SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25-12-2020
भागवत 000३: महर्षी नारदांनी भागवताचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला!

नारद महर्षींनी विचार केला, “हि वाणी खूप रहस्यमय आहे. यात स्पष्टपणा नाही. कोणती पद्धत अवलंबिल्यामुळे भक्तीचा जगभर प्रसार होऊ शकतो? कोणत्या माध्यमातून भक्ती जगभर प्रवास करू शकेल? या संदर्भात मी पुढे कसे कार्य करावे?” त्यांच्या या शंकांचे निरसन न झाल्याने, नारद महर्षींनी देवी भक्तीला आणि तिच्या मुलांना तिथेच बसण्यास सांगितले आणि ते तीर्थयात्रेस निघाले.

नारद महर्षींनी भेट दिली नाही असे एकही तीर्थस्थान नव्हते. न विसरता त्यांनी सर्व महान संतांची भेट घेतली. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी लोकांना भेटी दिल्या, त्या त्या ठिकाणी भक्ती आणि तिच्या दोन्ही मुलांविषयी सांगितलेल्या गोष्टी सर्व लोक मन लावून ऐकत होते. परंतु कोणालाही त्या समस्येवर तोडगा सापडत नव्हता. कोणालाच त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. काहींनी त्यांना ठामपणे सांगून टाकले की संपूर्ण विश्वामध्ये भक्ती पसरवणे केवळ अशक्य आहे. याचवेळी काहींनी या कार्यासाठी त्यांचे कौतुकदेखील केले. काहींनी त्यांची थट्टा केली, काही जण आश्चर्यचकित झाले तर काही फक्त मौन राहिले. ते स्वाभाविकच होते. वेद आणि वेदान्ताच्या माध्यमातूनदेखील ज्या गोष्टीची उकल होत नव्हती, जी बाब महर्षी नारदांसारख्या महात्म्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडे होती, त्याबाबत सर्वसामान्य जनांना तसेच इतर साधुजनांना आकलन होणे किती अवघड होते, याचा तुम्ही विचार करू शकता.

संपूर्ण जगामध्ये भक्तीचा प्रसार करण्याचे माध्यम शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये असमर्थ ठरलेले महर्षी नारद स्वत:ची हतबलता पाहून पूर्णपणे निराश झाले आणि अखेरीस ते बद्रिवनामध्ये जाऊन पोहोचले. उद्‌भवलेल्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे घोर तपश्र्चर्या करीत असताना, एक दिवस त्यांना सनकादि महर्षींनी दृष्टांत दिला. त्यांच्या दर्शनाने नारदांना अत्यानंद झाला. भक्तीदेवी आणि तिची मुले, ज्ञान आणि वैराग्य (आध्यात्मिक ज्ञान - वैराग्य) यांचे दुःख कमी करू शकेल असा मार्ग दाखविण्याची विनंती नारदांनी या ऋषींना केली. तेव्हा महर्षी म्हणाले, “नारदा, दु:खी होऊ नकोस. आम्ही या समस्येवरील उपायाचा आधीच विचार केला आहे. तुझ्या भक्तगणांतील अनुभवी, महान भक्तच केवळ जगभर भक्तीचा प्रचार करण्याचे कार्य करू शकतात. ऋषींनी अनेक साधन मार्ग दाखविले आहेत ज्याद्वारे साधना केली जाऊ शकते, परंतु त्या सर्वांचे आचरण करणे कठीण आणि अवघड आहे. भगवान श्रीहरींचे दर्शन प्राप्त करून देणारी भक्ती साधना अद्याप गुप्त राहिली आहे. आपल्यासारख्या मोजक्या लोकांनाच तिच्या महत्तेबद्दल समजू शकते आणि म्हणूनच, देववाणीने संपूर्ण जगामध्ये भक्तीचा प्रसार करण्याचे हे अवघड काम तुझ्यावर सोपवले. यज्ञ अनेक प्रकारचे असतात, उदा. द्रव्य-यज्ञ, तपो-यज्ञ, योग-यज्ञ, स्वाध्याय (स्वत: चा अभ्यास), ज्ञान-यज्ञ इत्यादी.

सत्कर्मसूचको नूनम् ज्ञानयज्ञः स्मृतो बुधै: | श्रीमद्भागवतालापः स तु गीतः शुकादिभि: ||

या सर्व यज्ञांपैकी ज्ञान-यज्ञ सर्वोच्च यज्ञ आहे. हा ज्ञान यज्ञ म्हणजेच महर्षी शुक आणि इतर मान्यवर ऋषींनी सादर केलेले श्रीमद्‌ भागवताचे गायन. तुम्ही या जगात श्रीमद्‌ भागवताचा प्रचार करावा.

प्रलयं हि गमिष्यन्ति श्रमद्भागवतध्वने: | कलेर्दोषा इमे सर्वे सिंहशब्दाद् वृका इव ||

ज्याप्रमाणे सिंहाची डरकाळी ऐकून घाबरून लांडगा पळून जातो, त्याचप्रमाणे भक्तांनी भागवताचे गायन केले तर कलियुगातील सर्व अडचणी व दु:खे दूर होतील. ”

हे ऐकून महर्षी नारदांनी पुढे विचारले, “हे महान ऋषी मुनींनो! मी ज्ञान आणि वैराग्य यांना वेद आणि वेदांगांची दीक्षा दिल्यानंतरदेखील त्यांचे कष्ट कमी होऊ शकले नाही. माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. मग भागवताच्या गायनाने त्यांचे भोग कसे कमी होतील? कृपया आपण मला हे समजावून सांगावे.”

सनक आणि इतर ऋषीमुनींनी उत्तर दिले, “हे नारदा, भागवत हे सर्व वेद आणि उपनिषदांचे सार आहे. यात सर्वोच्च सार आहे. ज्याप्रमाणे दुधामध्ये दही असतेच परंतु तरीही दह्याचे काही थेंब दुधात घातल्याशिवाय त्या दह्याला दृश्यस्वरूप येत नाही, त्याचप्रमाणे भागवत उदयास आले आहे. उसामध्ये ज्याप्रमाणे साखर मूळतः अस्तित्वात असते परंतु प्रक्रिया करून उसापासून साखरेचे कण विभक्त केल्यावरच साखर मिळते, त्याप्रमाणे भागवताचे वाचन करण्याने सर्व वेदांचे सार मिळते.

इदं भागवतं नाम पुराणं ब्रहमसंमितम् | भक्तिज्ञानविरागाणाम् स्थापनाय प्रकाशितम् ||

‘भागवत’ नावाचे पवित्र असे हे महापुराण वेद समतुल्य आहे. या जगात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य पुनर्स्थापित करण्यासाठी, परमात्म्याने स्वतःच भागवताच्या माध्यमातून हा मार्ग प्रकाशमान केला आहे.

पूर्वी ज्यावेळी महर्षी व्यास शोकमग्न होते, तेव्हा आपण स्वत: त्यांना चतुर्श्लोकी भागवताची दीक्षा दिली होती. (चार श्लोकांमध्ये रचलेले भागवत, ज्यामध्ये संपूर्ण सार समाविष्ट आहे.) जे सर्वप्रथम भगवान महानारायणांनी भगवान ब्रह्मदेवांना शिकविले आणि त्यानंतर आपण ते ब्रह्मदेवांकडून शिकून घेतलेत. यानंतर महर्षी व्यासांनी याचा विस्तार केला आणि 18000 श्लोकांचा समावेश असलेल्या या महापुराणाचे संकलन केले. हे ज्ञान व्यासमुनींनी महर्षी शुकांना शिकवले. महर्षी शुकांनी ते सम्राट परीक्षित यांना शिकवले. या दीक्षेमुळे अवघ्या सात दिवसांत परीक्षित राजाला मुक्ती मिळाली. अशा सर्वोपरी असलेल्या भागवता ग्रंथाच्या सहाय्याने आपण या जगात भक्तीचा प्रसार करावा. त्यायोगे आपण भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचे दु:ख दूर करण्यात यशस्वी व्हाल. श्रीमद् भागवत श्रावे सर्व शोक दुःख विनाशनम् - श्रीमद् भागवत ऐकून सर्व प्रकारचे दुःख तसेच शोक दूर होतो.”

थोर ऋषींचा हा संदेश ऐकल्यानंतर नारद महर्षी म्हणाले, “ओ महर्षी! माझ्या सर्व शंकांचे आता निरसन झाले आहे. माझ्या मनातील अडचणी आता दूर झाल्या आहेत. यापुढे आता मी या जगात भागवताचा प्रसार करेन. हे प्रत्येक घरात ऐकले जाईल याची मी खात्री करीन.” अशा प्रकारे दृढनिश्चय करून महर्षी नारदांनी चारही महर्षींना नमन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

Tags: