यावद् -वित्तोपार्जन सक्त: तावं निजपरिवारो रक्त: |
पश्चा ज्जिवती जर्जर देहे वार्ताम् कोपी ना प्रच्छति गेहे || ५ ||
अर्थ - एखादी व्यक्ती जोपर्यंत पैसे कमवत असते किंवा पैसे कामविण्याकडे त्याची आसक्ती असते तोपर्यंत कुटुंबीय त्याचा आदर करतात. जेव्हा तो म्हातारा होतो आणि दुर्बल होतो, तेव्हा कुटुंबातील कुणीही त्याच्या आरोग्याबद्दल चौकशी करण्याची तसदी घेत नाहीत. त्याला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी ते उत्सुक असतात.
महान राजा युधिष्ठिर याचा इंद्रीय निग्रह प्रचंड होता. ते म्हणाले होते- ‘सर्वम् स्वार्थं समीहते’-‘ हे संपूर्ण जग स्वार्थाने भरलेले आहे ’.
महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनाची कथा आजच्या श्लोकासाठी योग्य उदाहरण आहे. वाल्मिकीचे मूळ नाव रत्नाकर होते. शापामुळे, त्यांना गत जीवनाचे स्मरण नव्हते. आणि संस्कारहीनपणे जंगलात फिरत असलेला तो एक कुविख्यात डाकू होता. दरोडेखोरी करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचा.
जेव्हा त्याच्या शापातून मुक्त होण्याची वेळ जवळ आली, तेव्हा महान सप्तर्षींनी त्याच्याकडे येऊन विचारले, “रत्नाकर, तू खून करतोस, निरपराध्यांचा छळ करतोस, त्यांना लुटतो आहेस आणि या सर्व कमाईने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतोस. ह्या सर्व क्रियेत तुझ्या पापात तू भर घालत आहेस. तुझी बायको व मुले तुझ्याकडून मिळणारी कमाई, सुखसोई आणि अन्नामध्ये फक्त सहभागी होतील की ते सर्वजण तुझ्या पापात भागीदार होतील?
एक सेकंदही न डगमगता रत्नाकराने उत्तर दिले, “अर्थातच ते माझ्या पापांतीलसुद्धा वाटा घेतील”. ऋषी हसले आणि म्हणाले, “हे रत्नाकर! जगाच्या रीतींबाबत तू अज्ञानी आहेस असे दिसते. या जगात, कोणीही दुसर्याच्या पापात किंवा कष्टात सामील होत नाही ”.
रत्नाकरची याविषयी खात्री पटली नाही . त्याच्यात आणि ऋषींमध्ये वाद झाला. शेवटी, ऋषींना संतुष्ट करण्यासाठी रत्नाकर स्वत:च्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला व मुलांना बोलावून त्यांना प्रेमाने विचारले, “तुम्ही सर्व माझ्या पापात भागीदार व्हाल का?” त्यांनी एकत्रितपणे उत्तर दिले, “तुमच्या पापांची किंमत तुम्हालाच द्यावी लागेल. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही ”.
त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या या एकमताने झालेल्या प्रतिक्रियेचा त्याच्यावर प्रचंड परिणाम झाला आणि त्याचे जीवन कायमचे बदलले . तो अंतर्मुख झाला. महर्षि नारदांनी त्यांस ‘राम’ मंत्राची दीक्षा दिली. तथापि, दीक्षा ‘मरा’अशी उलट स्वरूपात केली गेली. रत्नाकरांनी कोट्यवधी वेळा हा ‘मरा मंत्र पठण केला. जेव्हा तो ध्यानस्थ बसला होता तेव्हा मुंग्यांच्या वारुळांनी तो आच्छादाला गेला होता . तो त्याच्यातून बाहेर पडला आणि त्यास, ‘वाल्मिकी’ हे नाव मिळाले आणि त्यानंतर त्यांनी ‘रामायणाची” रचना केली.
आपल्या पुराणात अशा असंख्य कथा आहेत. ही संपत्ती आणि भरभराट शाश्वत नाही. तशाच प्रकारे ‘मी आणि ‘माझे’ या भावनाही कायम नसतात. माणसाने हे प्रत्येक क्षणी, लक्षात ठेवले पाहिजे. त्याने नेहमी देवाचे चिंतन करत राहावे. अनेक नामवंत संत आणि कवींनी ह्या धड्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केला आहे. ‘सुमती शतकम्’ मध्ये उदाहरणासहित कवीने सांगितले आहे
एप्पुडु संपद कलिगीन अप्पुडु बंधुवुलु वत्तु रदि येतलन्नन तेप्पलुगा चेरुवु निमदिन कप्पलु पढीवेलु चेरु गदर सुमती!
अर्थ - पाण्याने भरलेला तलाव ज्याप्रमाणे हजारो बेडकांना आकर्षित करतो त्याप्रमाणे संपत्तीने भरलेले घर, नातेवाईक आणि मित्रांना मोठ्या संख्येने आकर्षित करते.
तिथे उपलब्ध असलेल्या मुबलक पाण्यासाठी बेडूक तलावाकडे आकर्षित होतात. जर तलाव कोरडा पडला तर नवीन बेडूक तिथे जाणार नाहीत हे सांगण्याची गरज नाही पण लक्षात घेण्यासारखे काय आहे ते म्हणजे तिथे असलेले बेडूकसुद्धा नवीन घर शोधतील. त्याचप्रमाणे, जोपर्यंत ती व्यक्ती श्रीमंत आहे आणि त्याचे नाव आणि प्रसिद्धी आहे तोपर्यंत ज्याप्रमाणे साखरेभोवती मुंग्या गोळा होतात त्याप्रमाणे लोक त्याच्याभोवती गोळा होतील. तो त्यांच्यासाठी देवासारखा महान आहे याची जाणीव त्यास करुन देतील.
तथापि जेव्हा जर त्या व्यक्तीने आपली संपत्ती गमावली किंवा त्याच्या अधोगतीची वेळ सुरू होते किंवा त्याने पैसे कमविणे थांबविले तर, हे नातेवाईक आणि मित्र त्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडतील. त्यांना त्याच्याबरोबरच्या सहवासाची आठवणही होणार नाही. मुंग्यांना साखर खाण्याचा आनंद मिळाला होता ते ठिकाण आणि वेळ आठवते का? ज्या तलावाने बेडकांना आश्रय दिला होता त्या कोरड्या तलावाची आठवण बेडकांना होते का?
अशाच प्रकारे, वृद्ध व्यक्तींच्या गरजा आणि भावनांबद्दल कोणीच कधीही विचार करत नाही. जेव्हा ते घरातील कमाईमध्ये हातभार लावण्यास सक्षम नसतात तेव्हा तरुण पिढी त्यांना वृद्धाश्रमात पोचवण्याची खूप घाई करते. ही वस्तुस्थिती आहे.