काही लोक जन्मजातच संपन्न असतात. ते ज्यास स्पर्श करतात त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते . परंतु, काही लोकांकडे असे सर्वकाही असूनदेखील त्यांच्या मनाला शांती मिळत नाही. असे का होते? काही लोक विद्वान कुटुंबात जन्मलेले असतात तर फारच कमी लोकांना खूप चांगली स्मरणशक्ती लाभलेली असते. कुठलीही गोष्ट त्यांच्या मनावर अंकित केल्याप्रमाणे सहजी लक्षात राहते. परंतु काही लोक मात्र, विविध प्रकारचे शिक्षण घेतल्यानंतरदेखील कोणतेही छोटे-मोठे कार्य करण्यास असमर्थ ठरतात. असे का असते? बऱ्याच लोकांना जन्मापासूनच गुरू सानिध्यात राहण्याची संधी मिळते तर फारच थोड्या लोकांचा थोर व्यक्ती आणि महात्म्यांकडून आदर लाभतो. परंतु, असे काही लोक असतात ज्यांना अथक साधना करूनही शांतता मिळत नाही. असे का होते? या सगळ्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण काय करू शकतो? असे प्रश्न अनेकदा आपल्या मनामध्ये येतात. या प्रश्नांची उकल करण्यासाठी, आपण सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की केवळ काहीच लोक अशा परिस्थितीमध्ये जन्माला येतात. लोक अशा परस्परविरोधी परिस्थितीमध्ये कोणत्या कारणासाठी जन्माला येतात हे आपण समजून घेतले पाहिजे. अनुकूल परिस्थितीमध्ये जन्म घेण्यामध्ये आपली हुशारी काहीच नसते. त्याचप्रमाणे आपली कामे सहजपणे साध्य होणे, हादेखील आपल्या बुद्धिमत्तेचा परिणाम नसतो. मग हा कशाचा परिणाम आहे? हा सर्व गतजन्मातून संपादन केलेल्या आपल्या कर्मांचे फल आहे. या संकल्पना दैनंदिन व्यवहारात आपल्याला ‘विधी ’ आणि ‘काळ’ या नावांनी सुपरिचित आहेत . काळाच्या महिम्यामुळेच सकाळी सूर्य उगवतो, दुपारच्या वेळी कडक उष्णतेने जगाला जाळतो आणि अखेरीस सायंकाळी त्याची ताकद कमी होऊन तो समुद्रामध्ये विलीन होतो. हे सर्व काळाच्या प्रभावामुळे होत असते.
विद्या, अध्यात्मिक विवेक बुद्धी इत्यादी संपत्ती आपल्याला आपल्या गतजन्मातील चांगल्या कर्मांचा परिणाम म्हणून प्राप्त झालेल्या असतात. म्हणूनच आपण सत्कर्म करत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. तसेच ज्ञान प्राप्त करून घेऊन आत्मोन्नती करून घेणेदेखील आवश्यक आहे. हे लक्षात न घेताच, जो माणूस - घडणारे सर्व माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावारच घडत आहे. - असे मानून अहंकारी होऊ लागला तर त्याचे अध:पतन हे निश्चित त ठरलेलेच असते. सूर्यालाही महासागरात विलीन व्हावेच लागते आणि सर्वत्र अंधाराचा साम्राज्य पसरते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीलादेखील अधोगतीला सामोरे जावे लागते. धनं विद्यां च विज्ञानं प्राप्य गर्वावृतो यदि | प्रातर्मध्यां च सायान्हम् प्राप्य हन्त हतो रवि: || संपत्ती, विद्या आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केल्यानंतरदेखील; जर एखादा व्यक्ती अहंकारी झाला तर त्याची अधोगती निश्चित असते. सकाळ आणि दुपारची वेळ ओलांडल्यानंतर सूर्य संध्याकाळी समुद्रामध्ये विलीन होतो. म्हणूनच, तुम्ही जी काही संपत्ती मिळविली आहे ती परमेश्वराच्या कृपेमुळे आहे असे तुम्हाला असे वाटले पाहिजे . आणि म्हणूनच तुम्ही सत्कर्मात स्वत:ला गुंतवणे आवश्यक आहे. हे आपण या सूक्तीतून शिकतो. ॥ जय गुरुदत्त ॥ ॥ श्री गुरुदत्त ॥