SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25 Dec 2020
भज गोविंदम् 0७: मृत्यूनंतरचा प्रवास आपण एकटेच करतो. (श्लोक ६)

यावत्-पवनो निवसती देहे तावत्-प्रच्छति कुशलम् गेहे |
गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मीन काये | ६ |

अर्थ - जोपर्यंत शरीरात प्राणशक्ती (प्राण) अस्तित्त्वात आहे तोपर्यंत प्रत्येकजण क्षेम कुशल विचारतो. परंतु जेव्हा ही जीवनशक्ती शरीर सोडते आणि ती व्यक्ती मृत्यू पावते, तेव्हा त्याच्या मृतदेहाकडे पाहून त्याच्या बायकोमुलांचासुद्धा थरकाप होतो.

मागच्या श्लोकात आपल्याला शिकविले की ऐहिक संपत्ती आपल्याला मागे सोडावी लागते, या जगातील प्रेम असत्य आहे आणि ते प्रेम स्वार्थापोटी असते हे पण शिकविले. ह्या श्लोकात आणखी थोडी माहिती दिली आहे.

जेव्हा ह्या शरीरात प्राण (प्राण वायु) स्वरुपात अस्तित्वात असलेला शिव जेव्हा शरीराबाहेर पडतो, तेव्हा जे उरते तो मृतदेह असतो.

या जगातील ८०% लोक त्यांच्या शारीरिक सौंदर्यावर आणि त्यांच्या सडपातळ आणि सडसडीत शरीरावर गर्व करतात. अशा व्यक्ती पूर्ण जीवनभर अशा भ्रमात अडकलेलया असतात कि आपल्या आकर्षक दिसण्यामुळे आपली जोडीदार मुले आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत. या भ्रमाने वेढलेली व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या भविष्याबद्दल चिंता करत राहते. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाचे काय होईल?’ हा प्रश्न त्याच्या मनाला नेहमी सतावत असतो.

‘या जगात अस्तित्त्वात असलेल्यापैकी कोणतीही वस्तू मृत्यूनंतरच्या पुढच्या प्रवासात आपल्याबरोबर येणार नाही हे परम सत्य जर मनात खोलवर रुजले तर आपोआपच त्या व्यक्तीच्या विचारसरणीत बदल होईल. ज्याला ह्या सत्याची जाणीव आहे तो असत्याबाबत कधीही दु:ख करणार नाही.

मृत्यू नंतरच्या प्रवासात, गवताचे एक पातेसुद्धा आपल्याबरोबर येऊ शकत नाही! या जीवनकालात आपण जे पैसे आणि संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न केला, मिळविल्या त्या सर्व गोष्टी इथेच राहातात. आपल्या गायी आणि इतर पाळीव प्राणी त्यांच्या छपराखाली कायम राहतील. पत्नी आणि मुले फक्त घराच्या मुख्य दरवाजापर्यंत पर्यंत मृतदेहासोबत येतील. धर्माच्या कायदयानुसार महिलांना स्मशानभूमीत जाण्यास बंदी घालतात, नाही का? स्मशानभूमीपर्यंत आपले मित्र आणि नातेवाईक आपल्या सोबत असतात. त्यानंतर काय होते? जीवनभर ज्या शरीरामुळे आपण ओळखले जात होतो ते अग्नित जळून जाते.

पुष्कळजणांना मृत्यूची भीती वाटते कारण त्यांनी आयुष्यभर अत्यंत प्रेमाने सांभाळलेले शरीर सोडून जावे लागते. पण ते अपरिहार्य आहे. ज्या बायकोवर तुझे खूप प्रेम होतं, ती मुले, ज्यांची तू प्रेमळपणे देखभाल केलीस आणि जे तुझे नातलग सर्वात चांगले सहचर होते, त्या सगळ्यांना सोडून जावे लागते.

मृत्यूनंतरच्या या पुढच्या प्रवासात आपल्याबरोबर काय असते? केवळ केलेले धर्म पालन आपल्यासोबत असते. (धार्मिकतेचे नियम आणि कर्तव्ये) जीवनात केलेली सत्कर्म,दुष्कर्म तसेच मनात बाळगलेले चांगले वाईट विचार या प्रवासात आपल्या सोबत असतात.

या कारणास्तव, ‘भज गोविंदम या वाक्यांपासून श्लोक सुरु होतो. याचा अर्थ असा की,‘‘मानवा, या महान सत्याची जाणीव असू दे. हे समजून घेऊन, आत्तापासून धार्मिक कार्यात (सत्कर्मात) व्यस्त रहा आणि परमेश्वराचा नामजप कर ’.

आपल्या पुढील जीवन प्रवासात आपला साथीदार आपल्या बरोबर नसणार ह्याचे दु:ख करत बसून आपले जीवन व्यर्थ घालवू नका. हे ‘सृष्टीचे स्वरूप’ आहे हे स्वीकारून सत्कर्मांवर लक्ष केंद्रित करा.

Tags: