काही कामं तुम्हीच संपवायची असतात. ते शक्ती, बल देतात. तुम्ही असं म्हणू शकता का? मी फक्त घरी बसून राहीन, परमेश्वरास सगळे करू दे. त्याबाबतीत मग तुम्हाला चालण्याचा, बोलण्याचा, खाण्याचा हक्क नाही. तुम्ही फक्त दगडाच्या पुतळ्याप्रमाणे बसून राहा. एका बाजूला तुम्ही जीवन उपभोगता, स्वत:च्या इच्छा पूर्ण करता आणि दुसऱ्या बाजूला परमेश्वरास अडचणींची जबाबदारी घेण्यास सांगता हे योग्य नाही.
जर तुमची जबाबदारी खरंच परमात्म्याने स्वीकारावी असे तुम्हास वाटत असेल तर प्रथम तुम्ही पूर्ण आत्मार्पण करण्यास शिका. जोपर्यंत क्षमता असेल तोपर्यंत आपला लढा स्वत: लढा. नंतर त्यांच्या दयेवर सोडून द्या.
पृथ्वीवर एकेकाळी एक वेडा साधू होता. प्रत्येक क्षणी तो परमेश्वराचे नाव घ्यायचा “शिव शिव……’’ एके दिवशी मुलांनी त्या वेड्या साधूस पाहिले आणि त्याच्या दिशेने दगड फेकले. आपला भक्त अडचणीत आहे बघून त्वरित शिव भगवान त्याच्या मदतीला आले. परंतु तोपर्यंत हा दगड उचलून प्रतिकार करू लागला. शिव लगेचच आपल्या घरी परत गेले. पार्वती देवींना याबाबतीत सविस्तर माहिती हवी होती. शिवजींनी उत्तर दिले, “तो ध्यानात पूर्णपणे हरवला होता म्हणून मला वाटले की त्याचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. म्हणून मी मदत करण्यासाठी त्वरित गेलो. परंतु त्याने माझ्यावर ध्यान करण्याचे सोडून स्वत:चे रक्षण करण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले. जर तो स्वत:चे रक्षण करण्यास समर्थ आहे, तर मी तिथे कशाला थांबू? म्हणून मी घरी परत आलो. जर त्या साधूने परमेश्वरावर ध्यान करणे चालू ठेवले असते तर त्या दगडांनी त्यास इजा झाली नसती. कारण शिव भगवानांनी त्याची काळजी घेतली असती. ह्यातून आपल्याला पूर्ण आत्मार्पणाचे तत्त्व समजते.
वंदे –आदरणीय परमात्म्यास मी खाली वाकून नमस्कार करतो.
स्मर्तुगामी सनोवतु – स्मरण करताच तत्क्षणी येणारा परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो.
दत्तदर्शनम्मधील धर्मकीर्ती राजाच्या गोष्टीतून पहिल्या श्लोकातील तत्त्व आपल्याला समजेल.
आस्तिकता आणि नास्तिकतेच्या मध्ये झुलत असलेला धर्मकीर्ती राजा एकदा दत्तात्रेय भगवानांकडे गेला आणि धर्माचे ज्ञान देण्याची विनंती त्यांना केली. दत्तात्रेयांनी थोडा विचार केला आणि शेवटी त्यास ज्ञान प्रदान करण्यास तयार झाले. धर्मकीर्ती थोडे दिवस भगवानांसोबत राहिला आणि राजधर्म शिकला. नंतर तो राज्यात परत आला आणि काही काळ धर्माचे कठोरतेने पालन केले. त्यानंतर हळूहळू तो नास्तिकांच्या प्रभावाखाली आला. मित्राच्या वाईट प्रभावाखाली तो भगवानांनी शिकविलेले सर्व विसरून गेला. तो इतक्या टोकाला गेला की तो भगवानांनाच विसरून गेला. जरी तो स्वत: भगवानांबरोबर राहिला होता आणि धर्माचे ज्ञान भगवानांकडून प्राप्त केले होते आणि बराच काळ कठोरतेने धर्मपालन केले होते तरी वाईट संगतीमुळे तो ते सगळे विसरून गेला. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ज्या भगवानांनी त्यास शिकविले त्यांनाच तो विसरून गेला. त्याच्या बाबतीत भक्ताने मागितलेले वरदान श्रेष्ठ होते म्हणून भगवानांनी ते मान्य केले आणि त्याची इच्छापूर्ती केली. परंतु भक्त पूर्णपणे भगवानांना समर्पित झाला नव्हता. त्याला धर्माचे ज्ञान मिळावे अशी इच्छा त्याने केली होती परंतु भविष्यकाळात वाईट काळ पण त्याच्यावर हल्ला करेल ह्याची अपेक्षा त्याने केली नव्हती. तसेच त्याने आत्मार्पणसुद्धा केले नव्हते.
वाईट संगतीमुळे राजाला कित्येक वाईट सवयींचे व्यसन लागले. त्याच्या दुर्गुणात तो अडकला. शेवटी जेव्हा मृत्यू जवळ आला तेव्हा त्यास पूर्ण पश्चात्ताप झाला. त्या शेवटच्या क्षणी त्याने भगवानांना आत्मसमर्पण केले. परमात्म्यास आत्मार्पण करण्याचे महत्त्व त्यास तेव्हा समजले.
दत्तात्रेय भगवान स्मर्तृगामी आहेत. स्मरण करताच लगेचच ते येतात. ज्या क्षणी राजा खोलवर पश्चात्तापाने आणि संपूर्ण आत्मार्पणाच्या भावनेने व्यापून गेला . तेव्हा त्या राजाचा अंतरात्मा (जीवी) संताच्या घरी पुनर्जन्म घेईल ह्याची त्याने खात्री केली. अशा प्रकारे त्यांनी राजास अधिक चांगल्या जन्माचा आशीर्वाद दिला. ह्याबरोबर त्याच्या सर्व पीडा संपल्या. त्या लहान मुलास पूर्वजन्माची स्मृती असल्यामुळे तो सतत स्वत:ला वाईट संगतीपासून दूर ठेवत होता. आपण स्वतः: नेहमी चांगल्या संगतीत राहू ह्याची खात्री तो करून घेत होता. असे जागृत राहून त्याने त्या जन्मातच मोक्ष प्राप्त केला.
धर्मकीर्तीच्या गोष्टीत दत्तात्रेय भगवानांच्या सर्व परिभाषा – दत्त वरदम् (वरदान देणारा), भक्त वत्सलम् (आपल्या मुलांप्रमाणे भक्तांवर प्रेम करणारा) आणि प्रपन्नार्ति हरम् (सर्व त्रास नाहिसा करणारा) अर्थपूर्ण ठरतात.