चुकणे हा मानवाचा स्वभाव आहे. काहीजण नकळत चुका करतात. परंतु काहीजण मात्र जाणूनबुजून चुका करतात. जाणीवपूर्वक केलेल्या चुकांचे परिणाम खूप वाईट होतात. हे आपल्या प्रत्येकाला माहिती असते. अशा चुकांवर आपल्याला खरोखरच विजय मिळवता येईल की नाही याबद्दल आपल्याला साशंकता असते. यासाठी एक साधा मार्ग आहे. जेव्हा एखादी चूक होणारच असते तेव्हा आपण मनातल्या मनात असे म्हणायला हवे की, ‘मी चूक करीत आहे आणि त्यावर मात करण्यास मी असमर्थ आहे. आपल्या चुकांवर विजय मिळविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी सत्संगाची (पुण्यवान आणि माहात्म्यांशी असलेली संगत) वेळोवेळी मदत होते. तसेच, दिव्य नाम संकीर्तन म्हणजेच नामजप करण्याची सवय स्वत:ला लावणे आवश्यक असते. चांगल्या लोकांशी मैत्री आणि नाम संकीर्तनामुळेच मनुष्य मनावर नियंत्रण ठेवू शकतो. यांपैकी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर केलेली चूक स्थापित होते आणि ती आणखीच बळकट होत जाते. म्हणून सत्संग आणि नाम संकीर्तन हे मानवी जीवनाचा एक भाग असणे अत्यंत आवश्यक आहे.
उड्डीय दूरादपयातुमिच्छु: सखे दूरभ्यास वनात् यदि त्वम् | श्रीविष्णुसंकीर्तन साधुसंगौ बधान पक्षाविव राजहंसः ||
ही किती सुंदर संकल्पना आहे! वाईट सवयी या चाबकासमान असतात. त्यांच्या कचाट्यातून आपण इतक्या सहजासहजी सुटू शकत नाही. वाईट सवयींची तुलना आपण घनदाट, भयप्रद अरण्याशीदेखील करू शकतो. वाईट सवयींचे, दुर्गुणांचे हे असे जंगल आहे की जे पार करायला प्रचंड अवघड असते आणि काट्याकुट्यांनी भरलेले असते. ज्यातून सुखरूपपणे बाहेर पडण्याचा मार्ग सहजी दिसणे अवघड आहे. अशा भयकारी अरण्यातून आपल्याला एखाद्या पक्ष्याप्रमाणे अलगद बाहेर पडायचे असेल तर आपण सत्संग आणि दिव्य नाम संकीर्तन नावाच्या दोन पंखांचा वापर करून दूर जाणे सर्वांत उत्तम पर्याय आहे. त्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. असे पंख मिळाल्यावर एखाद्या राजहंसाप्रमाणे आपण वाईट सवयी व दुर्गुणरूपी वन्य जंगलातून बाहेर पडून मानस सरोवरापर्यंत म्हणजेच आनंद सरोवरापर्यंत पोहोचू शकतो.
॥ जया गुरु दत्त ॥ ॥ श्री गुरू दत्ता ॥