SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
भज गोविंदम १०: सत्पुरुषांचा सहवास मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. (श्लोक ९)

सत्संगत्वे निस्संगत्वम् निस्संगत्वे निर्मोहत्त्वम् |
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वम् निश्चलतत्त्वे जीवनमुक्तिः || ९ ||

अर्थ - सत्पुरुषांचा सहवास किंवा मैत्री माणसाच्या मनास भौतिक जगाशी असलेल्या सांगत्यापासून परावृत्त (निस्संगत्व ) करते. त्यामुळे मन मोहापासून (निर्मोह) मुक्त होते. जेव्हा मोह दूर होतो तेव्हा मन निश्चल होते आणि त्या व्यक्तीला यथार्थ ज्ञान प्राप्त होते. असे झाल्यानंतर तो जीवन मुक्त होतो.

इतर बऱ्याच शास्त्रात सत्संगाचे महात्म्य सांगितले आहे! जीवनात सत्संग करत राहण्याच्या महत्त्वावर जोर देणाऱ्या बऱ्याच कथा आहेत.

एकदा महर्षि नारदांना हे जाणून घ्यायचे होते की सत्पुरुष (महान व्यक्ती) म्हणजे नक्की कोण?, सत्पुरुषाच्या सहवासाने काय फळ प्राप्त होते?, एखाद्या व्यक्तीवर त्याचा काय प्रभाव पडतो ? ताबडतोब त्यांनी महाविष्णूंजवळ येऊन आपल्या मनातील प्रश्न विचारले. प्रत्युत्तरादाखल महाविष्णूंनी उत्तर दिले, “हे नारदा! भूलोकावर, महिष्मतीपुरम नावाच्या शहरात, एका डुकराने नुकताच पिल्लांना जन्म दिला आहे आहे. कृपया जाऊन तिला भेटून ये.”

महर्षि नारद पूर्णपणे गोंधळलेले होते, परंतु परमेश्वराबद्दल असलेल्या आदरामुळे त्यांनी त्या डुकरीणीला भेट दिली. डुकरीणीने नारदांकडे पाहिलं आणि लगेच शेवटचा श्वास घेतला. गोंधळलेले नारद परत आले आणि त्यांनी ही गोष्ट महाविष्णूंना सांगितली. महाविष्णू म्हणाले, “चिंता करू नकोस नारदा. आता त्याच शहरात, झाडावर एक पक्षी विसावला आहे. कृपया जाऊन त्यास भेट. ”

नारद त्याच्याजवळ येत आहे हे पहाताच त्या पक्षाने आपले प्राण सोडले. हे लक्षात न घेता विष्णूने नारदला त्याच शहरात एका गायीला भेटायला सांगितले. गायीजवळ आल्यावर नारदांना भीती वाटू लागली. त्यांना ज्याची भीती वाटत होती तेच घडले ,नारदांना पहाताच गायीने प्राण सोडले. गोहत्येसाठी मी जबाबदार आहे असा विचार करत नारद वैकुंठात परतले. महाविष्णू यामुळे अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी नारदांना महिष्मतीपुरम येथे नवजात राजकुमारला भेटायला सांगितले. यावेळी नारदांनी अशा भेटी देण्यास नकार दिला. महाविष्णूंनी नारदांना समजावून सांगितले आणि त्यांना महिष्मतीपुरम येथे पाठविले.

नारद मुनी त्याच्या जवळ येत पाहून लहान बाळ हसायला लागले. हे पाहून नारदांना आश्चर्य वाटले. बाळ त्यांना पाहिल्यानंतरही जिवंत आहे, ह्याबद्दल त्यांना खूप संतोष झाला. आनंदाने ते वैकुंठात परत आले आणि महाविष्णूस म्हणाले, “हे देवा, मी तुम्हाला सत्पुरुष सहवास आणि त्याच्या प्रभावाविषयी प्रश्न विचारला होता. यास उत्तर म्हणून, तुम्ही मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून प्रत्येक ठिकाणी काहीजणांना भेटायला सांगितले . या सर्व प्रवासानंतरही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.”

महाविष्णू हसून म्हणाले, “हे नारदा, तुला अजूनही समजले नाही का? तु तुझ्यासारखे लोक जे सदासर्वकाळ परमेश्वराचा नामजप करतात आणि ज्यांचे मन सदैव निर्मल, निश्चल असते तेच खरे सतपुरुष असतात. तुझ्यासारख्या सत्पुरुषाच्या सहवासात आल्यामुळे, डुक्कराचा विकास होऊन आणि त्याने पक्षी, गाय आणि त्यानंतर राजपुत्र म्हणून जन्म घेतले. त्यास मानवी जन्म मिळू शकला. सत्पुरुषांच्या सहवासाविषयी तुमच्या मनातील प्रश्नासाठी यापेक्षा अधिक चांगला पुरावा कोणता असू शकेल?”

अशा सत्संगाचा लाभ म्हणजे निसंगत्व प्राप्त होणे. निसंगत्व म्हणजे “कशाचीही, कोणाचीही संगती न ठेवणे”. निसंगत्व त्या व्यक्तीला एकांतवास, मौन, इंद्रियांवर नियंत्रण(इंद्रिय निग्रह) मिळवून देते. आणि मानसिक शांती प्रदान करते. या क्षमतेमुळे निर्मोहत्त्वाची स्थिती म्हणजेच मोहाची अनुपस्थिती” त्याच्यात निर्माण होते.

या जगामध्ये सत्य आणि असत्य ह्यातील भेद जाणून घेण्याची बुद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर , भ्रम पूर्णपणे काढून टाकला जातो आणि त्या व्यक्तीस सत्य योग्य प्रकारे समजते. अशा अवस्थेला ‘वासना क्षयम’ म्हणून ओळखले जाते. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, जी व्यक्ती ‘निर्मोहत्त्वम’या अवस्थेत पोहचली आहे, त्या व्यक्तीस ‘निश्चल तत्वम्’ ह्यातील तत्वाचा बोध होतो. हे ज्ञान प्राप्त झालेला नित्य आनंदात राहून जीवनमुक्त होतो.

शंकरा भगवद-पादाचार्य यांनी असे गहन तत्व सोप्या श्लोकात आणि सहज समजेल अशा पद्धतीने स्पष्ट केले आहे.

Tags: