नलिनी दलगत जलमती तरलं तद्वजीवित मतिशय चपलम |
विधी व्याधिभिमान ग्रस्तं लोकम् शोक हतं च समस्तम् || ४ ||
अर्थ - कमळाच्या पानावर पाण्याचे थेंब जेवढे अस्थिर आणि चंचल असतात तेवढे हे जीवन अस्थिर आहे. या संपूर्ण जगातील प्रत्येकजण रोग (व्याधी), दु: ख आणि अभिमानाने ग्रस्त आहे.
ह्या श्लोकात वेळेचे(काळाचे )मूल्य, या जगाचे स्वरूप आणि त्यातील जिवींबद्दल सांगितले आहे . कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब नाजूकपणे आपले संतुलन साधत असतो याची तुलना माणसाच्या जीवनाशी केली आहे. या पाण्याच्या थेंबाप्रमाणेच जीवन चंचल आणि डळमळीत आहे आणि म्हणूनच हे स्तोत्र माणसाला कायम स्वरूपी असलेला अहंकार सोडण्याची सूचना देते. भगवद् गीतेत नमूद केले आहे - ‘अंतवंत इमे देह:’ म्हणजे ‘ही सर्व शरीरं नाशवंत आहेत.’
प्रत्येकाने हे सत्य समजले पाहिजे की जीवन अशाश्वत आहे. हे समजून प्रत्येकाने धर्माप्रती आपली निष्ठा वाढविली पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे!
जर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य १00 वर्षांचे असते असे आपण गृहित धरले तर त्यातील ५0% म्हणजेच ५0 वर्षे तो झोपेत घालवतो. बालपण आणि साडे बारा वर्षे बाल्यावस्थेत जातात . त्या काळात तो अज्ञानी असतो. आणखी साडेबारा वर्षे म्हातारपण आणि दौर्बल्य ह्यात निघून जातात. शेवटी व्यक्तीसाठी उपलब्ध असलेला कालावधी केवळ २५ वर्षे असतो. हा काळ व्याधी, वियोग, दु: ख आणि कष्टात निघून जाते. मग आयुष्यात सौख्य कोठे आहे?
मृत्युदेव आपल्यालय केसाला धरुन खेचून घेऊन जात आहे असे मानून आपण प्रत्येक क्षणी जागृततेने धर्माचे आचरण केले पाहिजे आपण सत्कार्य भरभर करावीत. या बाबतीत विलंब करणे उचित नाही. नेहमी लक्षात ठेवा की आपल्या अडचणी व गरजांच्या वेळी, परमात्मा विलंब करत नाही, उलट ते आपल्या मदतीसाठी धावतात.
भगवान कृष्णाला एकदा कर्णाच्या दानशूर वृत्तीबद्दल अर्जुनाला शिकवायचे होते. ब्राह्मणाच्या रूपात कृष्णाने कर्णाजवळ येऊन भिक्षा मागितली. त्या वेळी कर्णाच्या डाव्या हातात सोन्याचे भांडे होते आणि उजव्या हाताने तो डोक्याला तेल लावत होता. दुसरा कोणताही विचार न करता कर्णाने आपल्या डाव्या हाताने तेलासहित ते सोन्याचे भांडे त्या ब्राम्हणाला दिले. डाव्या हाताने दान देणे चुकीचे आहे असे सांगून ब्राह्मणाने ही भेट स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय डाव्या हाताने दिलेले तेल घेणे हे पूर्णपणे अस्वीकार्य होते.
कर्णाला समजले की समोर उभे असलेला ब्राम्हण दुसरा कोणी नसून श्रीकृष्ण आहेत. ताबडतोब तो श्री कृष्णाच्या पाया पडला आणि त्याने विनवणी केली, “हे कृष्ण! मी माझ्या डाव्या हाताने वस्तू गर्विष्ठपणामुळे दिली नाही. . जेव्हा आपण भिक्षा मागितली तेव्हा मी माझ्या डाव्या हातात सोन्याचे पात्र धरले होते. जर योग्य पद्धतीने दान द्यायचे असते तर मला तेल काढणे आवश्यक होते , भांडे स्वच्छ धुवावे लागले असते. त्यादरम्यान माझे मन बदलले असते तर? म्हणून, विचार न करता मी माझ्या डाव्या हाताने ते दिले. कृपया मला माफ करा”. कर्णाने दाखवलेल्या या मनोवृत्तीने कृष्णाला आनंद झाला.
चरण्याचा सगळा वेळ रवंथ करण्यात घालवून मग नंतर इतर गायींनी सर्व गवत खाल्ले असा पश्चात्ताप करण्याचा काय फायदा ? धर्माचरण न करता आयुष्य वाया घालवल्यानंतर शेवटच्या क्षणी पश्चात्ताप करण्याचा काय उपयोग? काळ कुणाचीही वाट पाहत नाही. चिरंतन पुढे जात राहणे हा त्याचा धर्म आहे. कदाचित आपण या विश्वातल्या इतर गोष्टीवर विजय मिळवू शकतो परंतु लक्षात ठेवा की आपण मृत्यूवर कधीही विजय प्राप्त करू शकत नाही. म्हणून संसाराचा हा महासागर पार करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भगवान नाम संकीर्तनात स्वतः:ला गुंतवावे.