का ते कांता कस्ते पुत्र:: संसारोयमतीव विचित्र।
कस्य त्वम् वा कुत आयात: तत्वम् चिंतय तदीह भ्रात:।।८।।
अर्थ - हे माणसा, तुझी पत्नी कोण आहे? तुझा मुलगा कोण आहे? जन्म आणि मृत्यूंनी भरलेला हा संसार खूप विचित्र आहे. आपण खरोखर कोणाशी संबंधित आहोत? आपण कुठून आलो आहोत? स्थूल शरीरात जगत असताना या परम सत्यावर चिंतन करा.
या श्लोकाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी श्रीमद्भागवतामधील राजा चित्रकेतुची कथा समजून घ्यायला हवी. राजा चित्रकेतुला बऱ्याच बायका होत्या पण बर्याच दिवसांपासून त्यास मूल नव्हते. यामुळे तो निराश झाला होता. महर्षि अंगिरस एकदा अनपेक्षितपणे त्याच्या राज्यात आले. राजाची व्यथा समजून, महान महर्षींनी एक यज्ञ केला आणि त्याचा प्रसाद त्याच्या पहिल्या राणीस, कृतद्यूतीस दिला. काही कालानंतर कृतद्युतीला पुत्ररत्न प्राप्त झाले.
बऱ्याच दिवसांनंतर पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे राजाला फारच आनंद झाला. तो आपला सर्व वेळ आपल्या नवजात बालकासह आणि कृतद्युतीबरोबर घालवू लागला, त्यामुळे इतर सर्व राण्यांकडे आणि राज्य व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. हे दुर्लक्ष सहन करण्यास असमर्थ इतर राण्यांना असूया वाटू लागली आणि म्हणूनच त्यांनी त्या लहान मुलाला विष पाजले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
आपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच, राजा चित्रकेतू मृतदेहाजवळ बसला आणि अतिशय शोक करू लागला. अगदी त्याच क्षणी, महर्षि अंगिरस तेथे आले आणि त्यांनी असे सांगून राजाचे सांत्वन केले, “हे राजा, तू आपल्या मरण पावलेल्या मुलाबद्दल शोक करत आहेस. ह्या मुलाशी तुझा गतजन्मात काय संबंध होता? ह्या जन्मात काय होता आणि पुढच्या जन्मात काय असेल? कृपया ह्यावर खोलवर विचार कर. गतजन्मामध्ये जो तुमचा पिता होता तो या जन्मामध्येही आपला पिता असेल असा कोणताही नियम नाही. हे शक्य आहे की हा मुलगा दुसर्या जन्मात तुमचा पिता असू शकेल. तुम्हा दोघांमध्ये संबंध नसतीलही हे देखील शक्य आहे. हे अस्थायी, क्षणिक संबंध आहेत.
ज्याप्रमाणे फळांमधून उत्पन्न होणारी बियाणे वेगवेगळ्या दिशेने जाऊन त्याची वेगवेगळी झाडे बनतात त्याचप्रमाणे परमात्मापासून उत्पन्न झालेले आणि काळाच्या फेऱ्यात सापडलेले, वेळोवेळी भेटत राहतात व विभक्त होत रहातात.
म्हणून राजा, तू आपल्या मुलासाठी शोक करणे चुकीचे आहे. भ्रमांमुळे हे सर्व घडत आहे हे समजून घे. जरी तुझ्या जन्मकुंडलीनुसार तुझ्या नशिबात पुत्रयोग नव्हता परंतु तुला थोडा आनंद मिळावा म्हणून मी यज्ञ केला आणि तुला पुत्ररत्न प्राप्त होईल याची खात्री करून घेतली. कृपया लक्षात ठेव की तुझा मुलगा हा एक मायापुत्र होता. या आठवणीने कृपया तुझे वैराग्य वाढव. अलिप्ततेने आणि हुशारीने राज्य करत रहा. निःस्वार्थ कृती(निष्काम कर्म) करण्यास प्रारंभ कर. आपल्या कार्याची सर्व फळे सर्वशक्तिमान देवाला अर्पण कर. ” या उपदेशामुळे राजा चित्रकेतू ज्ञानी झाला आणि सर्व दुःखातून मुक्त झाला यावरून आपल्याला समजते की दोन जीवांमधील संबंध पूर्णपणे मायाकल्पित असतात. शरीर धारण करणाऱ्या जीवांचा जीवनकाल निश्चित असतो. काही वेळा मुले वडीलधाऱ्यांपेक्षा आधी जातात. आपल्याला ह्या आधारे हे समजते. अशा वेळी वडिलांनी अनुभवलेल्या त्रासाचे वर्णन करता येत नाही. अशा परिस्थितीत, जर ती व्यक्ती खंबीरपणे उभी राहून मायाकल्पित संबंधांबद्दल स्मरण केले तर ते फायदेशीर ठरेल. एक अशी कथा आहे जी ऋणांबद्दल आणि त्यानुसार आत्मा कसा जन्माला येतो याबद्दल स्पष्टीकरण देते. जर हे समजले तर कोणालाही आपल्याला मूल नसल्याबद्दल दु: ख होणार नाही.