SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
०२ दत्तवाणी: मोक्ष ही सर्वोच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी सत्संग साधनाचा वापर करा.

आपण येथे एका उदाहरणाचा विचार करू. त्रिकोणी आकाराची एक नौका आहे तिच्या तीनही कोपऱ्यांना तीन दोर बांधले आहेत आणि ह्या तीन दोरांच्या साह्याने तीन लोक तीन वेगवेगळ्या दिशांना बोट ओढत आहेत. तर मग नौका कोणत्या दिशेला जाईल? ज्यांना ‘वेक्टर अल्जीब्रा ’ म्हणजेच सदिश बीजगणिताबद्दल माहीत आहे तेच या प्रश्नाचे योग्य ते उत्तर देऊ शकतात. नौकेची परिणामकारक गती ही ती नौका खेचणाऱ्या त्या तिन्ही लोकांकडून परिणामकारकतेने वापरल्या जाणाऱ्या बळ , दिशा आणि शक्ती यांवर अवलंबून असेल. या उदाहरणाच्या अनुषंगाने विचार केला असता, आपले जीवनदेखील एक प्रकारे या त्रिकोणी नौकेप्रमाणेच आहे. संगत - मैत्री, आपल्या इच्छा आणि गतजन्मापासून आपण प्राप्त केलेले संस्कार ह्या त्या तीन शक्ती आहेत, ज्या आपल्याला त्यांच्या दिशेने खेचत असतात.

यद्भावमाप्तुं हृदि वाञ्छसि त्वम् शक्तो सि यद्भावयुतैर्जनैश्च | प्राग्वासनाभिर्निश्चितो सि याभि: उत्पादयते ते त्रिभिराद्यभावा: ||

ही सूक्ती आपल्याला सांगते की आपल्या इच्छा, आपल्याला लाभलेली संगत,(स्नेह) , आणि गतजन्मांपासून आपण प्राप्त केलेलेसंस्कार यांवर आधारित आपली सद्य परिस्थिती असते. या तिघांपैकी कोणाचे सामर्थ्य जास्त, त्याआधारे फलित निश्चित होत असते. अशी ही परिणामकारक शक्ती आपल्या शरीराला आपल्या मनासहित आणि इंद्रियांसहित फरपटत ओढत नेते. अशी ही शरीररूपी नौका किनाऱ्यापर्यंत सुखरूप आणण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? या तीन शक्तींपैकी कोणत्या शक्तीला नियंत्रणाखाली आणता येईल? इच्छा आणि संस्कार मुळातच आपल्या नियंत्रणामध्ये नसतात. आपण फक्त आपल्या मैत्रीवर, संगतीवर नियंत्रण ठेवू शकतो. थोर व्यक्तींशी मैत्री (उत्तम स्नेह )करून आपण स्वतःला बदलू शकतो. मग, स्वाभाविकच ही शक्ती इतर दोन्ही शक्तींपेक्षा अधिक सामर्थ्यवान होते. आणि म्हणूनच, जे सद्गुरूंचा आश्रय घेतात ते सहजपणे सन्मार्गावर जातात. सत्संगात अशी दिव्य शक्ती असते. म्हणूनच, आपण शक्य तितका उत्तम स्नेह विकसित करणे आवश्यक आहे. ते आपल्याला उत्तम गतीकडे घेऊन जाते. . या शरीराला नौकेची उपमा का दिली आहे? जन्म-मृत्यूचे चक्र अव्याहतपणे सुरू असणारे हे भौतिक, सांसारिक जग म्हणजे एक प्रचंड महासागर आहे. आपल्याला आपले शरीर त्यातूनच ओढत न्यायचे आहे. जेव्हा या नौकेला सत्संग नावाच्या शक्तिशाली दोरीने ओढले जाईल तेव्हा स्वाभाविकच ती उत्तम मार्गावरून जाऊ लागेल. . अन्यथा, संसाररूपी या विशाल महासागरामध्ये आपली ही नौका कोठे जाईल हे आपल्याला ठाऊक नसते. कारण आपल्या इच्छा आणि गतजन्मापासून प्राप्त झालेले संस्कार आपल्या नियंत्रणाखाली नसतात. थोर व्यक्तींसोबतची मैत्री(उत्तम स्नेह ) ही आपल्याला मोक्षापर्यंत (संसारापासून मुक्ती) नेऊ शकते.

॥ जय गुरु दत्त ॥ ॥ श्री गुरू दत्त ॥