SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25 Dec 2020
भज गोविन्दं ३: आपण कमावलेल्या संपत्तीवर समाधानी राहा (श्लोक २)

मूढ जहीहि धनागमतृष्णाम्
कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम् |
यल्लभसे निजकर्मोपात्तम्
वित्तं तेन विनोदय चित्तम् ||

अर्थ - हे मूर्ख माणसा, सत्य आणि असत्य या वस्तूंमधील फरक दाखविणाऱ्या सद्‌सद्‌विवेकबुद्धीचा अभाव असलेल्या अज्ञानी माणसा, पैसे आणि भौतिक संपत्ती मिळविण्याची इच्छा सोडून दे. सर्व प्रकारच्या विकारांपासून पूर्णपणे मुक्त असलेली सद्बुद्धी तू विकसित कर. आपल्या मागील जन्मांमधल्या कर्मांवर आधारित जितकी संपत्ती मिळेल त्यात समाधानी राहा. पहिल्या श्लोकामध्ये आध्यात्मिक अज्ञानाबद्दल म्हणजेच अविद्येबद्दल शिकवले होते, तसेच या अज्ञानातून बाहेर येण्यासाठी परमेश्वराचा नामजप, कीर्तन हा एकमेव उपाय सुचविला होता. आता दुसरा श्लोक आपल्याला अत्याधिक इच्छांच्या (काम) मागे न लागता मनावर नियंत्रण ठेवण्याच्या आवश्यकतेबद्दल ठळकपणे शिकवण देतो. ‘काम’ हा शब्द केवळ वासनांच्या इच्छेपुरताच मर्यादित नाही. ‘काम’ या संकल्पनेमध्ये प्रत्येक प्रकारची इच्छा समाविष्ट आहे. उदाहरणार्थ - संपत्ती, पद, प्रतिष्ठा मिळविण्याची इच्छा आणि कोणत्याही प्रकारची मालमत्ता मिळविण्याची आकांक्षा हे सर्व कामांचे प्रकार आहेत. यालाच ‘तृष्णा’ असेही म्हणतात. तृष्णा म्हणजे तहान. फक्त पाणीच शरीराची तहान तृप्त करते. जर एखादी व्यक्ती खूप जास्त तहानलेली असेल आणि पाणी उपलब्ध नसेल तर त्याचे आयुष्य धोक्यात येते. त्याचप्रमाणे जेव्हा इच्छांची तहान सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडते तेव्हा त्या व्यक्तीची कोणत्याही थराला जाऊन इच्छा पूर्ण करण्याची तयारी असते. अशाने त्या व्यक्तीची कल्पनातीत अधोगती होते! याच कारणास्तव, स्वामी उपदेश करतात की आपण आपल्या इच्छांना (काम) मनाच्या जवळपासही फिरकू देऊ नये. भगवद्गीतेत ‘कामाच्या’ धोक्यांचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे - ‘सांगत्‌ संजायते कामः कामात क्रोधो भिजायते।’ अर्थ- संगती माणसाला इच्छेकडे घेऊन जाते; इच्छा क्रोधाचा, रागाचा मार्ग मोकळा करते. रागामुळे माणूस स्वतःला विसरतो. या भ्रमामुळे बुद्धी दुर्बल होते. ज्याची बुद्धी कमकुवत झाली आहे किंवा अत्यंत कमजोर अवस्थेत आहे त्याचा संपूर्णपणे विनाश होतो. या सर्वांचे मूळ ‘इच्छा’ हेच आहे. आणि म्हणूनच आपल्या मनाने वासनांकडे इच्छांकडे दुर्लक्ष करणे फार महत्वाचे आहे. काही लोकांचा असा गैरसमज असतो की मनातून इच्छा पूर्णपणे काढून टाकायच्या असतील तर त्या इच्छांची पूर्तता करणे हाच एकमेव आणि सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु भगवद्गीता मात्र ह्याच्याशी असहमत आहे. ह्यामध्ये इच्छेची तुलना अग्नीशी केली जाते. ‘होमाच्या पवित्र अग्नीमध्ये तूप अर्पण केल्यास ज्वालांची ताकद आणखी वाढते. त्याचप्रमाणे एखाद्या इच्छेची पूर्तता केल्याने केवळ हाव आणि लालसाच वाढते. ज्या व्यक्तीला खरोखरच अग्नी शांत करायची इच्छा असते त्याने त्या होमामध्ये पाण्यावर पाणी घालावे. होमामध्ये तूप घालत राहून ज्वाला कमी होण्याची वाट बघत बसण्याप्रमाणेच इच्छांची पूर्तता करत राहण्याचा काय उपयोग? ‘मोह मुद्गर’ ग्रंथातील हा उपदेश केवळ संतांसाठी किंवा परमेश्र्वरप्राप्तीच्या मार्गावर चालणाऱ्या अत्यंत जाणकार व्यक्तींसाठीच आहे असे नाही. तर हा पवित्र मजकूर सामाजिक स्थिती, स्तर आणि लिंगभेद विचारात न घेता सर्व जाती आणि जमातीतील लोकांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. याच कारणास्तव, शंकर भगवद् पादाचार्य स्वामी हे कधीही सांगत नाहीत की ‘संपत्ती मिळवणे वाईट आहे.’

त्याऐवजी ते असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीकडे काही गुण आणि अवगुण तसेच पाप - पुण्ये असतात जे त्याने पूर्व जन्मातून पुढे आणले आहेत. अशाच प्रकारे या जन्मामध्ये संपत्ती, पैसाअडका कमाविण्याची क्षमता हीदेखील पूर्व जन्मातून पुढे आणल्या गेलेल्या गुणवैशिष्ट्यांवर आणि कार्यपद्धतींवर पूर्णपणे अवलंबून असते. म्हणूनच ते असा उपदेश करतात की प्रत्येक व्यक्तीने या जगात आपल्या प्रयत्नांनी जे काही कमावले आहे त्यावर समाधानी असले पाहिजे. जास्त इच्छा मनात धरणे योग्य नाही.

सध्याच्या पिढीतील लोकांना पैसे कमाविणे चुकीचे आहे असा उपदेश केलाच जाऊ शकत नाही. असे उपदेश सध्याच्या काळासाठी योग्य नाहीत. त्याऐवजी त्या व्यक्तीने स्वत:च्या परिश्रमांनी जे काही प्रामाणिकपणे कमावले आहे त्यातच समाधानी राहण्यास सांगितले आहे. एवढेच समजून घेणे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे इच्छा पूर्ण केल्याने ती संपुष्टात येईल या गैरसमजातून आपण मुक्त झाले पाहिजे. वर वर्णन केल्याप्रमाणे, इच्छा पूर्ण केल्यानंतरच ती कित्येक पटीने वाढते. आग नियंत्रित करण्यासाठी पाणी किंवा इतर गोष्टी ज्यामुळे ज्वाळा आटोक्यात होतील अशाच गोष्टी वापराव्या लागतात. त्याचप्रमाणे वासनांना आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा अभ्यास केला पाहिजे. तरच वासना नाहीशा होतील.

Tags: