SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 2020-11-08
Episode-0001

|| श्री गणेशाय नम: ||

|| श्री सरस्वत्यै नम: ||

|| श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती ||

|| श्री गुरु दत्तात्रेयाय नम: ||

जेव्हा भगवंताची, परमात्म्याची कृपादृष्टी प्राप्त होते तेव्हाच भगवंतांनी दिलेले हे मानवी जीवनाचे सार्थक होते*!*** भक्ती सूत्र आणि इतर धर्मग्रंथ अधिकारवाणीने आपल्याला हे सांगतात की ही कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी ‘भक्ती’ यापेक्षा कोणतेही मोठे साधन नाही. भक्तीच्या या मार्गावर, श्रीमद्‌ भागवतम् या ग्रंथास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

१८ पुराणे, १८ उप-पुराणे, ब्रह्मसूत्र तसेच महाभारत या ग्रंथांची रचना करूनदेखील महर्षी वेदव्यासांना पूर्ण मन:शांती प्राप्त झाली नव्हती आणि त्यामुळे ते विचलित झाले होते, निराश झाले होते. अशा परिस्थितीमध्ये महर्षी नारद यांनी त्यांना ‘भागवतम्’ या ग्रंथरचनेची निर्मिती करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार महर्षी व्यासांनी ‘भागवतम्’ रचले आणि अप्राप्य अशी मानसिक शांती प्राप्त केली!

अशा या पवित्र भागवतम्मध्ये एकूण 12 स्कंद (अध्याय) आहेत! चला हा प्रत्येक अध्याय सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया!

‘भागवतम्’ म्हणजे ‘परमात्म्यासंबंधी शास्त्र.’या ग्रंथात सर्वोच्च स्थानी असलेल्या परमेश्वराशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पुराणाचे प्रत्येक वैशिष्ट्य यात पाहावयास मिळते आणि म्हणूनच या ग्रंथाला ‘महापुराण’ म्हटले जाते.

भक्तीच्या माध्यमातून अद्वैतवाद (अद्वैत शास्त्र) सिद्धांत प्रस्थापित करणे आणि त्या माध्यमातून मानवाला परमात्म्याचे दर्शन घडवणे हा महर्षी व्यासांचा मूळ हेतू होता हे यावरून दिसून येते.**

जर ‘भागवत’ ग्रंथाने स्वत:चीच स्तुती केली तर त्यात विशेष असे काहीच असू शकत नाही. याच कारणास्तव अत्यंत आदरणीय असलेल्या ‘पद्म पुराणा’मध्ये ‘भागवतम्’ ग्रंथाच्या महत्तेचे गुणगान केले आहे. यातून आपल्याला मानवी जीवनामध्ये भागवताचे असलेले विशेष महत्त्व आणि दर्जा लक्षात येऊ शकतो.

फार पूर्वी महर्षी नारदांना पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, श्रीक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, रामेश्वर या आणि अशा इतर अनेक पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या. परंतु यांपैकी कोठेही त्यांना मानसिक शांतता प्राप्त झाली नाही.

कली (युग) जो अधर्माचा मित्र होता त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापून ठेवली आहे हे महर्षी नारदांच्या लक्षात आले. मानसिक शांततेच्या शोधात सर्वत्र फिरत असता, शेवटी ते एका पवित्र अशा वृंदावनच्या भूमीवर पोहोचले, जेथे श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांनी सर्वांना मोहित केले होते.

तेथे यमुनेच्या किनाऱ्यावर, त्यांनी एका तरुण स्त्रीला शोकसागरात बुडालेले पाहिले. तिच्या दोन्ही बाजूंना दोन वृद्ध पुरुष बेशुद्धावस्थेमध्ये पडले होते. ही तरुण स्त्री शोक करत या दोन्ही वृद्ध पुरुषांची सेवा करीत होती. आश्चर्यचकित होऊन महर्षी नारद तिच्याकडे गेले. नारदाला पाहून ती स्त्री उभी राहिली आणि त्यांना नमस्कार करत म्हणाली,

‘‘हे ऋषीवर्य, कृपया माझा प्रणाम स्वीकारावा. कृपया थोडा वेळ थांबावे आणि माझ्या अडचणी ऐकाव्यात. जेव्हा आपल्याकडे पुरेसा पुण्यसंचय असतो तेव्हाच आपल्यासारख्या महान योग्यतेच्या संतांच्या दर्शनाचा लाभ मिळू शकतो.** ”

नारद महर्षींनी तिला विचारले, “हे तरुण स्त्री, तू कोण आहेस? तुझ्या शेजारी ही दोन वृद्ध माणसे कोण आहेत? कृपया मला तुझ्या त्रासाचे कारण तपशीलवार सांग.”

त्या स्त्रीने उत्तर दिले, “हे महर्षी! मी भक्ती आहे. ही ज्ञान आणि वैराग्य नावाची माझी दोन मुले आहेत. माझ्याभोवती असलेल्या स्त्रिया ह्या वृंदा आणि इतर नद्या आहेत. त्या माझी सेवा करण्यासाठी येथे आल्या आहेत. या सर्व सेवा सुविधा मिळूनही मला मानसिक शांतता नाही.

माझा जन्म द्रविड देशात (दक्षिण भारतात) झाला. मी कर्नाटकात मोठी झाले. महाराष्ट्र, आंध्र आणि इतर ठिकाणीही मी काही प्रमाणात समृद्ध झाले. माझे अस्तित्व सर्वत्र पसरू लागले असतानाच मी भुर्जन देशात पोहोचले. इथे आल्यावर माझे एका वृद्ध स्त्रीमध्ये रूपांतर झाले. जेव्हा मी या भुर्जन देशात पोहोचले, तेव्हाच कलियुगाने आपली पाळेमुळे सर्वत्र पसरवायला सुरुवात केली होती. माझी ही दोन मुले, ज्ञान आणि वैराग्य हीदेखील पटकन म्हातारी झाली.

या अवस्थेमध्ये बरेच फिरत, शोधत आम्ही या वृंदावनात पोहोचलो. आश्चर्याची बाब अशी की, मी येथे पोहोचताच अचानक माझे वृद्धत्व नाहीसे झाले आणि मला माझे तारुण्य पुन्हा प्राप्त झाले. परंतु माझी ही दोन मुले अद्यापही म्हातारी व दुर्बलच राहिली आहेत. ह्या प्राप्त परिस्थितीचा मला खूप त्रास होतो आहे. मी काय करावे हे काहीच मला आता समजत नाही.

मी या देशातून निघून दुसऱ्या देशी जाऊन राहावे किंवा नाही याबाबत माझ्या मनामध्ये कमालीचे द्वंद्व चालू आहे. माझ्या मुलांना म्हातारपणामुळे होत असलेला त्रास मी पाहू शकत नाही. मला तारुण्य लाभल्यानंतरदेखील आनंदी आणि शांत राहण्यास मी असमर्थ ठरले आहे. यामागील कारण काय आहे? हे महान मुनी! हे योगनिधी! कृपया माझे दु:ख दूर करावे. अशा पद्धतीने भक्तीने महर्षी नारदांना प्रार्थना केली.

नारद महर्षींनी काही काळ ध्यान केले आणि मग तिला उद्देशून ते म्हणाले, “हे तरुण स्त्री, कृपया माझे ऐक. कलियुगातील हा सर्वांत भयंकर असा काळ आहे. चांगले आचरण तसेच योग आणि तपश्चर्येचा मार्ग पूर्णपणे नाहीसा झाला आहे. लोक मोठ्या प्रमाणात पापकृत्यांकडेच आकर्षित होताना दिसत आहेत. साधुसंत त्रस्त आहेत आणि पापी लोक मात्र आनंदी आहेत.

त्यामुळे तू ज्ञान आणि वैराग्याबद्दल विसरून जा. लोकांच्या मनामधील भक्तीदेखील हळूहळू लुप्त होत चालली आहे. म्हणूनच तुम्ही तिघेही म्हातारे झालात. तुझे नशीब चांगले असल्याने तुम्ही वृंदावनापर्यंत पोचलात आणि या स्थानाच्या पवित्रतेमुळे, तुला तुझे तारुण्य पुन्हा मिळू शकले. ”

॥ ॐ नमो नारायण ॥

Tags: