SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 20 Dec 2020
001: परिचय

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॥ श्री पाद वल्लभ नरसिंह सरस्वती ॥ ॥ श्री गुरु दत्तात्रेयाय नम: ॥

अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहम् धनुजवनकृशानं ज्ञानिना-मग्र-गण्यम् | सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि || ओम् नमो हनुमते नमः

भगवान हनुमान (अंजनेय) सगळ्यांनाच माहितीच आहे असे नाही तर सर्वांनाच अत्यंत प्रियदेखील आहेत. परदेशातही ते वानर-देव म्हणून आदरणीय आहेत. तथापि, त्यांचे तत्त्व अत्यंत रहस्यमय, निगूढ आहे. ‘रहस्यमय’ या शब्दाचा अर्थ असा होत नाही की त्याचे तत्त्व विशिष्ट वर्गातील लोकांपासून दूर ठेवले पाहिजे. गोपनीय हा शब्द असे सूचित करतो की ते तत्त्वज्ञान गूढ आहे, प्रगल्भ आहे, तसेच त्याला सखोल गर्भितार्थ आहे. असे हे तत्त्वज्ञानाचे सार संपूर्ण श्रद्धेने ऐकल्यावरच समजले जाऊ शकते. ‘ निगूढ’ या शब्दावरून असेही सूचित होते की हे तत्त्व व्यक्तीच्या थेट अंतरंगातच दीप्तिमान होते. ज्यांनी ह्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आहे अशा धार्मिक लोकांच्या माध्यमातून आपण ह्या परमेश्वराचे खरे तत्त्वसार समजून घेण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. या प्रभू हनुमंतांना अशी अनेक नावे आहेत ज्यांपैकी अंजनेय, हनुमंत आणि मारुती ही नावे सर्वांत प्रसिद्ध आहेत. आता प्रश्न पडतो, या नावांचे काय महत्त्व आहे? प्रत्येक नावाचा इतिहास काय आहे? आपण समजून घेऊया. अंजनेय - माता अंजनीचा पुत्र, म्हणून हे नाव त्यांना मिळाले. हे सगळ्यांनाच माहीत आहे. ‘अंजना’ म्हणजे ‘ज्यामुळे प्रेम विकसित होते.’ अशाचप्रकारे, अंजनेय म्हणजे तो, जो परमानंदास जन्म देण्यासाठी कारणीभूत असतो किंवा जो परमानंदाचे मूर्तिमंत स्वरूप आहे. अंजु व्यक्ति मृक्षण कांती गदिषु हा व्याकरणात्मक धातू आहे, त्याचा अर्थ असा आहे की, ‘ज्याच्याकडे विवेकशील ज्ञान आहे, जो मैत्रीपूर्ण आहे, ज्याच्याकडे आकलनशक्ती आहे.’ जेव्हा या धातूच्या अनुषंगाने या शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण केले जाते तेव्हा अंजनेयाचा अर्थ असा होतो की, ‘जो आपल्यामधील सद्‌सद्‌विवेकबुद्धी जागृत करतो, जो एक खरा मित्र आहे; जो सर्व इच्छा पूर्ण करतो; जो बलशाली आहे आणि जो ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहे.’ फक्त इतकेच नाही तर या धातूचा अर्थ चपळता, वेगवान हालचाली असादेखील आहे. ‘अंजन:’ हा शब्द वारा (वायू) सूचित करतो. ‘जो चपळतेने हालचाल करत आहे, जो वेगाचा, चळवळींचा कारक आहे. म्हणूनच अंजनेयाचा अर्थ ‘वायुपुत्र’ असासुद्धा केला जाऊ शकतो. आता आपण ‘हनुमंत’ या नावामधील अंतर्भूत अर्थाचा अभ्यास करूया. ‘हनुमान’ हे या नावाचे संस्कृत रूप आहे. ‘हनु’ म्हणजे ‘वरचा जबडा’. म्हणूनच ‘ज्याचा वरचा जबडा रुंद आहे, तो हनुमान’ असे सूचित होते. ‘हनु’ शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे ‘ज्ञान’. म्हणून, हनुमान म्हणजे ‘जो ज्ञानवंत आहे’. तसेच ‘हनु’ म्हणजे ‘विनाशक’ म्हणजेच ‘शिव’. यावरून हे स्पष्ट झाले आहे की हनुमान म्हणजे शिवस्वरूप.

।। जय गुरुदत्त ।।

Tags: